रहस्यमय चपाती व लाल कमळ चळवळ - १८५७ च्या उठावाची पूर्वतयारी
१८५६ सालापासून गुप्त प्रचाराच्या माध्यमातून उठावाच्या पुढाऱ्यांनी लोकांपर्यंत पोहोचण्यास सुरुवात केली होती व या गुप्त प्रचाराची अनेक माध्यमे त्या काळात प्रचलित झाली.

१८१८ सालानंतर ब्रिटिश लोकांच्या हाती गेलेल्या भारत देशास स्वतंत्र करण्याचा अत्यंत मोठा प्रयत्न म्हणजे १८५७ चे स्वातंत्र्य समर हे आपणा सर्वांनाच ठाऊक आहे. १८५७ च्या उठावात भारतातील राजे राजवाड्यांपासून सामान्य जनतेपर्यंत सर्वच जण सहभागी झाले होते अबालवृद्ध पुरुष व स्त्रियांनीही या युद्धात आपापले योगदान दिले.
१८५७ चे स्वातंत्र्य युद्ध हे प्रामुख्याने भारतातील जनतेला ब्रिटिशांच्या जाचातून मुक्त करण्याचा राष्ट्रीय स्तरावरील एक मोठा प्रयत्न होता मात्र हे कार्य निश्चितच सोपे नव्हते कारण मूठभर ब्रिटिशांनी वेगवेगळ्या माध्यमातून भारतीय जनतेची विविध माध्यमातून कुचंबणा सुरु केली होती.
या युद्धाचा प्रमुख उद्देश म्हणजे एकाच वेळी ब्रिटिशांविरोधात सर्व स्तरांतून मोठा उठाव होऊन पुन्हा एकदा भारतास स्वातंत्र्य मिळवून देणे हा होता व हे बंड यशस्वी होण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून नागरिकांचा सहभाग मिळणे अत्यावश्यक होते.
ब्रिटिशांची गुप्तहेर यंत्रणा सजग असल्याने आणि एव्हाना भारतातील अनेक राज्ये त्यांनी खालसा केलेली असल्याने नक्कीच भविष्यात मोठे बंड होऊ शकेल अशी त्यांना भीती होती. ईस्ट इंडिया कंपनीच्या जाचक धोरणांमुळे राजे राजवाडे, सैन्य आणि सामान्य नागरिक व इतर सर्वच स्तरांत मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण होऊ लागला होता.
१८५६ सालापासून गुप्त प्रचाराच्या माध्यमातून बंडाच्या पुढाऱ्यांनी लोकांपर्यंत पोहोचण्यास सुरुवात केली होती व या गुप्त प्रचाराची अनेक माध्यमे त्या काळात प्रचलित झाली. फक्त पत्रव्यवहार करून प्रचार होणार नाही तर प्रचाराच्या अनेक युक्त्या वापरणे गरजेचे आहे हे जाणून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या युक्त्या निर्माण झाल्या व प्रचाराच्या अशा अनेक युक्त्यांपैकी एक म्हणजे लाल कमळ आंदोलन व चपाती आंदोलन.
१८५७ च्या स्वातंत्र्य युद्धात प्रामुख्याने दोन घटक महत्वाचे होते व ते म्हणजे ब्रिटिशांच्या अमलाखालील भारतीय सैनिक आणि सामान्य जनता व या दोघांचे साहाय्य घेऊनच हे युद्ध यशस्वी करता येणे शक्य होते व त्याकरिता या दोन घटकांत वेगाने पोहोचणे गरजेचे होते.
१८५७ च्या उठावाचा एक दिवस ठरवला गेला होता व याच दिवशी सर्वांनी उठाव करावा हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक होते त्यामुळे वेगवेगळ्या भागात प्रचारकांचे गट आपापल्या रीतीने कार्य करीत होते व यातीलच एका गटाने चपाती चळवळ सुरु केली व दुसऱ्या गटाने लाल कमळ चळवळ ज्यांनी ब्रिटिशांचेही धाबे दणाणले.
लाल कमळ चळवळ ही प्रामुख्याने सैन्यातील लोकांसाठी होती व चपाती चळवळ ही सामान्य जनतेसाठी!
गुप्त प्रचारकांनी सैनिकांसाठी लाल कमळ आणि नागरिकांसाठी चपाती ही दोन चिन्हे निश्चित केल्यावर त्यांचा प्रचार कशा प्रकारे झाला हे जाणून घेऊ. लाल कमळ हे सैनिकांच्या पलटणीसाठी होते व प्रत्येक पलटणीतील एक सैनिक लाल कमळ घेऊन दुसऱ्या पलटणीत जात असे त्यावेळी त्या पलटणीतील प्रत्येक सैनिकाकडून लाल कमळ दाखवण्यात येत असे व ज्याच्या हातून ते फुल अगदी शेवटी निघे त्याचे कर्तव्य हे असे की दुसऱ्या पलटणीकडे हे फुल घेऊन जाणे. ज्या पलटणीकडे ही लाल कमळे असत त्या पलटणी उठावात सहभागी होणार आहेत असा संदेश आपोआप मिळत असे. पेशावर पासून बैरकपूर पर्यंत अशा प्रकारे असंख्य कमळांचा प्रचार सैनिकांपर्यंत झाला.
आता जाणून घेऊ चपाती आंदोलनाविषयी, प्रचारकांनी प्रचारात आणलेल्या या चपात्या गव्हाच्या पिठाच्या असत आणि त्यावर कुठलाही संदेश लिहिलेला नसे पण या चपात्या क्रांतीचा एक संदेश त्या खाणाऱ्यांमध्ये जागृत करीत. त्याकाळी प्रत्येक गावात एक चौकीदार असे व प्रत्येक चौकीदाराकडे या चपात्या असत आणि त्यातील एका चपातीतील एक तुकडा तोडून तो स्वतः खाऊन इतर चपात्या तो प्रसाद तुकड्या तुकड्यांच्या स्वरूपात म्हणून गावात वाटत असे आणि चपात्या संपल्या की नव्या चपात्या तयार करून त्या दुसऱ्या गावाला पाठवण्यात येत असत.
अशाप्रकारे या चपात्या अतिशय वेगाने विविध गावांत पोहोचून क्रांतीच्या मशाली पेटवीत राहिल्या. या चपात्यांच्या माध्यमातून नक्की कशा प्रकारे संदेश दिला जात असे हे गूढ आजही कुणालाच समजलेले नाही कारण त्या चपात्यांवर काही संदेशही लिहिलेला नसे अथवा चपाती देणारा सुद्धा काहीच न बोलता या चपात्या वाटीत असे तरी सुद्धा आंदोलकांना हवा तो संदेश या चपात्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवता येत असे.
या चपाती आंदोलनामुळे ब्रिटिश एवढे बेचैन झाले होते की त्यांनी या चपात्यांवर काही संदेश तर कोरला नाही ना याचा शोध घेण्याचा मोठा प्रयत्न केला आणि ज्यावेळी तेही शक्य झाले नाही तेव्हा चपात्यांचा चुरा करून आतमध्ये तर काही नाही ना याचाही शोध लावण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचे हे प्रयत्न निष्फळ ठरले.
१८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाचा एक महत्वाचा भाग म्हणून लाल कमळ आणि चपाती या दोन आंदोलनांची दखल घेतली जाते मात्र या आंदोलनांचा उद्देश लाल कमळ आणि चपातीच्या माध्यमातून गुप्त प्रचार करणे होता की इंग्रजांना गोंधळात टाकण्यासाठी सुरु केलेले मानसिक युद्ध होते या प्रश्नाचे उत्तर आजही मिळालेले नाही.