नरकचतुर्दशी - दीपावलीचा मुख्य दिवस
फार पूर्वी नरकासुर नामक एक बलाढ्य असुर प्राग्यज्योतिषपूर नामक ठिकाणी राज्य करीत होता. नरकासुरास भौमासुर असे दुसरे नाव होते.
दीपावली हा फक्त एक सण नसून अनेक सणांचा एक महोत्सव आहे व या महोत्सवातील सणांपैकी एक सण म्हणजे नरकचतुर्दशी. हा सण दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी असतो. हा सण पिढ्यानपिढ्या आपण साजरा करीत आलो असलो तरी या सणाचा इतिहास काय हे सध्या अनेकांना फारसे माहित नसते त्यामुळे या लेखात आपण नरकचतुर्दशी या सणाची माहिती घेण्याचा प्रयत्न करू.
फार पूर्वी नरकासुर नामक एक बलाढ्य असुर प्राग्यज्योतिषपूर नामक ठिकाणी राज्य करीत होता. नरकासुरास भौमासुर असे दुसरे नाव होते. नरकासुर अतिशय शक्तिशाली असल्याने त्याने आसमंतातील अनेक राज्ये पादाक्रांत केली व यानंतर थेट इंद्रावर आक्रमण करून त्याचे छत्र, आदिती देवीची कुंडले आणि अमरपर्वत नामक पर्वतावरील माणिपर्व हे स्थान हस्तगत केले. या तीन अद्भुत गोष्टी प्राप्त झाल्याने त्यास अधिक शक्ती मिळून तो देव आणि मानव दोघांनाही त्रास देऊ लागला.
आपल्या राज्यावर कुणीही हल्ला करू नये म्हणून त्याने आपल्या राजधानीच्या चोहो दिशांना मोठं मोठे कोट उभारले आणि त्यांना मजबूत तटबंदी करून त्यांवर शस्त्रास्त्र धारी सैन्य स्थापित केले. कालांतराने नरकासुराचा त्रास स्त्रियांसही होऊ लागला. ज्या राज्यांवर तो हल्ला करत असे तेथील उपवर स्त्रियांना कैद करून तो आपल्या राज्यात डांबून ठेवत असे व या स्त्रियांची संख्या सोळा सहस्त्र म्हणजे सोळा हजार एवढी होती.
एके दिवशी नरकासुराने एकाच वेळी या सोळा सहस्त्र उपवर स्त्रियांशी विवाह करण्याचा निश्चय केला आणि भरतखंडात हाहाकार उडाला. अनेक राजांनी मग श्रीकृष्णाची भेट घेऊन त्यास आपल्याला मदत करण्याची विनंती केली व ही विनंती मान्य करून त्याने आपल्या सैन्यासहित नरकासुराच्या राज्यावर चाल केली. यावेळी कृष्णासहित पत्नी सत्यभामा सुद्धा होती.
कृष्णाने नरकासुराच्या अभेद्य दुर्गावर हल्ला करून त्याचा पराभव केला आणि त्यास ठार मारले आणि अशाप्रकारे या सोळा सहस्त्र स्त्रियांची नरकासुरापासून सुटका झाली. कृष्णाने नंतर या स्त्रियांची त्यांच्या राज्यात पाठवणी करून नरकासुराने ज्या राजांची राज्ये बळकावली होती त्यांना ती परत केली.
ही मोहीम संपवून नरकासुराच्या रक्ताचा टिळा कपाळास लावून विजयी कृष्ण आपल्या राजधानीस परतला तो दिवस चतुर्दशीचा होता. राजधानीत आल्यावर नंदाने त्यास मंगल स्नान घातले आणि स्त्रियांनी दिवे ओवाळून आनंद व्यक्त केला. यावेळी संपूर्ण राज्य एका आनंदोत्सवात मग्न झाले.
हा आनंदोत्सवाचा दिवस म्हणजेच नरक चतुर्दशी व हजारो वर्षे होऊन गेली तरीही हा उत्सव तेवढ्याच आनंदाने आजही साजरा केला जातो हे आपल्या भारतीय संस्कृतीचे महत्व आहे. नरक चतुर्दशीचा दिवस हा दिवाळीतील मुख्य दिवस मानला जातो व या दिवशी पहाटे उठून अभ्यंगस्नान करून नरकासुराचे प्रतीक असलेले चिरांटे नावाचे एक फळ पायाने फोडले जाते आणि यानंतर घरातील स्त्रिया पुरुषांची ओवाळणी करतात. नरकचतुर्दशीच्या दिवशी गुजरात व राजस्थान मध्ये हनुमानाची पूजा करण्याची प्रथा सुद्धा आहे.