गांगवली - छत्रपती शाहू महाराजांचे जन्मस्थळ

गांगवली गावाचा उल्लेख पूर्वी गांगोली असा केला जात असे व हे स्थान ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचे होते. पूर्वी निजामपूर ते रायगड हा मुख्य मार्ग होता व त्या मार्गावरच गांगवली हे गाव आहे.

गांगवली - छत्रपती शाहू महाराजांचे जन्मस्थळ
गांगवली

थोरांच्या जन्मभूमी, कर्मभूमी आणि मृत्युभूमी या कायम लक्षात ठेवल्या जातात कारण थोरांच्या नावानेच ही ठिकाणे कायम ओळखली जातात. मात्र आपल्या येथे अशी अनेक स्थळे आहेत ज्यांची माहिती आणि महती फारशी लोकांसमोर आलेली नाही.

छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ शिवनेरी, छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थळ पुरंदर आणि छत्रपती राजाराम महाराजांचे जन्मस्थळ राजगड हे तर प्रत्येक मराठी माणसास ठाऊक आहे मात्र शिवरायांचे नातू व संभाजी महाराजांचे पुत्र आणि ज्यांच्या काळात स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर झाले त्या छत्रपती शाहू महाराजांचे जन्मस्थळ अनेकांना ठाऊक नाही.

रायगड जिल्ह्याच्या माणगाव तालुक्यात गांगवली हे छोटेसे गाव आहे व याच ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांचा जन्म महाराणी येसूबाईंच्या उदरी झाला होता. गांगवली हे गाव रायगड किल्ल्याच्या पश्चिम दिशेस सरळ रेषेत ११ किलोमीटर अंतरावर असून तालुक्याचे ठिकाण असलेल्या माणगाव पासून ८ किलोमीटर अंतरावर आहे. येथे येण्यासाठी माणगावहून महाडच्या दिशेने ढालघर फाट्यावर येऊन डाव्या बाजूस जाणाऱ्या रस्त्यास वळावे लागते व येथून काही अंतर पार केल्यावर आपण गांगवली येथे पोहोचतो.

गांगवली गावाचा उल्लेख पूर्वी गांगोली असा केला जात असे व हे स्थान ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचे होते. पूर्वी निजामपूर ते रायगड हा मुख्य मार्ग होता व त्या मार्गावरच गांगवली हे गाव आहे याशिवाय राजधानी रायगडाच्या टप्प्यात हे गाव असल्याने व गावाच्या पश्चिम दिशेस काही मैलांवर जंजिऱ्याच्या सिद्दीची राजवट सुरु होत असल्याने हे शिवकाळात बंदोबस्ताचे ठिकाण असावे.

गांगोली हुन रायगडास जाणाऱ्या शिवकालीन वाटेवर आज पक्की सडक बांधण्यात आली आहे. दाट जंगलातून व खोल दऱ्याखोऱ्यातून शिवकालीन प्रवासाचा अनुभव घ्यावयाचा असल्यास या वाटेने नक्की प्रवास करावा. गांगोली येथून ही वाट कादापूर, पुनाडे, पाचाड मार्गे रायगडाच्या पायथ्यापर्यंत जाते. 

छत्रपती शाहू महाराजांच्या जन्माचा उल्लेख पुढीलप्रमाणे येतो "वैशाख वद्य ७ गुरुवारी संभाजी राजे व येसूबाई यांस गांगोली येथे पुत्र झाला. सिवाजी राजे नाव ठेविले.

१६८५ साली मुघल सरदार शहाबुद्दीन खान पुण्याहून बोरघाट उतरून आपल्या सैन्यासह थेट रायगडच्या आसमंतातील गांगोलीस आला  यावेळी रायगडाहून कवी कलश खासे गांगोलीस गेले यावेळी घनघोर युद्ध झाले आणि या युद्धात कवी कलशांनी मावळ्यांच्या साथीने शर्थ करून शहाबुद्दीन खानास परत पिटाळून लावले या प्रसंगाचा उल्लेख पुढीलप्रमाणे येतो.

शाबदीखान पुण्याहून दौड करून बोरघाटाने उतरून गांगोलीस आला. तेथे कवी कलशाने जाऊन भांडण दिले. फिरोन घाटावरी घातला. 

तुकोजी विठ्ठल लोणकर याचा भाऊ बहिरो विठ्ठल लोणकर जेव्हा संभाजी महाराजांना भेटावयास रायगडास आला होता त्यावेळी संभाजी महाराज हे रायगडाहून गांगोली येथे जात असताना बहिरो विठ्ठल याने त्यांची घाटात भेट घेतल्याचा उल्लेखही सापडतो.

गांगवली हे गाव तोंडलेकरवाडी, कुंभारवाडी, खरबाचीवाडी, मोकाशीवाडी, बौध्दवाडी या वाड्यांमध्ये विभागले गेले असून या वाड्या एकमेकांपासून थोड्या अंतरावर आहेत. येथील आजही अस्तित्वात असलेले ऐतिहासिक अवशेष नदीच्या किनारी असलेल्या वैजनाथ या शिवमंदिराच्या आसपास पाहावयास मिळतात. नदीस एक प्रशस्त घाट असून त्याच्या काठावर वैजनाथ हे ऐतिहासिक शिवमंदिर आहे. मंदिराचा बाहेरून जीर्णोद्धार झाला असला तरी मंदिराच्या गाभाऱ्याच्या अंतर्भाग आजही जुन्या बांधणीचा असून गर्भगृहात प्रशस्त शिवलिंग आहे. गर्भगृहाच्या अलीकडे असणाऱ्या देवड्यांमध्ये अतिशय विलोभनीय अशा नागमूर्ती व गणेशमूर्ती आहेत.

याच ऐतिहासिक वैजनाथ मंदिराच्या डाव्या बाजूस संभाजी महाराजांनी येसूबाईंच्या प्रसूतीकाळात एक प्रशस्त प्रसूतिगृह उभारले होते व तेथे येसूबाई या प्रसूतीच्या काही काळ आधी व नंतर वास्तव्यास होत्या. रायगड दुर्ग समुद्रसपाटीपासून ८७० मीटर उंच असल्याने वैद्य व परिचारिका यांना उपचारासाठी सुविधा जलद मिळाव्यात यासाठी संभाजी महाराजांनी गांगवली येथे प्रसूतिगृह निर्माण करण्याचा निश्चय केला असावा. या काळात गांगवली येथे सैन्याचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

१८ मे १६८२ साली शंभूपुत्र शाहू महाराजांचा जन्म गांगवली येथे झाला व स्वराज्यास नवा वारस मिळाला. यानंतर ७ वर्षे म्हणजे १६८९ सालापर्यंत शाहू महाराजांचे वास्तव्य रायगड किल्ल्यावर होते. मोगलांनी रायगड घेतल्यावर महाराणी येसूबाई व राजपुत्र शाहू यांना कैदेत अनेक वर्षे काढावी लागली व कैदेतून सुटका झाल्यावर शाहू महाराजांनी पुन्हा राज्यावरील अधिकार प्राप्त केला आणि त्यावेळच्या राजकारणानुसार सातारा हे शहर आपले मुख्य केंद्र केले. त्याकाळात रायगड हा मोगलांच्याच ताब्यात असल्याने राजधानीची सूत्रे ही रायगडावरून साताऱ्यास आली.

गांगवली येथील वैजनाथ मंदिर परिसरात आजही अनेक समाध्या व वीरगळी पाहावयास मिळतात जी तत्कालीन युद्धसंग्रामाची स्मारके आहेत. ज्या ठिकाणी शाहू महाराजांचा जन्म झाला होता त्या ठिकाणी काही काळापूर्वी प्राथमिक उपचार केंद्र सुरु केले गेले होते मात्र आज ते सुद्धा बंद आहे. काळाच्या वावटळीत गांगवली गावाचा इतिहास लुप्त होत आहे तो पुन्हा एकदा प्रकाशात आणणे ही आता काळाची गरज बनली आहे तरच शिवरायांच्या व संभाजी महाराजांच्या वास्तव्याने पुनीत झालेली छत्रपती शाहू महाराजांच्या या जन्मभूमीस न्याय मिळेल.