निमगावचे श्री खंडोबा देवस्थान

पुणे जिल्ह्यात निमगाव नावाची एकूण सहा गावे असून हे गाव पूर्वीच्या काळी 'निमगाव-नागणा' म्हणून ओळखले जायचे. निमगावच्या उत्तरेस सुमारे दीड कि.मी.अंतरावर असलेले दगडी बांधकामातील श्री खंडोबा मंदिर दूरवरून दृष्टीस पडते.

निमगावचे श्री खंडोबा देवस्थान
श्री खंडोबा देवस्थान

दि.१६/१/२०२१ रोजी चंद्रचूड वाडा - निमगाव व श्रीमंत दमाजीराव गायकवाड गढी - दावडी पाहून मनोहर मोहरे सरांच्या दुचाकीवरुन परत राजगुरुकडे येताना निमगाव येथे असलेले लोकदैवत श्री खंडोबाच्या दर्शनासाठी गेलो. महाराष्ट्रात असलेल्या श्री खंडोबांच्या देवस्थांपैकी लोकांची श्रद्धास्थान असलेली देवस्थाने जेजुरी ( ता.पुरंदर, जि.पुणे), निमगाव (ता.खेड),नांदुरा (बीड), नळदुर्ग व अनदुर्ग (जि.उस्मानाबाद), नेवासे ( ता.नेवासे, जि.अहमदनगर), पाली ( ता.कराड, जि.सातारा), टाकळी खंडेश्वरी ( ता.कर्जत, जि.अ.नगर) पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात असलेले निमगाव हे पुणे ते नाशिक या राष्ट्रीय महामार्गावरील राजगुरुनगरच्या आग्नेयस सुमारे ८ कि.मी.अंतरावर आहे. पुणे जिल्ह्यात निमगाव नावाची एकूण सहा गावे असून हे गाव पूर्वीच्या काळी 'निमगाव-नागणा' म्हणून ओळखले जायचे. भीमानदीच्या दक्षिण तीरावर हे गाव होते पण नंतरच्या काळात तेथील लोकवस्ती विस्थापित झाल्याने 'निमगाव-दावडी' हे नाव प्रचलित झाले.

निमगावच्या उत्तरेस सुमारे दीड कि.मी.अंतरावर असलेले दगडी बांधकामातील मंदिर दूरवरून दृष्टीस पडते. चारहि बाजूला २४ फूट उंचीची भक्कम तटबंदी व बुरूज पाहून आपण ऐतिहासिक गढीच पाहात आहोत असा भास होतो. मंदिर प्राकारांत प्रवेश करण्यासाठी पूर्व, पश्चिम व दक्षिणेस भव्य दरवाजे आहेत, यापैकी पश्चिमेकडील दरवाजा कायमचा बंद केलेला आहे. दक्षिणेकडील दरवाजा फक्त मंदिरातील महत्त्वाचे उत्सव प्रसंगी उघडला जातो व यास निमगाव दरवाजा म्हणून संबोधतात कारण याबाजूस निमगावची लोकवस्ति आहे. मुख्य प्रवेशद्वार पूर्वेस असून त्यास दावडी दरवाजा म्हणतात. मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश करण्यापूर्वी देवड्यात असलेल्या हनुमान व गणपतिंच्या सुंदर मूर्तींचे मनोभावे दर्शन घ्यायचे. आत प्रवेश केल्यावर दगडी फरसबंदी असून त्यांची पूर्वपश्चिम लांबी १९५ फूट, तर रूंदी ११८ फूट इतकी आहे. तटबंदीच्या आतील चारहि बाजूच्या मिळून एकूण ७६ सुरेख दगडी कमानीच्या ओव-या आहेत. मुख्य मंदिरासमोर तीन भव्य दगडी दीपमाळा असून उत्तरेकडील दीपमाळेवर ११ व १७ ओळीतील शिलालेख आहेत व त्यांच्या कालखंड १७७३ व १८८३ असा आहे. दीपमाळे समोर नंदीची मंडपी आहे. मंडपीच्या डाव्या हातास दोन उंच दगडावर पोर्तुगीज बनावटीच्या घंटा टांगलेल्या असून त्यांच्यावर इंग्रजी भाषेतील 1891 ही अक्षरे कोरलेली आहेत. मंदिर सोपे, मंडप व गर्भागार अशा रचनेचे आहे. गाभाऱ्यात सयोनि स्वयंभू असून बाणाई, मल्लारी, म्हाळसा, भैरव व जोगेश्वरी यांच्या धातूमूर्ति आहेत. येथे देवाच्या नित्यपूजेसाठी भीमानदीचे पाणी आणले जाते. चंपाषष्ठी, माघी पौर्णिमा आणि चैत्री पौर्णिमेला येथे फार मोठा उत्सव साजरा केला जातो.

याठिकाणी वाघे आहेत परंतु मुरळ्या नाहीत. या देवस्थानासंबंधीचे एकूण अकरा कागद सरदार आबासाहेब मुजूमदारांनी १९१३ च्या भारत इतिहास संशोधक मंडळाच्या इतिवृत्तात प्रसिध्द केले आहेत. या कागदपत्रातील एका शिवकालीन कागदात या ठिकाणी देव कसा प्रगट झाला याची माहिती दिली असून त्याचे नुसार प्रगटीकरण मार्गशीर्ष शुद्ध पंचमी शके १३४७ म्हणजेच २६ नोव्हेंबर १४२४ असा दिला आहे. मंदिरात एकूण चार भुयारे असल्याचे सांगितले जाते, त्यापैकी एक भुयार निमगाव येथील चंद्रचूड वाड्यात जाते. मनोभावे श्री खंडोबाचे दर्शन घेऊन आम्ही हुतात्मा राजगुरु यांच्या जन्म स्थळाकडे मार्गस्थ झालो.

संदर्भ -

१) खंडोबा आणि वाघ्या मुरळी (लेखक - खुशाल अमृत डवरे)

२) महाराष्ट्राची चार दैवते (लेखक - ग.ह.खरे)

- सुरेश नारायण शिंदे,भोर ([email protected])