रामनवमी - प्रभू रामचंद्रांचा जन्मसोहळा

रामनवमी म्हणजे प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव. महाराष्ट्रात व भारतात तो मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. अदमासे ५००० वर्षांपूर्वी प्रभू रामचंद्रांचा अवतार पृथ्वीवर झाला. तो दिवस होता चैत्र शुद्ध नवमी.

रामनवमी - प्रभू रामचंद्रांचा जन्मसोहळा

Marathi Buzz Shop

Marathi Buzz Shop

दशरथपुत्र प्रभू रामचंद्र म्हणजे साक्षात विष्णूच्या १० अवतारांपैकी एक. समस्त भारतात रामाची भक्तिभावे पूजा केली जाते. अगदी भारतच नव्हे तर पूर्वेकडील इंडोनेशिया आणि कंबोडिया सारख्या देशांतही रामायण हा ग्रंथ प्रमुख ग्रंथांपैकी एक मानला जातो. वाल्मिकी रामायणाची अत्यंत जुनी प्रत ही इंडोनेशिया या देशात सापडली होती. गेल्या काही शतकांत तेथील लोकांचे धर्म बदलले असले तरी त्यांनी आजही आपली संस्कृती सोडलेली नाही.

आजही त्या देशांतील अनेकांची नावे रामा, लक्ष्मणा अथवा पौराणिक भारतीय इतिहासातील व्यक्तिरेखांची दिसून येतात. प्रभू रामचंद्र भारतीय जनमानसात त्यांच्या चरित्रासाठी प्रसिद्ध आहे. चांगल्या राज्यास रामराज्य असे म्हणण्याची परंपरा आजही आहे. एखाद्या समस्येवर कायमचा इलाज करायचा असेल तर त्यास रामबाण उपाय म्हणायची सुद्धा परंपरा आहे किंवा मग जर कोणी ओळखीचा भेटला तर पूर्वी राम राम करण्याची पद्धत होती. हल्ली त्या पद्धतीची जागा हॅलो या शब्दाने घेतली आहे. अंत्ययात्रेही रामनाम सत्य है असे म्हटले जाते. तर असे हे राम नावाचे दैवत आपल्या दैनंदिन जीवनाचा एक घटक झाले आहे. 

आपल्या महाराष्ट्रात राम राम असे म्हणण्याची पद्धत फार पूर्वीपासून होती यासाठी १६४६ साली लिहिलेल्या एका पत्राचे उदाहरण घेऊ.

चंद्रराव मोरे जावळीकर यांना अफजलपुर उर्फ बावधनचे बादशाही हवालदार यांनी लिहीलेले एक पत्र आहे जे इसवी सन १६४६ सालचे आहे. या पत्रात सदर हवालदार चंद्रराव मोरेंना राम राम असे म्हणतात. पत्रातील थोडासा मजकूर पुढीलप्रमाणे..
"मा हा राजमान्याविराजीत राजमान्य राजश्री चंदरराऊ गोसावी यांस, श्रीमत प्रहुडीप्रताप अखंडीत लक्ष्मी आलंकृत परोपकार मुर्ती महामेरु राजमान्य राजश्री प्रती स्नेहांकीत गोमाजी नरसिंह व रामाजी कृष्ण हवाले अफजलपुर महमूदशाही का बावधान पा वाई 'रामराम' विसेश येथील क्षेम तो धर्मश्री"
यावरुन लक्षात येईल की आपल्या महाराष्ट्रात राम राम असे म्हणण्याची पद्धत सन १६४६ च्या पुर्वीपासून होती.

रामनवमी म्हणजे प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव. महाराष्ट्रात व भारतात तो मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. अदमासे ५००० वर्षांपूर्वी प्रभू रामचंद्रांचा अवतार पृथ्वीवर झाला. तो दिवस होता चैत्र शुद्ध नवमी. त्या काळी अयोध्या, मिथिला, काशी, विदेह अशी मोठं मोठी राज्ये अस्तित्वात होती यामधील अयोध्या या राज्यातील महाराजा दशरथ व महाराणी कौसल्या यांचे राम हे ज्येष्ठ पुत्र. 

अयोध्या नगरी गंगा व गंडकी या नद्यांच्या दरम्यान वसली होती. महाराजा दशरथ हे सूर्यवंशी कोसल राजवंशातील सम्राट होते. त्यांना तीन पत्नी होत्या, कौसल्या सुमित्रा व कैकेयी, या तीन राण्यांपासून त्यांना राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न असे चार पुत्र झाले.

पुढे कैकेयीच्या हट्टापायी प्रभू रामचंद्रांनी वनवास स्वीकारायचे ठरवले. आपली पत्नी व विदेह देशाची राजकन्या सीता आणि बंधू लक्ष्मण यांच्यासहित ते दंडकारण्यात वनवास व्यतीत करण्यास गेले.

लंका नगरीचा राजा रावण या पूर्वी स्वयंवरात रामासमोर हरल्याने त्याने या अपमानाचा सूड उगवण्याचा चंग बांधला होता यासाठी त्याने मारीच राक्षसासोबत दंडकारण्यात आला आणि सीतेचे हरण केले आणि तीस आपल्या राजधानीस घेऊन गेला. 

सीतामाईस परत आणण्यासाठी रामाने वानरसेनेची एक मोठी फौज उभारली. या सेनेत हनुमान, नल, निल, जांबुवंत, वाली, सुग्रीव असे पराक्रमी सेनापती होते. अनेक संकटाना तोंड देऊन रामाने रावणाचा पराभव केला आणि चैत्र शुद्ध प्रतिपदेस सीतामाईसह आपला १४ वर्षांचा वनवास संपवून ते पुन्हा अयोध्येस आले.

यानंतर खऱ्या अर्थाने अयोध्येस रामराज्य सुरु झाले. राम नवमीच्या निमित्ताने रामराज्याची संकल्पना काय ती समजावून घेऊ. रामराज्य म्हणजे ज्या ठिकाणी नैतिकतेस अग्रस्थान दिले जाते. ज्या राज्यात ज्येष्ठ लोकांबद्दल आदर असतो. गुरु, आई, वडील यांच्या आज्ञेचा अवमान होत नाही. जेथे गरीब एक दिवशीं भुकेला झोपत नाही. गुन्हेगारी, भ्रष्टाचार इत्यादींना जेथे स्थान नसते ते रामराज्य.

चैत्र शुद्ध नवमीस मध्यान्हास प्रभू श्रीरामाचा जन्म झाला त्यामुळे याच वेळी रामनवमी साजरी केली जाते. राम मंदिरात बालरामास पाळण्यात घालून भजन व कीर्तन केले जाते. यावेळी स्वस्तिक इत्यादी मंगलमय चिन्हांनी पाळण्याची आरास करतात. या दिवशी उपवास पाळला जातो. अनेक ठिकाणी चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून रामनवमी पर्यंत उत्सव केला जातो. या काळात रामायणाचे सामूहीकी पारायण केले जाते. तर अशी होती रामनवमीची माहिती व महती. रामनवमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा..