नागांव येथील भीमेश्वर मंदिर

नागावमध्ये इतिहासाच्या पाऊलखुणा जपणारी अनेक स्थळे आहेत व यापैकी एक म्हणजे भीमेश्वर महादेव मंदिर.

नागांव येथील भीमेश्वर मंदिर
नागांव येथील भीमेश्वर मंदिर

रायगड जिल्ह्याच्या अलिबाग तालुक्यातले नागांव हे एक निसर्गरम्य गावं आधुनिक काळात एक पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असले तरी या गावास प्राचीन इतिहास आहे. प्राचीन काळी नागवंशीयांनी जी गावे वसवली त्यापैकी नागांव हे एक असून प्राचीन काळी या गावास नागग्राम असे नाव होते. प्राचीन साधनात या गावाचा उल्लेख नागुम असा सुद्धा आला आहे.

नागावमध्ये इतिहासाच्या पाऊलखुणा जपणारी अनेक स्थळे आहेत व यापैकी एक म्हणजे भीमेश्वर महादेव मंदिर. नागावमधील अलिबाग मुरुड राज्यमार्गावर भीमेश्वर मंदिर असून प्रथमदर्शनी या मंदिराचे दर्शन सुखावह असते.

मंदिराचे प्रांगण मोठे असून आत शिरताक्षणी एका भव्य पुष्करणी तलावाचे दर्शन होते. हा तलाव पाण्याने बारमाही भरलेला असतो व तलावामध्ये अनेक मासे व कासवे दिसून येतात. सदर तलाव १७६४ साली नारंभट रिसबूड यांनी तयार केल्याचा उल्लेख आढळतो.

तलावाच्या मागे भीमेश्वर मंदिराचे दर्शन होते. मंदिराचा सभामंडप कौलारू असून गर्भगृहास कळस आहे. मंदिरात प्रवेश करताना एका बाजूस प्राचीन मूर्ती दिसून येतात या वरून हे मंदिर अतिशय प्राचीन असावे हे लक्षात येते. 

मंदिराच्या गर्भगृहात श्री भीमेश्वराचे स्वयंभू लिंग स्थापित आहे. भीमेश्वर मंदिर प्राचीन असले तरी त्याचा शिवकाळात आणि पेशवेकाळात म्हणजे १७५८ साली जीर्णोद्धार करण्यात आला होता. या जीर्णोद्धाराच्या कामी सदाशिवराव पेशवे यांच्या पत्नी पार्वतीबाई यांनी मोठी देणगी दिली होती.

मंदिराच्या समोर एक दीपमाळ असून तिची उभारणी मंदिराच्या उभारणीनंतर विठोबा लोंढे यांनी केली. 

भीमेश्वर मंदिराचे एक प्रमुख वैशिट्य म्हणजे या मंदिराच्या उजव्या बाजूच्या प्रवेशद्वाराच्या पायरीच्या कठड्यावर एक संस्कृत शिलालेख आहे. हा शिलालेख शके १२८८ मधील असून त्यावर २८ ओळी आहेत. हा शिलालेख तत्कालीन ठाणे कोकणाचा राजा हंबीरराव याचा असून त्यावर दानपत्र कोरले आहे.

भीमेश्वर मंदिरात महाशिवरात्री व रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात होतो. कोकणची संस्कृती जपणारे भीमेश्वर मंदिर खऱ्या अर्थी नागावचे वैभव आहे.