औदुंबर - एक पवित्र दत्तस्थान

शके १३४४ मध्ये श्री दत्तात्रेयांचे द्वितीय अवतार नृसिंह सरस्वती यांनी या स्थळी भेट दिली होती व येथील औदुंबर वृक्षांनी बहरलेल्या तपोवनात त्यांनी चातुर्मासाचा काळ व्यतीत केला होता.

औदुंबर - एक पवित्र दत्तस्थान

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

दत्त संप्रदायातील एक महान विभूती म्हणून नृसिंह सरस्वती प्रसिद्ध आहेत. नृसिंह सरस्वतींच्या वास्तव्याने पावन झालेली स्थळे ही दत्तभक्तांसाठी पवित्र मानली जातात व अशाच पवित्र स्थळांपैकी एक स्थळ म्हणजे औदुंबर.

औदुंबर हे स्थळ महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यात असून मुंबई अथवा पुण्याहून मिरज येथे जाताना वाटेत लागणाऱ्या भिलवडी स्थानकापासून ३ किलोमीटर अंतरावर आहे. कृष्णा नदीच्या तीरावर वसलेल्या या स्थळाची महती अतिशय जुनी आहे.

कृष्णा नदी ही महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक मानली जाते व या नदीच्या सानिध्यात औदुंबर हे स्थळ असल्याने या परिसराचे महत्व अधिकच वाढले आहे. या स्थळास औदुंबर हे नाव प्राप्त होण्याचे कारण म्हणजे येथे पूर्वी औदुंबर या वृक्षाचे मोठे वन होते आणि औदुंबर हा वृक्ष दत्तात्रेयांचा प्रिय वृक्ष आहे हे आपणास ठाऊक आहेच.

भिलवडी या ठिकाणी प्राचीन काळापासून भुवनेश्वरी देवीचे शक्तीपीठ आहे व त्यामुळे या ठिकाणी अनेक तपस्वी फार पूर्वीपासून तपश्चर्येस अथवा ध्यानधारणेस येत असत. आजही आपणास कृष्णेच्या तीरावर एक प्रशस्त घाट व जुनी मंदिरे पाहावयास मिळतात. 

शके १३४४ मध्ये श्री दत्तात्रेयांचे द्वितीय अवतार नृसिंह सरस्वती यांनी या स्थळी भेट दिली होती व येथील औदुंबर वृक्षांनी बहरलेल्या तपोवनात त्यांनी चातुर्मासाचा काळ व्यतीत केला होता व या काळात नृसिंह सरस्वतींचे वास्तव्य या ठिकाणी झाल्याने हे स्थळ दत्तक्षेत्र म्हणून प्रख्यात पावले.

औदुंबर क्षेत्री नृसिंह सरस्वतींनी चातुर्मासाचा काळ व्यतीत केल्यावर येथून प्रस्थान करताना त्यांनी आपल्या दिव्य पादुका या स्थळी ठेवून माझे अस्तित्व या पादुकांच्या स्वरूपात या ठिकाणी राहील असे भाविकांना आश्वासन दिले होते व आजही या ठिकाणी नृसिंह सरस्वतींच्या पादुकांचे एक सुंदर मंदिर पाहावयास मिळते व दूरदूरहून भाविक या ठिकाणी दर्शन घेण्यास येत असतात.

कृष्णेच्या तीरावर हे दत्त मंदिर असून भाविकांसाठी तीरावर घाट बांधण्यात आला आहे जेणेकरून भाविकांना कृष्णेच्या पवित्र जलात स्नान करणे शक्य व्हावे. मंदिर हे कृष्णा नदीच्या तीरावर असल्याने पावसाळ्यात कृष्णामाईस पूर आल्यावर हे मंदिर व पादुका पाण्यात जातात त्यामुळे १९२६ साली एका उंच ठिकाणी नवीन देवघर बांधण्यात आले आहे व या ठिकाणी पावसाळ्यात पादुका दर्शनासाठी आणल्या जातात.

औदुंबर येथील हे दत्त मंदिर औदुंबर वृक्षाच्या सानिध्यात असून येथील वातावरण अतिशय प्रसन्न असे असते.  भारतभरात जी दत्तक्षेत्रे आहेत त्या सर्वांत एक समानता आहे ती म्हणजे या ठिकाणी मनास एक वेगळी शांतता प्राप्त होते आणि देवतांचे दर्शन प्राप्त होऊन दिव्यत्वाची अनुभूती घेता येते. दत्त भक्तांच्या श्रद्धास्थानांमधील एक असलेले औदुंबर हे स्थळ एकदा तरी पाहायलाच हवे.