कोर्लई किल्ला - इतिहास व माहिती
कोर्लई गावाच्या मागून जमिनीचा एक निमुळता तुकडा थेट उत्तरेकडे अरबी समुद्रात घुसला आहे याच तुकड्याच्या शेवटी अदमासे १०० मीटर उंच अशा टेकडीवर एक किल्ला आहे ज्याचे नाव कोर्लई किल्ला.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुका व मुरुड तालुक्यामध्ये कुंडलिका नदीची भव्य खाडी आहे. अलिबाग वरून आपण मुरुड जंजिराच्या दिशेस जाताना चौल रेवदंडा सोडले की ही खाडी पार करून जेव्हा आपण मुरुड तालुक्याच्या हद्दीत येतो तेव्हा आपल्याला लागणारे पहिले गावं म्हणजे कोर्लई. कोर्लईच्या पुढे बोर्ली नावाचे एक गाव आहे. कोर्लई व बोर्लई ही एकेकाळची जुळी गावे.
कोर्लई गावाच्या मागून जमिनीचा एक निमुळता तुकडा थेट उत्तरेकडे अरबी समुद्रात घुसला आहे याच तुकड्याच्या शेवटी अदमासे १०० मीटर उंच अशा टेकडीवर एक किल्ला आहे ज्याचे नाव कोर्लई किल्ला.
१६ व्या शतकात युरोपियन लोक यास रॉक ऑफ चौल असे म्हणत. १५२१ साली निजामशहाने पोर्तुगीजांना हा किल्ला बांधण्याची परवानगी दिली. पोर्तुगीजांना रोहा खाडीवरील व्यापारासाठी मोक्याच्या व सुरक्षित जागेची आवश्यकता होती व खाडीच्या सुरक्षेसाठी हा किल्ला उत्तम होता.
सुरुवातीस त्यांनी बाहेरचा कोट तयार केला आणि ज्याला स्थानिक भाषेत क्रुसाची वातेरी असे म्हणतात. त्याकाळी गुजरातच्या सुलतानाची सत्ता रायगड जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागात होती त्यांनी या कोटावर हल्ला केला मात्र चौलची कुमक मिळाल्याने गुजरातच्या आरमाराचा पराभव झाला. १५५३ मध्ये बुऱ्हाण निजामशाह वारल्यावर निजामशाहीमध्ये यादवी माजली त्याचा फायदा उचलण्याचे ठरवून पोर्तुगीजांनी कोर्लई बंदर मागितले तेव्हा निजामशहाने तिथे हल्ला केला. पोर्तुगीजांनी काळाची गरज ओळखून तह केला आणि निजामशहाने बाह्यकोट पाडून टाकला.
दुसरा बुऱ्हाण निजामशहाने पुन्हा एकदा तिथला ताबा घेऊन तिथे बुऱ्हाण दुर्ग हा किल्ला उभा केला. १५९४ साली चौलच्या पोर्तुगीजांच्या मदतीस साष्टी व वसई येथील पोर्तुगीज आले आणि त्यांनी ४००० सैनिकांसह कोर्लईवर हल्ला केला व निजामशाही सैन्याचा पराभव करून किल्ला ताब्यात घेतला.
पोर्तुगीज साधनांत किल्ल्याचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे.
हा किल्ला फारच भव्य असून त्यावर फक्त जमिनीवरूनच हल्ला करणे शक्य आहे. समुद्र व खाडी यांच्यामध्ये एक खंदक खोदला असून त्यावरील पुलावरूनच आत प्रवेश करता येतो. हा पूल उडवून टाकला तर किल्ल्यात जाणे अशक्य. खंदकाच्या आत भक्कम भिंत होती या भिंतीच्या दोन बुरुजांमध्ये भिंतीवर ब्रॉन्झ चा सिंह होता त्याखाली माझ्याशी लढल्याशिवाय आत प्रवेश नाही असे लिहिले होते. माथ्यावर बालेकिल्ला असून त्याच्या शिखरावर एक गरुड आहे. त्याच्या खाली 'माझ्या तावडीतून माशांशिवाय कुणाचीच सुटका नाही' असे लिहिले आहे.
१७३९ साली कोर्लई मराठ्यांच्या ताब्यात आला यानंतर त्याचा ताबा आंग्रे यांच्याकडे देण्यात आला. आंग्रेनी तेथे तोफा ओतण्याचा कारखाना सुरु केला. १८१८ साली किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.
कोर्लई किल्ला ९०० मीटर लांब व २७ मीटर रुंद आहे. किल्ल्यास एकूण ११ दरवाजे आहेत. मराठ्यांनी येथील बुरुजांची नावे पुसती, गणेश, पश्चिम देवी, चौबुरजी, राम व पान अशी दिली होती. गडावर पाण्याची टाकी सुद्धा आहेत. बालेकिल्ल्यावर अनेक इमारती आहेत. विशेष म्हणजे किल्ल्याच्या एका बाजूस घनदाट जंगल आहे तर दुसरी बाजू एकदम ओसाड आहे.
कोर्लई परिसर शेकडो वर्षे पोर्तुगीजांच्या ताब्यात असल्याने पोर्तुगीज सदृश भाषा आजही त्या गावात बोलली जाते जिचे नाव नॉ लिंग असे आहे. नॉ लिंग चा अर्थ होतो आमची भाषा आणि ही भाषा इतरत्र कुठेही वापरात नाही फक्त स्थानिक स्तरावरच तिचा वापर केला जातो. कोर्लईस पूर्वी मोरा असेही नाव होते त्यामुळे पोर्तुगीज कधी कधी याचा मॉरो असाही उल्लेख करत.
कोर्लई गाव हे अलिबाग मुरुड राजमार्गावर असल्याने येथे जाण्यासाठी राज्य परिवहन मंडळाच्या बसेस कायम उपलब्ध असतात. अलिबाग व मुरुड हे दोन तालुके पर्यटनाच्या दृष्टीने विशेष प्रसिद्ध असल्याने येथील विविध पर्यटन स्थळांमध्ये कोर्लई हा किल्ला विशेष महत्वाचा आहे त्यामुळे तो पाहावयास चुकवू नका.