माल्यवंत पर्वत - हंपी

हंपी म्हणजे रामायणकाळातली किष्किंधा नगरी. सुग्रीवाची राजधानी असलेले ठिकाण. प्रभू रामचंद्रांच्या अस्तित्वाने पुनीत झालेली भूमी आहे ही.

माल्यवंत पर्वत - हंपी
माल्यवंत पर्वत

वैभवशाली विजयनगर साम्राज्याची राजधानी असलेल्या हंपीमधे या समृद्ध राजवटीचे अनेक अवशेष विखुरलेले आहेत. हंपी हे गावच मुळी या सगळ्या ऐतिहासिक, पौराणिक अवशेषांनी भरलेले आहे.

हंपी म्हणजे रामायणकाळातली किष्किंधा नगरी. सुग्रीवाची राजधानी असलेले ठिकाण. प्रभू रामचंद्रांच्या अस्तित्वाने पुनीत झालेली भूमी आहे ही. श्रीराम आणि लक्ष्मण सीतेच्या शोध घेत घेत इथेच, या माल्यवंत पर्वतावर आले. इथूनच प्रभू रामचंद्रांनी हनुमंताला लंकेला पाठवले. सोबत खुणेची अंगठी दिली. हनुमंत कोटीच्या कोटी उड्डाणे करून लंकेला जाऊन परत आले. येताना सीतामातेने दिलेला मणी रामचंद्रांना आणून दिला. हे सगळं याच माल्यवंत पर्वतावर घडलं अशी श्रद्धा. हंपी मधल्या या माल्यवंत पर्वतावर इ.स.च्या १६ व्या शतकात रघुनाथांचे मंदिर उभारले आहे. माल्यवंत रघुनाथ मंदिर म्हणून हे ओळखले जाते.

कमलापुरा वरून विठ्ठल मंदिराकडे जाताना वाटेत इथे जाण्याचा फाटा आहे. पर्वतावर जवळजवळ शेवटपर्यंत वाहन जाते. काही पायऱ्या चढून मंदिरात प्रवेश होतो. भव्य प्रवेशद्वारावर विष्णूचे दशावतार आणि विविध मूर्ती कोरलेल्या. गोपुरावर आतल्या बाजूने चुन्यात केलेल्या देखण्या मूर्ती लक्षवेधून घेतात. सुंदर गोपूर, स्वच्छ प्रांगण, आवारात असलेली चाफ्याची झाडे आणि खास विजयनगर शैलीत बांधलेले मंदिर. मंदिराच्या गाभाऱ्यात राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमंताच्या मूर्ती आहेत. इथली रामाची मूर्ती हाताची ओंजळ करून बसलेली आहे. हनुमंताने आणून दिलेला मणी रामचंद्र हातात घेताहेत म्हणून ही अंजलीमुद्रा.

या मंदिरात गेली ५ वर्षे अखंड नामस्मरण सुरु आहे. मंदिराच्या मागच्या अंगाला असलेल्या दारातून टेकडीच्या माथ्यावर जायला रस्ता आहे. छोट्याश्या दारातून बाहेर पडले की सुंदर दृश्य समोर येते. टेकडीवर एका गुहेत स्वयंभू शिवलिंग असून त्यावर असलेल्या खडकावर शिखर केले आहे. त्यासमोर जमिनीवर अनेक शिवलिंगे कोरलेली असून त्यांच्या समोर नंदीप्रतिमापण केलेल्या दिसतात. शिवलिंगांच्या २ रांगा असून मधोमध जमिनीला मोठी भेग पडली आहे. त्यातून पाणी वहात असते. लक्ष्मणाच्या बाणामुळे ही भेग पडली अशी इथल्या लोकांची श्रद्धा. टेकडीच्या माथ्यावर काहीशी सपाटी आणि मोठमोठे दगड विखुरलेले आहेत. तिथून आसमंत न्याहाळता येतो. माडाच्या आणि केळीच्या बागाच्या बागा पसरलेल्या दिसतात. हेमकूट पर्वताप्रमाणेच इथूनही सुर्यास्ताचा देखावा अतिशय रमणीय दिसतो. टेकडीवर असलेला छोटासा मंडप आणि त्यामागे होणारा सूर्यास्त पुढे अनेक काळ डोळ्यासमोर तरळत रहातो. विजयनगरचे समृद्ध वैभव अशा उंचावरच्या ठिकाणी जाऊन बघण्यातली मजा काही वेगळीच असते.

- आशुतोष बापट