गुढी पाडवा - हिंदू नववर्षाचा स्वागत सोहळा
चैत्र महिन्याचे स्वागत दारासमोर तोरण उभारून करण्याची परंपरा फार पूर्वीपासून आपल्याकडे चालत आली आहे व या पारंपरिक सणाचे नाव म्हणजे गुढी पाडवा.

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा
आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा
चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात नव्या वर्षाचा आरंभ. चैत्र महिन्यापासुन वसंत ऋतूचा आरंभ होतो. वसंत ऋतूस ऋतूंचा राजा म्हटले जाते व याच्या आगमनाने संपूर्ण सृष्टीच हर्षाने उल्हासित होते. झाडांना पालवी फुटते. सृष्टीस नवजीवन देणारा असा हा वसंत ऋतू आणि मानवतेस नववर्ष देणारा असा हा चैत्र महिना.
याच चैत्र महिन्याचे स्वागत दारासमोर तोरण उभारून करण्याची परंपरा फार पूर्वीपासून आपल्याकडे चालत आली आहे व या पारंपरिक सणाचे नाव म्हणजे गुढी पाडवा. गुढीपाड्वाच्या दिवशी गृहिणी पहाटे पहाटे उठून अंगण सरावतात. एका उंचशा बांबूवर सुंदर अशा वस्त्राची साज चढवतात आणि वर तांबा अथवा पितळेचे (हल्ली स्टीलचे) पात्र ठेवून गुढी तयार करतात. या गुढीस फुलांच्या माळा व आंब्याची पाने यांचा साज असतो. गुढी तयार झाली की हळद, कुंकू, गंध आणि फुले यांनी पूजा केली जाते.
गाव असो व शहर महाराष्ट्रातील प्रत्येक भागात अशा रंगीबेरंगी गुढ्या घराच्या छपरावरून उठवलेल्या दिसतात. सर्व मंडळी एकमेकांना भेटून नववर्षाच्या शुभेच्छा देतात. हल्ली व्हाट्सऍप मुळे ऑनलाईन शुभेच्छा देण्याची प्रथा प्रसिद्ध आहे.
याच दिवशी पूर्वी कडुनिंबाचा पाला सेवन करण्याची प्रथा होती. कडुनिंबाचा पाला हा अतिशय औषधी असून शरीर संवर्धनास अतिशय उपयुक्त आहे असे म्हटले जाते. कडुनिंबाची पाने गरम पाण्यात टाकून आंघोळ केल्यास अनेक त्वचारोगांचा नाश होतो असेही म्हटले जाते. कडुनिंबाचा पाला हा प्रकृतीने थंड असल्याने त्याचे सेवन केल्याने शरीरातील दाह कमी होतो. कडू रसाचे सेवन हे कफाच्या विकारांवरही गुणकारी असते असे म्हटले जाते. सध्याच्या रोंगानी ग्रासलेल्या जगात जुन्या काळातील निसर्गोपचार पद्धतींचा प्रचार पुन्हा एकदा होणे गरजेचे आहे.
गुढीपाडव्याच्या दिवशी घरोघरी मिष्टान्न तयार केली जातात व संपूर्ण कुटुंब मेजवानीत सहभागी होते. गुढीपाडव्याचा सण पूर्वी महिनाभर विविध पद्धतीने साजरा केला जात असे. वसंतगौरी हा सण याच प्रथेपैकी एक होता. या काळात हळदीकुंकू असायचे. चैत्रगौरी या काळात माहेरी येते असे म्हटले जाते. आजही मराठी संस्कृतीमध्ये माहेरी जाण्याचा काळ हाच मानला जातो व वर्षातून एकदा सर्व गृहिणी आपापल्या लहानग्यांसोबत माहेरी जाऊन आपल्या माहेरच्या माणसांसोबत प्रेमाचे दोन क्षण व्यतीत करतात.
गुढीपाडवा सण केव्हापासून सुरु झाला या बद्दल अनेक कथा आहेत. प्रभू रामचंद्र १४ वर्षांचा वनवास संपवून अयोध्येस परतले त्यावेळी अयोध्येतील नागरिकांनी त्यांच्या स्वागतासाठी दारोदारी गुढ्या उभारल्या तेव्हापासून ही प्रथा सुरु झाली असे म्हटले जाते याशिवाय ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टीच्या निर्मितीस सुरुवात केली असाही एक समज आहे. सातवाहन कुळातील गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा पराभव करून नव्या कालगणनेस सुरुवात केली तोच हा दिवस.
ही झाली प्राचीन उदाहरणे मात्र मध्ययुगातही महाराष्ट्रात गुढी पाडवा हा सण उत्साहाने साजरा केला जात असल्याचे उल्लेख ऐतिहासिक साधनांत मिळतात. सन १६४९ सालचे एक पत्र आहे त्यात पुढील उल्लेख आहे.
मार्गशीष शुद्ध १ विरोधीनाम सवंस्तर शके १५७१ अथवा सुहूर सन खसेन अलफ, सोमवार दिवसी राजेश्री नीलकंठराऊ यासी कासाराचे घरी गुढीयाचा पाडवा व चैत्री पुनीव व स्रावणी पिणीव व कुलधर्म करील तेथे हाक उतपन फळावर येईल तो तिघी जणी वाटोण घेणे
असे अनेक ऐतिहासिक दाखले गुढी पाडवा सणाची महती स्पष्ट करतात. आपले सण हे आपल्या संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहेत. लोकांनी एकत्र यावे व नवनिर्मिती करावी हा दूरदृष्टीपुरक उद्देश त्यामागे होता. आधुनिक काळात या सणाचे शास्त्रीय महत्व लोप पावत आहे मात्र सध्याच्या काळात मानवजात एका भयंकर संकटातून जात आहे अशावेळी आपल्या सणांमध्ये लपलेले शास्त्रीय ज्ञान शोधण्याचा प्रयत्न केला तर हे संकट दूर करण्यास किंवा त्यांची तीव्रता कमी करण्यास या सणांचा नक्कीच उपयोग होईल असे वाटते.