रांगोळीचे माहात्म्य

रांगोळी म्हटले कि आनंदोत्सव, सुशोभन, स्वागत सन्मान, मंगल पवित्र वातावरण डोळ्यासमोर येते.

रांगोळीचे माहात्म्य

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आपल्याकडे रांगोळीला असाधारण महत्व आहे. दिवसाची, पूजेची व शुभकार्याची सुरुवात सडासंमार्जन व रांगोळीने अजूनही होते.

रांगोळी काढण्याची प्रथा केव्हापासून सुरु झाली याचा उल्लेख मान्यवर लेखकांनी केलेला आढळतो. त्यांचे ऋणात राहून यासंबंधी थोडी माहिती घेऊ या.

इसवी सन ६५० च्या सुमारास गद्य चिंतामणी या ग्रंथातील पंगतीच्या वर्णात तांबड्या रंगाचे मंगलचूर्ण म्हणजे रांगोळीचा उल्लेख केला गेला आहे. लीळाचरित्र या इसवी सन १२५० च्या सुमारास लिहिल्या गेलेल्या महानुभाव ग्रंथात सुद्धा रांगोळीचा उल्लेख सापडतो. इसवी सन १४०० च्या आसपास लिहिल्या गेलेल्या आकाश भैरव कल्प यात वेदिका वर्णन करताना रंगवल्या असा रांगोळीचा उल्लेख येतो. 

इसवी सन १६५० च्या सुमारास संत रामदासाच्या ग्रंथात रंगमाला ही संज्ञा त्यांनी रांगोळीस दिली 'तुळसीवने वृंदावने । सुंदर सडे संमार्जनें। ओटे रंगमाला आसने। ठाई ठाई।। या समर्थांच्या मानसपूजा या प्रकरणात रांगोळीचा उल्लेख झाला आहे.

रांगोळी या शब्दाचा उल्लेख प्रथम कवी मोरोपंत यांनी विराटपर्व काव्यात केला आहे. घालू पाहसी दंष्ट्रा, उपडाया अहींमुखात आगोळी, ऐसे साहस करीता होईल तनूची पळांत रांगोळी' येथे रांगोळी हा शब्द चूर्ण अथवा भस्म या अर्थी वापरला आहे.

रांगोळी या कलेचा चौसष्ट कलांपैकी एक म्हणूनही उल्लेख केला गेला आहे. रांगोळी या कलेचे प्रयोजन पुढीलप्रमाणे आहे. 

  • कलेसाठी कला 
  • जीवनासाठी कला 
  • जीवशनाची वास्तविकतेतून सोडवणूक करून घेण्यासाठी कला
  • जीवनमंदासाठी कला
  • सेवेचे साधन म्हणून कला 
  • आत्मानुभूती कला

आणि अशी ही कला परमेश्वरास अर्पण करण्यामागे उद्देश आहे.

आता प्रचलित असलेली पांढरीशुभ्र रांगोळी, दगडापासून बनवलेली जंतुनाशक पावडर, सुशोभनाबरोबर आरोग्याचा विचार केलेला आहे. रांगोळ्या वास्तूच्या बाहेर उंबरठ्यावर, देवघराच्या बाहेर, यज्ञकुंडा भोवती, पंगती भोवती काढतात हे तर आपणा सर्वांना माहिती आहेच.

चौरंगाभोवती अथवा यज्ञकुंडाभोवती ३ बोटे, ४ बोटे वापरून काढलेली रांगोळी आपण पाहतो. यावेळी चिमटीत नव्हे तर मूठभर रांगोळी घेऊन बोटांमधून सोडून वळणदार रेषा काढल्या जातात व तयार होते ती एक सुंदर अशी रांगोळी.

- श्रीमती मंगला लवाटे (नाशिक)