किल्ले रायगडाचे भवानी टोक व भवानी मातेचे मंदिर

भवानी टोक हे रायगड किल्ल्याच्या पूर्वेकडील टोक असून त्यास अतिशय तीव्र अशा उताराचे नैसर्गिक संरक्षण लाभले आहे.

किल्ले रायगडाचे भवानी टोक व भवानी मातेचे मंदिर

स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावरील प्रत्येक स्थळाचा स्वतःचा असा महिमा आहे. येथील प्रत्येक स्थळ हे स्वराज्याच्या राजधानीचे चिरंतन वैभव आहे. किल्ले रायगडावरील असंख्य स्थळांपैकी एक स्थळ म्हणजे किल्ले रायगडावरील भवानी देवीचे मंदिर.

रायगडास एकूण चार टोके आहेत ज्यांना टकमक टोक, हिरकणी टोक, श्रीगोंदा टोक आणि भवानी टोक अशी नावे आहेत व यापैकी भवानी टोकावर भवानी देवीचे हे प्रसिद्ध स्थान असून ते अतिशय अवघड अशा ठिकाणी आहे.

भवानी टोक हे रायगड किल्ल्याच्या पूर्वेकडील टोक असून त्यास अतिशय तीव्र अशा उताराचे नैसर्गिक संरक्षण लाभले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थापासून पूर्वेस बरेच अंतर गेल्यावर भवानी टोक दृष्टीस पडते. 

रायगड किल्ल्याचे नीट निरीक्षण करता सर्वाधिक बांधकामे ही हिरकणी, श्रीगोंदा आणि टकमक टोकाच्या आसमंतात झालेली दिसून येतात मात्र भवानी टोकाच्या आसमंतात फार कमी बांधकामे असून या ठिकाणी पूर्वी शिबंदीच्या लोकांची घरे होती. आजही या ठिकाणी जाताना या घरांच्या जोत्यांचे अवशेष दिसून येतात. 

महाराजांच्या राज्याभिषेकावेळी रायगडास आलेल्या हेन्री ओक्सेंडन याचा मुक्काम त्या काळात भवानी टोकाच्या आसमंतातच होता.  शिबंदीच्या घरांची जोती पार करून आपण जेव्हा भवानी टोकाच्या दिशेने जातो त्यावेळी काही अंतरावर दक्षिणेकडे एका वास्तूचे जोते दिसून येते व बाकी सर्व परिसर मोकळा दिसतो.

बरेच अंतर चालून गेल्यावर किल्ल्याचा भाग निमुळता होऊ लागतो आणि ज्या ठिकाणी किल्ल्याच्या पूर्वेची हद्द येते त्या हद्दीस भवानी टोक अथवा भवानी कडा या नावाने ओळखले जाते.

भवानी टोकाचे वैशिट्य म्हणजे याच कड्याखाली काही अंतरावर भवानी देवीचे एक शिवकालीन मंदिर आहे. मंदिराकडे जाण्यासाठी अदमासे ३५-४० मीटर खोल दरीत उतरावे लागते व एका ठिकाणी दक्षिणेस जाणारी एक निमुळती पायवाट आहे या पायवाटेने थोडा प्रवास केल्यावर भवानी देवीचे एक छोटेखानी मंदिर दृष्टीस पडते. या मंदिराची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली होती. 

हे मंदिर भवानी टोकाच्या खाली एका निमुळत्या खडग्यात बांधण्यात आले असून लेणीसदृश असे हे मंदिर आहे. कड्याच्या पोटात कोरीवकाम करून एक जागा बनवली गेली आहे व या ठिकाणी देवीची एक मूर्ती आहे मात्र ही मूर्ती काही वर्षांपूर्वी येथे बसवण्यात आली असावी असे वाटते व मूळ शिवकालीन मूर्ती या ठिकाणी दिसून येत नाही. आपल्या महाराष्ट्रात आजही अशी अनेक देवस्थाने आहेत ज्या ठिकाणी देवता मूर्तिरूपात दिसून येत नाहीत मात्र ते स्थळ हेच जागृत स्थान मानले जाते व तेथे देवीचा निवास आहे असे समजले जाते तसाच महिमा भवानी टोकाचा असावा.

देवीच्या मंदिराची जागा ही ऐसपैस असून एकावेळी या ठिकाणी एका वेळी पाच ते सहा माणसे थांबू शकतात. कड्याचे टोक अतिशय तीव्र असल्याने भेट देणाऱ्यांच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी लोखंडी कठडे बसवण्यात आले आहेत. दर मंगळवारी म्हणजे देवीच्या वारी या ठिकाणी देवीची पूजा संपन्न होते. स्वराज्याच्या कुलदेवतेचे हे मंदिर रायगडास भेट देणाऱ्यांनी एकदा तरी पाहायलाच हवे.