कोटमसर गुंफा - जमिनीखालचे अद्भुत

कोटमसर गुहा प्रसिद्ध आहेत त्या इथे असलेल्या लवणस्तंभांसाठी. इंग्रजीत याला stalactite असे म्हणतात. इथला खडक कॅल्शियम कार्बोनेटयुक्त म्हणजे चुनखडीचा आहे.

कोटमसर गुंफा - जमिनीखालचे अद्भुत

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

विपुल निसर्गसंपदा लाभलेला छत्तीसगड प्रदेश आणि तिथे असलेली विविध ठिकाणे केवळ अवर्णनीय आहेत. या प्रदेशाबद्दल बोलण्यासारखे बरेच काही आहे. खरंतर बोलण्यापेक्षा इथे जाऊन इथले सगळे वैभव अनुभवायला हवे. कोटमसर गुहा हे त्याचेच उदाहरण. जगदलपुर पासून ३५ किलोमीटरवर वसलेले हे ठिकाण कांगेर राष्ट्रीय उद्यानात समाविष्ट होते. कांगेर नदीच्या काठावर वसलेले हे नैसर्गिक ठिकाण. इथून जवळच कांगेर धबधबा कोसळत असतो.

कोटमसर गुहा प्रसिद्ध आहेत त्या इथे असलेल्या लवणस्तंभांसाठी. इंग्रजीत याला stalactite असे म्हणतात. इथला खडक कॅल्शियम कार्बोनेटयुक्त म्हणजे चुनखडीचा आहे. यातले क्षार पाण्यात विरघळतात आणि पाण्याच्या थेंबांबरोबर ते खाली झिरपतात. इथल्या उष्ण हवेने त्यातले पाणी उडून जाते आणि क्षार तसेच शिल्लक राहतात. पुढे त्याच्या अधोमुखी कांड्या, किंवा स्तंभ तयार होतात. हे सगळे व्हायला लाखो वर्षे जावी लागतात. कोटमसर इथल्या गुहेत stalactite च्या नुसत्या कांड्या नव्हे तर स्तंभ, भिंती तयार झाल्या आहेत.

हे अद्भुत बघायला इथे जमिनीखाली ७० फूट उतरून जावे लागते. खाली गेल्यावर जवळजवळ २०० मीटर लांब अशा गुहेत आपण येतो. इथे येण्यासाठी दगडी पायऱ्या आणि लोखंडी गोल जिना उतरून यावे लागते. आत आल्यावर सिमेंटचे रस्ते तयार केलेले आहेत. हातातल्या विजेरीच्या उजेडात आपल्याला हे अद्भुत दिसून येते. काही ठिकाणी आपल्या डोक्यावर झुंबर झालेले दिसते तर काही ठिकाणी आपली वाट या लवणभिंतींनी अडवलेली दिसते. हे सगळे अद्भुत अनुभवायला हवे. नुसते वाचून काय समजणार. गुहेत ऑक्सिजनचे प्रमाण काहीसे कमी असते. निरनिराळे आकार या लवणस्तंभात तयार झालेले दिसून येतेत.

कांगेर राष्ट्रीय उद्यानाच्या दाराशी आपले वाहन ठेऊन पुढे १२ किलोमीटर जिप्सी गाडीतून जावे लागते. हा रस्ता जंगलातून जातो. वाटेत असंख्य वारुळे दिसून येतात. सोबत गाईड घेणे सक्तीचे आहे. अर्थात त्याच्या मदतीशिवाय या गुहा आणि त्यातले निसर्गनवल समजणे केवळ अशक्य गोष्ट आहे. छत्तीसगड या अलीबाबाच्या गुहेतले कोटमसर गुंफा हे एक अनमोल रत्न म्हणावे लागेल.

- आशुतोष बापट