घटोत्कच - महाभारतातील बलवान योद्धा
पांडव व कौरव सेनेचे कुरुक्षेत्रावर युद्ध सुरु झाले त्यावेळी घटोत्कच साहजिकच पांडवांच्या पक्षाकडून लढत होता. घटोत्कच हा अवाढव्य असल्याने त्याचा रथ हा आठ चाकांचा होता आणि तो ओढायला शंभर अश्व होते.
महाभारतातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींपैकी एक म्हणजे भीमपुत्र घटोत्कच. पांडव वनवासात असताना भीमाकडून हिडिंब नामक राक्षसाचा वध झाला त्या राक्षसाची हिडिंबा ही बहीण होती.
हिडिंबा ही अत्यंत सुस्वरूप अशी असून भीमाला पाहताक्षणीच ती त्याच्या प्रेमात पडली व कुंतीस भीमासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. हिडिंब राक्षसाच्या वधानंतर कुंतीने भीमास हिडिंबेची इच्छा सांगून भीमास विवाहास तयार केले व दिवसा तू भीमासोबत राहू शकतेस मात्र संध्याकाळ झाल्यावर भीम हा आमच्यासोबतच राहील या अटीवर भीमास हिडिंबेसोबत विवाहास होकार दिला. भीमानेही हिडिंबे कडून एक वचन घेतले की तुला पुत्र होईपर्यंतच मी तुझ्यासोबत राहू शकेन कारण माझ्यासमोर पुढे अनेक कर्तव्ये आहेत. हिडिंबेनेही भीमाचे ऐकले व काहीकाळ काहीकाळ भीमासोबत संसार केल्यावर तिला भीमाकडून घटोत्कच नामक पुत्र झाला.
घटोत्कचास डोक्यावर जन्मापासूनच केस नसल्याने त्याचे डोके एखाद्या गुळगुळीत घटासारखे दिसे त्यामुळे यास घटोत्कच असे नाव मिळाले.
घटोत्कचचा जन्म झाल्यावर पूर्वीच वचन घेतल्याप्रमाणे भीम हा आपल्या पुढील कार्यासाठी हिडिंबेचा त्याग करून निघून गेला त्यामुळे घटोत्कचचे बालपण हे त्याची आई हिडिंबेच्या सानिध्यातच गेले. घटोत्कच हा बलवान व उंच असून माता राक्षस कुळातील असल्याने या कुळातील अनेक विद्या त्यास प्राप्त झाल्या ज्यामध्ये हवे ते रूप व आकार धारण करणे, गुप्त होण्याची कला आणि कुणी बोलावले तर त्वरीत त्या जागी प्रकट होणे इत्यादी अनेक विद्या होत्या.
पांडव वनवासात असताना घटोत्कचाची आपल्या पित्यासोबत म्हणजे भीमासोबत भेट झाली व पुढे घटोत्कचास त्याने आपल्यासोबत राहावयास बोलवले. पांडवांसोबत राहत असताना त्याच्यावर श्रीकृष्ण व पांडवांची निःसीम कृपा झाली. युधिष्ठिराने श्रीकृष्णाची संमती घेऊन घटोत्कचाचे लग्न मुरू नामक दैत्याची कन्या मौर्वी सोबत निश्चित केले. मौर्वी सोबत विवाह करण्यापूर्वी घटोत्कचास तिने केलेला एक पण जिंकावा लागला.
मौर्वीस कामकंटका या नावानेही ओळखले जाई व ती अतिशय हुशार आणि शूर होती व बुद्धी आणि शक्तीत जो पुरुष मला जिंकेल त्याच्याशीच मी विवाह करेन असा पण तिने लग्नाआधी ठेवला होता मात्र घटोत्कचाने आपल्या शक्तीच्या व युक्तीच्या जोरावर हा पण जिंकला आणि मौर्वीस वरमाला प्रदान केली.
पांडव व कौरव सेनेचे कुरुक्षेत्रावर युद्ध सुरु झाले त्यावेळी घटोत्कच साहजिकच पांडवांच्या पक्षाकडून लढत होता. घटोत्कच हा अवाढव्य असल्याने त्याचा रथ हा आठ चाकांचा होता आणि तो ओढायला शंभर अश्व होते. घटोत्कचा धनुष्य चालवण्याच्या कलेतही प्रवीण असून त्याच्या धनुष्याचे नाव पौलस्त्य असे होते. घटोत्कचाच्या रथाचे सारथ्य विरुपाक्ष पाहत असून रथावर गिधाडाचे चिन्ह असलेला ध्वज होता जो शत्रुंना गिधाडासारखे फस्त करण्याचा संदेश देत होता.
युद्ध सुरु असताना एका रात्री महारथी कर्णाने पांडव सेनेवर हल्ला करून पांडवांच्या सैन्याची फार मोठी हानी केली. कर्णाकडे त्यावेळी वासवी नामक शक्ती असल्याने अर्जुनही त्याच्याविरोधात युद्ध करण्यास धजावेना त्यामुळे कृष्णाने घटोत्कचास कर्णावर पाठवले. घटोत्कच कर्णाच्या सैन्यात शिरून त्याने कर्णाच्या सैन्यातील अनेकांना ठार मारले. कर्णाच्या सैन्यामध्ये अलायुध आणि अलंबुण नावाचे दोन पराक्रमी राक्षस सेनापती होते. घटोत्कचाने दोघांना ठार मारून अलायुधाचे शीर घेऊन घटोत्कच दुर्योधनाची चेष्टा उडवण्यासाठी त्याच्या शिबिरात गेला आणि दुर्योधनाच्या समोर अलायुधाचे शीर ठेवून लवकरच कर्णाचेही शीर कापून परत येतो असे सांगून घटोत्कच परत समरांगणात गेला आणि पुन्हा एकदा कौरव सेनेतील अनेक सैन्य ठार मारले.
कौरव सेनेत हाहाकार उडवल्यावर घटोत्कचाने थेट कर्णाच्या दिशेने मोर्चा वळवला मात्र कर्ण हा अनेक युद्धकलांत पारंगत असल्याने त्याने आपल्या अतिशय प्रबळ अशा वासवी शक्तीचा प्रयोग घटोत्कचावर केला आणि त्या आघाताने घटोत्कच थेट मरणपंथाला लागला मात्र आपला मृत्यू आता जवळ आला आहे हे उमजून जमिनीवर कोसळताना घटोत्कचाने आपल्या शरीराचा आकार आपल्या विद्येच्या बळावर वाढवला आणि आपले शरीर त्याने जमिनीवरील असंख्य कौरव सैन्याच्या अंगावर कोसळवले ज्यामुळे हजारोंच्या संख्येने कौरव सैन्य ठार झाले.
राक्षसकुळातील जन्म असून घटोत्कचाने पांडवाच्या बाजूने लढा देऊन आपले बलिदान दिले व जिवंत असताना कौरव सेनेची हानी केलीच मात्र मृत्यूनंतरही आपल्या शरीराच्या मदतीने त्याने अनेक कौरव सैन्य ठार केले ज्याचा पांडवांना पुढे युद्धात कौरवांवर वरचढ होण्यासाठी निश्चित फायदा झाला.