अहमदजंग अर्थात नवाब पॅलेस - मुरुड जंजिरा

नवाबास राहण्यासाठी साजेशी अशी वास्तू असणे गरजेचे असल्याने मुरूडच्या उत्तरेकडील एका ४० मीटर उंच अशा टेकडीवर एक टोलेजंग राजवाडा बांधण्यात आला व त्यास अहमदजंग पॅलेस असे नाव देण्यात आले.

अहमदजंग अर्थात नवाब पॅलेस - मुरुड जंजिरा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा शहरास मोठा ऐतिहासिक वारसा आहे. मुरुड शहराचा उल्लेख प्राचीन ताम्रपट अथवा शिलालेखांत अनेकदा सापडला आहे. राजपुरी खाडी ही कोकणातील आकाराने रुंद असलेली खाडी असून या खाडीमार्गे प्राचीन काळापासून व्यापार व प्रवास होत आला आहे. 

निजामशाही काळात या खाडीच्या ऐन मुखाशी असलेला एक बलदंड मेढेकोट तेथील स्थानिक राज्यकर्त्यांकडून निजामशाहीकडे आला व कालांतराने या कोटाची जबाबदारी सिद्दी या मूळच्या आफ्रिका देशातील समूहाकडे आली व यानंतर अगदी १९४८ सालापर्यंत याच वंशाच्या राज्यकर्त्यांचे शासन या परिसरावर राहिले होते.

१८३४ साली जंजिऱ्याचे सिद्दी ब्रिटिशांचे मांडलिक झाले मात्र १८६७ साली तेथील नवाब व कारभाऱ्यांमध्ये मतभेत होऊन इंग्रजांनी नवाबास पदच्युत केले व जंजिरा येथे ब्रिटिश रेसिडेंट नेमला. कालांतराने ब्रिटिशांनी नवाबास त्याचे पद परत दिले मात्र अधिकार कमी केले त्यामुळे पुढील कारभार हा ब्रिटिशांच्या परवानगीनेच सुरु राहिला. 

१८७९ साली सिद्दी इब्राहिमखान मरण पावला. त्यास सिद्दी अहमदखान, सिद्दी महम्मद बक्षी आणि सिद्दी अब्दुल रहीम अशी तीन मुले होती. कालांतराने सिद्दी अहमदखान जंजिऱ्याचे नवाब झाले.

या काळात जंजिरा किल्ल्याचे महत्व कमी होऊन कारभार हा मुरुड शहरातून होऊ लागला. नवाबास राहण्यासाठी साजेशी अशी वास्तू असणे गरजेचे असल्याने मुरूडच्या उत्तरेकडील एका ४० मीटर उंच अशा टेकडीवर एक टोलेजंग राजवाडा बांधण्यात आला व त्यास अहमदजंग पॅलेस असे नाव देण्यात आले. पूर्वी ही जागा फुलशहर या नावाने ओळखली जात असे. अहमदजंग पॅलेस ला नवाब पॅलेस या नावानेही ओळखले जाते.

पूर्वीच्या नवाबाची पत्नी जिचे नाव शरीफा बीबी असे होते तिने हे फुलशहर वसवून तिथे सुंदर बगीचा निर्माण केला होता. सिद्दी अहमद यांच्या काळात या राजवाड्यास राजकीय महत्व प्राप्त झाले होते कारण १९४८ सालापर्यंत जंजिरा संस्थानाची ओळख ही स्वतंत्र संस्थान म्हणून कायम होती.

अहमदजंग पॅलेस ची ज्यांच्या काळात निर्मिती झाली त्या जंजिऱ्याचे शेवटचे नवाब सिद्दी अहमदखान यांच्याविषयी थोडक्यात जाणून घेऊ. यांचा जन्म ३१ ऑगस्ट १८६२ साली जंजिरा किल्ल्यात झाला होता. १८८१ साली यांनी आपले शिक्षण राजकोट येथून पूर्ण केल्यावर काही काळ पुण्यास वास्तव्य केले आणि १८८२ साली त्यांचे लग्न झाले. १८८३ सालच्या ऑक्टोबर महिन्यात त्यांच्याकडे नवाबपदाची सूत्रे आली.

यांच्या कारकिर्दीत जंजिरा संस्थानात अनेक विकासकामे झाली. नवाबास शिकारीची आवड असल्याने मुरुड परिसरातील एक जंगल खास शिकारीसाठी राखीव होते, सध्या त्या जंगलास फणसाड अभयारण्य म्हणून ओळखले जाते.

वाड्याचा दिवाणखाना अतिशय प्रशस्त व उंचपुरा असून आतमध्ये जुन्या काळातील फर्निचर आणि नवाबांनी शिकार केलेल्या प्राण्यांच्या त्वचेत भुसा भरून ते सजावट म्हणून ठेवण्यात आले आहेत. अहमदजंग राजवाडा हा मुरुड परिसरातील असंख्य पर्यटनस्थळांपैकी एक असून अनेक पर्यटक याचे दर्शन घेण्यासाठी येत असतात मात्र हा राजवाडा नवाबाच्या वंशजांची खाजगी मालमत्ता असल्याने आत प्रवेश मिळत नाही. काही काळापूर्वी या वाड्यातील भव्य असा दिवाणखाना पाहायला मिळत असे मात्र गोपनीयतेमुळे कालांतराने तेथे येण्यासही बंदी घालण्यात आली. 

राजवाड्याची जागा अतिशय प्रेक्षणीय असून एका तुटलेल्या कड्यावर वाडा, मागील बाजूस अरबी समुद्र व पुढील बाजूस घनदाट जंगल आणि दक्षिणेस मुरुड शहर आहे. अहमदजंग राजवाड्याचा परिसर अतिशय प्रशस्त असून बरोबर मध्यभागी राजवाडा आहे व आसमंतात राजवाड्याशी संबंधित लोकांची घरे, खासगी मशीद व इतर वास्तू आहेत. नवाबाचे वंशज आता शहरात स्थलांतरित झाले असले तरी अधून मधून ते राजवाड्यास भेट देत असतात. वाड्यास प्रांगणात शिरण्यासाठी लोखंडी प्रवेशद्वार पार करावे लागते व या द्वारावर सिद्दी वंशाची राजचिन्हे कोरलेली दिसून येतात.

वाड्याच्या चोहोबाजूस काही चौक्यांचे व उध्वस्त वस्तूंचे भग्न अवशेष दिसून येतात. संस्थान असताना या चौक्यांचा वापर पहारा ठेवण्यासाठी होत असावा. ८० च्या दशकात या वाड्यात पुराना मंदिर, पुरानी हवेली अशा काही भयपटांचे चित्रीकरण केले गेले होते त्यामुळे जर वाड्याचा अंतर्भाग कसा आहे हे पाहायचे असेल तर आजही या चित्रपटांतून आपण तो अनुभव घेऊ शकतो. मध्ययुगात पश्चिम समुद्रावरील एक चिवट सत्ता म्हणून ओळख मिळवलेल्या सिद्दी वंशातील शेवटच्या नवाबाचा हा राजवाडा बाहेरून का होईना एकदा तरी पाहायलाच हवा.