नाशिकची प्रसिद्ध पांडवलेणी

ही लेणी सातवाहन काळातील असून इसवी सन पूर्व ११० वर्षांपासून या लेण्यांच्या निर्मितीचे कार्य सुरु झाले.

नाशिकची प्रसिद्ध पांडवलेणी

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

नाशिक जिल्ह्यातील अगणित पर्यटनस्थळांमधील एक अत्यंत प्रसिद्ध स्थळ म्हणजे नाशिकची पांडवलेणी. 

नाशिक शहराच्या नैऋत्य दिशेस अंजनगिरी पर्वतरांग असून याच रांगेत शंकूच्या आकाराचे तीन डोंगर दिसून येतात. त्रिशंकू असल्याने या डोंगरांना त्रिरश्मी असेही नाव फार पूर्वीपासून आहे. याच तीन डोंगरांमधील मधल्या डोंगरामध्ये पूर्वाभिमुख अशी लेणी कोरण्यात आली आहेत व याच लेण्यांना पांडवलेणी म्हणून ओळखले जाते.

ही लेणी सातवाहन काळातील असून इसवी सन पूर्व ११० वर्षांपासून या लेण्यांच्या निर्मितीचे कार्य सुरु झाले व हे कार्य कृष्ण अथवा कान्हा नामक राजाच्या कारकिर्दीत सुरु झाले असे म्हणतात. लेणी समूहातील चार ते चौदा या क्रमांकाच्या गुहा या इसवी सन ५ पर्यंत हकुश्री, गौतमीपुत्र सातकर्णी आणि वाशिष्ठी पुत्र पुलुमायी या सातवाहन राजांच्या कारकिर्दीत निर्माण करण्यात आल्या.

तसेच या लेणीसमूहातील पहिली, दुसरी, तिसरी, आठवी आणि विसावी लेणी इसवी सन ५० पर्यंत पूर्ण करण्यात आली. इसवी सन ४०० ते ६०० या दोनशे वर्षांच्या काळात लेणी क्रमांक दोन, पंधरा, सोळा, वीस आणि तेवीस यांमध्ये काही बदल करण्यात आले व या लेण्यांत काही शिलालेख सुद्धा आढळून येतात.

पांडवलेणीमधील विसाव्या क्रमांकाच्या लेण्यात एक शिलालेख आहे व त्यावर नासिककाना धाभिक ग्रामस्य दान अशी अक्षरे दिसून येतात व याचा अर्थ नाशिकच्या लोकांनी दिलेले दाभीक नामक गावाचे दान असा होतो.

बाविसाव्या क्रमांकाच्या लेण्यात सुद्धा एक शिलालेख असून त्यावर शालिवाहन कुले कृष्णे राजती नासिककेन श्रमणेन महामात्ये लयन कारीत असा लेख असून त्याचा अर्थ शालिवाहन (सातवाहन) कुळात कृष्णराजा राज्य करीत असता नाशिक येथे राहणाऱ्या त्याच्या श्रमण महामात्य यांनी हे लेणे करवून घेतले असा होतो.  

पांडवलेणी समूहातील लेणी क्रमांक तीन मधील शिलालेखात गौतमी सातकर्णीची माता गौतमी आणि सातकर्णी या दोघांचे वर्णन असून दहाव्या लेण्यात उघवदात नामक क्षत्रप राजाचा शिलालेख आहे व त्यामध्ये त्याने तीन लाख गायींचे गोदान केल्याचा उल्लेख आहे तर चौदाव्या क्रमांकाच्या लेण्यात उघवदात याच राजाने सहस्रभोजने दिल्याचा उल्लेख आहे.

पांडवलेणी ही बौद्ध लेणी असून त्यांच्यावर बौद्ध धर्मातील हीनयान पंथातल्या भद्रयानी या उपपंथाचा प्रभाव आढळतो. बौद्ध भिक्षूंच्या निवासासाठी या लेण्यांची निर्मिती करण्यात आली होती.

लेण्यांमध्ये तथागत गौतम बुद्ध आणि बोधिसत्व यांच्या अनेक मूर्ती कोरल्या असून महाराष्ट्राच्या लयन स्थापत्याचा वारसा जपणारी पांडवलेणी महाराष्ट्रातील इतिहास व संस्कृतीप्रेमी लोकांनी एकदा तरी पाहायलाच हवी.