कनकादित्य सूर्य मंदिर कशेळी
कशेळी हे गाव कोकणातील रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यात असून विस्तीर्ण समुद्रकिनारा व डोंगरांच्या सानिध्यात असलेले हे गाव येथील कनकादित्य सूर्य मंदिर व देवघळी बीच मुळे पर्यटकांच्या आकर्षणस्थानी आले आहे.
आपल्या ग्रहमालेतील मुख्य तारा म्हणजे सूर्य. सूर्य हा ग्रहमालेच्या मध्यभागी असून त्याच्याच भोवती पृथ्वीसह इतर सर्व ग्रह प्रदक्षिणा मारत असतात. पृथ्वीवरील जीवसृष्टी सुरु राहण्यास सूर्याचा महत्वाचा सहभाग आहे. सूर्य नसेल तर पृथ्वीवरील जीवन काही काळातच नष्ट होईल.
सूर्याचे हे महत्व भारतातील लोकांस प्राचीन काळापासून माहित होते त्यामुळे सूर्यास एक देवता म्हणूनही मान मिळाला आहे. वेदकाळात सूर्य हा एक महत्वाचा देव मानला गेला असून त्यास प्रकाश व चैतन्याचे दैवत मानले गेले आहे.
ॐ भूर् भुवः स्वः। तत् सवितुर्वरेण्यं। भर्गो देवस्य धीमहि। धियो यो नः प्रचोदयात् ॥ हा मंत्र मुळात सूर्य मंत्रच असून तो प्रातःकालीच सूर्यदयावेळी जपला जातो. या मंत्राचा अर्थ म्हणजे "उत्पादक, जो त्याचे देदीप्यमान तेज आम्हास मिळो, जो देव यश देईल त्याचे"
असे असले तरी भारतातील सद्य स्थितीतील सूर्यमंदिर तुरळक आहेत. अदमासे वीस एक सूर्यमंदिरे भारतात असतील. या मंदिरांत कोणार्कचे सूर्यमंदिर सर्वात प्रसिद्ध आहे. उलार्क सूर्य मंदिर, मोदेरा सूर्य मंदिर, कटारमल सूर्य मंदिर, रनकपुर सूर्य मंदिर, सूर्य पहर मंदिर, प्रतापगढ़ सूर्य मंदिर, दक्षिणार्क सूर्य मंदिर, देव सूर्य मंदिर, औंगारी सूर्य मंदिर, बेलार्कसूर्य मंदिर, हंडिया सूर्य मंदिर, गया सूर्य मंदिर, महोबा सूर्य मंदिर, रहली सूर्य मंदिर, झालावाड सूर्य मंदिर, रांची सूर्य मंदिर, जम्मू सूर्य मंदिर, काश्मीर मार्तंड सूर्य मंदिर, कंदाहा सूर्य मंदिर अशी इतर सूर्य मंदिरे भारतातील विविध प्रांतांत पाहावयास मिळतात.
कदाचित पूर्वी महाराष्ट्रातही अनेक सूर्यमंदिरे असावीत मात्र कालपरत्वे सूर्याचे देवता म्हणून थोडा कमी झालेला दर्जा व विध्वंसकाचे आक्रमण यास काही सूर्यमंदिरे बळी पडली असावीत. मात्र महाराष्ट्राच्या कोकण प्रदेशात आजही एक सूर्यमंदिर आपले अस्तित्व राखून आहे व ते म्हणजे कशेळी येथील कनकादित्य सूर्यमंदिर. कोकणात खरे तर आणखी काही सूर्यमंदिरे प्रसिद्ध आहेत त्यामध्ये नेवरे, देऊड, आंबव, आरवली, खारेपाटण येथील सूर्यमंदिरे कशेळी येथील सूर्यमंदिराप्रमाणेच पुरातन आहेत.
कशेळी हे गाव कोकणातील रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यात असून विस्तीर्ण समुद्रकिनारा व डोंगरांच्या सानिध्यात असलेले हे गाव येथील देवघळी बीच मुळे पर्यटकांच्या आकर्षणस्थानी आले आहे.
मात्र कशेळी येथील कनकादित्य या सूर्यमंदिरामुळे या गावास एक धार्मिक अधिष्ठान देखील लाभले आहे. कनकादित्य मंदिराचा इतिहास प्राचीन आहे व मंदिराच्या इतिहासाविषयी पुढीलप्रमाणे आख्यायिका सांगितली जाते की, फार पूर्वी एका व्यापाऱ्याचे गलबत माल भरण्यासाठी सुरत येथे गेले. सुरतेस त्या व्यापाऱ्याला शाळीग्राम शिळेची एक सुंदर मूर्ती एका देवालयात आढळली. ही मूर्ती त्यास खूप आवडली व त्याने ती मूर्ती उचलून आपल्या गलबतात घातली आणि पुन्हा परतीच्या मार्गास निघाला. प्रवास करता करता त्याचे गलबत कशेळी गावाजवळ आले आणि बंद पडले. व्यापाऱ्यास काही समजेनासे झाले की गलबत हे अचानक बंद कसे झाले. त्याने खूप प्रयत्न केला मात्र सर्व प्रयत्न व्यर्थ गेले.
शेवटी त्याला वाटले की कदाचित या मूर्तीच्या मनात काहीतरी असावे म्हणून गलबत इथेच थांबले आहे. यानंतर व्यापारी ती मूर्ती घेऊन किनाऱ्यावर उतरला आणि कशेळी गावाच्या समुद्रकिनाऱ्यावरील एका कपारीत म्हणजे घळीत ती मूर्ती ठेवली आणि पुन्हा त्याच्या गलबतावर आला. आता मात्र गलबत सुरु झाले व व्यापारी आपल्या देशास निघून गेला.
कालांतराने कशेळी गावातील काही मंडळी त्या कपारीजवळ आली असता त्यांना व्यापाऱ्याने तेथे ठेवलेली मूर्ती आढळली. यानंतर गावकऱ्यांमध्ये चर्चा होऊन त्या मूर्तीची प्रतिष्ठापना कशेळी येथे करावयाचे सर्वानुमते ठरले व तेथे मंदिराची स्थापना करून मूर्तीस तेथे स्थापन करण्यात आले"
ही आख्यायिकेस शास्त्रीय आधार कितपत आहे हे माहित नाही मात्र कनकादित्य मंदिराच्या जामदारखान्यात सापडलेला इसवी सन ११९१ सालचा एक ताम्रपट हे मंदिर किती जुने आहे याचा महत्वाचा पुरावा आहे.
संस्कृत व मराठी भाषेतील हा ताम्रपट असून १२ व्या शतकातील देवनागरी लिपीत हा कोरला गेला आहे. लेखाच्या संस्कृत भागात शिलाहार नृपती भोज (दुसरा) यांची वंशावळ असून भोज राजाने पद्माल किल्ल्यावर वास्तव्य असताना राजपुत्र गंडरादित्य याच्या विनंतीवरून गोविंदभट्ट नावाच्या ब्राह्मणास १२ ब्राह्मणांना भोजन घालण्यासाठी कसेली (कशेळी) या खेड्याचे उत्पन्न दान दिल्याचा उल्लेख आहे आणि ताम्रपटाच्या मराठी भागात शिलाहार राजा हरपालदेव शासन करीत असताना त्याचा सेवक रामणस मांडलिक व जाखण मांडलिक यांनी कनकेश्वर (कनकादित्य) मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा व काही देणग्या दिल्याचा उल्लेख आहे. ज्या घळीत कनकादित्याची मूर्ती आढळली ती घळ देवघळ अथवा देवघळी म्हणून प्रसिद्ध झाली व आजही येथे ही घळ पाहावयास मिळते.
कनकादित्य नावाची फोड केल्यास कनक व आदित्य अशी होते यामध्ये कनक म्हणजे सुवर्ण आणि आदित्य म्हणजे सूर्य असा अर्थ होतो. कनकादित्याचे मंदिर अतिशय भव्य असून पारंपरिक कोकणी बांधकामशैलीचा वापर मंदिराच्या बांधकामात करण्यात आला आहे. जांभा दगड आणि लाकूड यांचा कलापूर्ण वापर बांधकाम करताना करण्यात आला आहे. भल्यामोठ्या प्रांगणात असलेले कनकादित्याचे मुख्य मंदिर म्हणजे लाकडाच्या कोरीवकामाचा एक अजब नमुना आहे. सभागृहात प्रशस्त झुंबरे असून अंतर्गत सजावट अतिशय उत्तम आहे.
गाभागृहाच्या दरवाज्यावर विष्णूची शेषशायी अशी भव्य मूर्ती आहे व दोन बाजूना द्वारपाल आहेत. गर्भगृहात कनकादित्याची सूर्यमूर्ती असून मूर्ती दोन अडीच हात उंच आहे. मूर्तीस आरास केल्यामुळे मूर्तीचे मूळ रूप दिसत नसले तरी 'सप्ताश्वररथमारूढो द्विभुज स्वात्सदा रवी:' या रूपात ही मूर्ती आहे असे म्हणतात.
कनकादित्य हे कोकणातील अनेक कुटुंबाचे कुलदैवत असून कामानिमित्त शहरास राहणारी कुटुंबे वर्षातून एकदा तरी देवाच्या दर्शनास येत असतात. विस्तीर्ण व निसर्गरम्य अशा व डोंगराच्या कुशीत वसलेल्या कशेळी गावाच्या वैभवात कनकादित्याचे हे सूर्यमंदिर खऱ्या अर्थी भर घालते.