किल्ले हडसर उर्फ पर्वतगड

हडसर किल्ला शिवजन्मस्थान शिवनेरीच्या पश्चिमेस असून तालुक्याचे ठिकाण असलेल्या जुन्नर शहरापासून १४ किलोमीटर अंतरावर आहे. गडाच्या पायथ्याशी हडसर हे गाव असून तेथूनच गडाकडे जाणारी वाट आहे.

किल्ले हडसर उर्फ पर्वतगड

पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील एक प्रसिद्ध गड म्हणजे हडसर. हडसर किल्ल्यास पर्वतगड असे दुसरे नाव असून हा किल्ला समुद्रसपाटीपासून अदमासे ११३० मीटर उंच आहे.

हडसर किल्ला शिवजन्मस्थान शिवनेरीच्या पश्चिमेस असून तालुक्याचे ठिकाण असलेल्या जुन्नर शहरापासून १४ किलोमीटर अंतरावर आहे. गडाच्या पायथ्याशी हडसर हे गाव असून तेथूनच गडाकडे जाणारी वाट आहे.

किल्ल्यावर जाण्यास दोन मार्ग असून त्यापैकी खुंटीच्या वाटेचा मार्ग दुर्गप्रेमींमध्ये प्रसिद्ध आहे. खुंटीच्या वाटेने जाताना कातळारोहण करत वर जावे लागते. उभ्या कातळकड्यात रोवलेल्या खुंट्यांचा आधार घेऊन वर जावे लागत असल्याने या वाटेस खुंटीची वाट हे नाव मिळाले आहे.

कातळ चढून वर आल्यावर प्रशस्त असे खोदीव टाके दृष्टीस पडते. येथून आसमंताचा नजारा आणि किल्ल्याच्या शेजारील डोंगर दृष्टीस पडतो. कातळात खोदलेल्या या खोलीसदृश वास्तू किल्ल्याचे प्राचीनत्व सिद्ध करतात.  खुंटीच्या वाटेवरून अजून काही अंतर पार केल्यावर आपण गडाच्या माथ्यावर येतो.

माथ्यावर प्रथम एक हनुमानाचे मंदिर दिसून येते. मंदिरात हनुमानाची सुरेख मूर्ती आहे. पुढे गेल्यावर वाटेत स्मारकशिला दिसून येतात. एकेकाळी राबता असलेल्या गडावरील वास्तूंचे अवशेष पाहून गडाच्या वैभवाची प्रचिती येते.

अवशेषांतून वाट काढून पुढे गेल्यावर कातळात खोदलेले स्थानिक देवतेचे मंदिर दिसून येते. वाटेत एका ठिकाणी पाषाणी वस्तू दिसून येते. गडावरील पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांचा समूह सुद्धा पाहण्यासारखा आहे. खडकात कोरलेली पिण्याच्या पाण्याची टाकी या ठिकाणी पाहावयास मिळतात.

हडसर गडावरील शिवमंदिर अत्यंत सुस्थितीत आहे. मंदिरासमोरील नंदीची मूर्ती भव्य व विलोभनीय आहे. मंदिराच्या दरवाज्याखाली कीर्तिमुख व दरवाज्यावर गणेशपट्टी आहे. मंदिराचा अंतर्भाग मोठा असून डाव्या बाजूस गणपती व उजव्या बाजूस हनुमान स्थानापन्न आहेत. सभागृहात अजून काही देवळ्या असून त्यात गरुडादी देवता आहेत.  गर्भगृहात अतिशय लोभस असे शिवलिंग आहे.

मंदिरापासून महादरवाज्याकडे जाताना थोड्या अंतरावर एक तलाव आहे. या ठिकाणी काही वाड्यांची जोती दिसून येतात. येथून गडाचा प्रशासकीय कारभार चालत असावा.

खडकाच्या पोटात खोदून काढलेली वाट विलक्षण अशा वास्तूकडे जाते व ही वास्तू म्हणजे गडावरील प्राचीन काळातील निवासाची जागा अथवा धान्याची कोठारे असावीत. या वास्तूंची शैली ही सातवाहन काळातील आहे. खोल्यांचे वैशिट्य म्हणजे येथे पायऱ्या उतरून खाली जावे लागते. गडावरील ही वास्तू एखाद्या लेण्यासारखीच आहे.

गडाच्या महादरवाज्यावर स्वराज्याचा जरीपटका डौलाने फडकताना दिसतो. नळीत खोदलेल्या पायऱ्या चढून वर आल्यावर गडाचा भव्य असा गोमुखी दरवाजा दृष्टीस पडतो. हडसर हा किल्ला प्राचीन आणि मध्ययुगीन दुर्गस्थापत्याचे एक उत्तम असे उदाहरण आहे.