जेव्हा भीमास साक्षात हनुमान भेटले

हनुमान व भीमाची ऐतिहासिक भेट ही पांडव वनवासात असताना झाली होती. एके दिवशी द्रौपदी कडून कुबेर सरोवरातील अतिशय दुर्मिळ व सुंगंधी अशा फुलांबाबत भीमास कळले व द्रौपदीने त्या फुलांची अभिलाषा व्यक्त केली.

जेव्हा भीमास साक्षात हनुमान भेटले

Marathi Buzz Shop

Marathi Buzz Shop

एक महान भारतीय उपन्यास म्हणून महर्षी व्यास यांनी लिहिलेल्या महाभारत या ग्रंथाचे नाव अग्रणी आहे. महाभारतातील प्रत्येक प्रसंग आपल्यास काही ना काही शिकवण देत असतात. महाभारतातील असाच एक प्रसिद्ध प्रसंग म्हणजे हनुमान व भीम या दोघांची भेट. भीम आणि हनुमान यांची चरित्रे प्रसिद्ध असली तरी दोघांमधील एक साम्य म्हणजे त्यांच्या अंगी असलेली अतुलनीय अशी शक्ती मात्र फरक हा होता की भीम हा एक वीर मनुष्य होता व हनुमान साक्षात देवाचा अंश.

हनुमान व भीमाची ऐतिहासिक भेट ही पांडव वनवासात असताना झाली होती. एके दिवशी द्रौपदी कडून कुबेर सरोवरातील अतिशय दुर्मिळ व सुंगंधी अशा फुलांबाबत भीमास कळले व द्रौपदीने त्या फुलांची अभिलाषा व्यक्त केली. पत्नीची मागणी पूर्ण करण्यासाठी बल भीम कुबेर सरोवराच्या दिशेने जाण्यास निघाला. कुबेर सरोवर हा अतिशय निर्बीड अशा अरण्याचा भाग असल्याने या मार्गात संकटे ही असणारच होती मात्र आपल्या शक्तीच्या जोरावर भीमाने कुबेर सरोवरातून सुंगधी फुले आणण्याचा दृढनिश्चय केला व सरोवराच्या दिशेने मार्गक्रमण करू लागला.

हनुमान हा सप्तचिरंजीवींपैकी एक असून जन्मापासून ते आजच्या युगातही हनुमानाचे अस्तित्व कायम आहे असा आपला धर्म सांगतो त्यामुळे महाभारत काळातही त्याचे अस्तित्व होतेच. भीम ज्यावेळी सरोवराच्या दिशेने निघाला त्या अरण्यातच यावेळी भगवान हनुमान होते व साक्षात देव असलेल्याने हनुमानास भीम कुबेर सरोवराकडे येत आहे हे समजले आणि या निबिड अरण्यात भीमास काही अपाय होऊ नये म्हणून भीम ज्या रस्त्यावरून जात होता त्या मार्गातच हनुमान उभा राहिला.

भीम समोर येताच हनुमानाने जांभई देत आपली बळकट अशी शेपटी जमिनीवर जोरात आपटली व यामुळे जो आवाज निर्माण झाला तो एवढा मोठा होता की भीम अचंबित होऊन पाहत राहिला. एका धिप्पाड आणि बळकट वानराने आपली वाट अड्वलेली पाहून साहजिकच भीम संतप्त झाला व तू कोण आहेस? माझी वाट का अडवून ठेवली आहेस? असे हनुमानास विचारले. 

हनुमानाने शांतपणे भीमास म्हटले की तू कोण आहेस? ज्या ठिकाणी दूरदूरवर एकही मनुष्य नाही अशा घनदाट अरण्यात तू का आला आहेस? तू कुठे जात आहेस? तुला माहित आहे की हा मार्ग देवलोकाचा असून सिद्ध लोकांशिवाय कुणालाही या मार्गाने जाणे शक्य नाही. एक काम कर माझ्याकडे ही अमृतासमान फळे आहेत ती तू खा व परत माघारी जा. कारण नसताना संकटाच्या तोंडात पडू नकोस.

हनुमानाने वरील प्रश्न विचारल्यानंतर भीमाने त्यास आपल्या येण्याचे कारण सांगितले आणि हनुमास तू कोण म्हणून विचारले. यावर हनुमानाने सांगितले की मी एक वानर असून आजारी आहे. व्याधिग्रस्त असल्याने मला एका जागेतून हलणे अशक्य होत आहे तेव्हा जर तुला पुढे जायचेच असेल तर मला ओलांडून जा. हे ऐकून भीम म्हणाला की ईश्वर हा जगातील सर्व प्राण्यांमध्ये व्यापून असल्याने माझ्या हातून तुला ओलांडणे म्हणजे साक्षात ईश्वराचा अपमान करण्यासारखे होईल.  मी वेदांचा अभ्यास करून परमात्म्याविषयी ज्ञान मिळवले नसते तर मारुतीने जशी समुद्र ओलांडून लंका गाठली तसेच तुलाच काय तर समोरील पर्वतही ओलांडून जायला मी कमी केले नसते.

हे एकूण हनुमान म्हणाला की हा मारुती कोण? यावर भीम म्हणाला की वानरश्रेष्ठ हनुमान हा माझा भाऊ आहे. रामायणामध्ये हा खूप प्रसिद्ध होता. याने प्रभू रामासाठी शंभर योजने समुद्र पार करून लंका गाठली होती. साक्षात हनुमानाचे तेज व बळ माझ्यात असून मी तुला शिक्षा करण्यासही समर्थ आहे. मुकाट्याने माझ्या मार्गातून दूर हो अन्यथा मी तुला ठार मारेन.

भीमाचा आपल्या बळावरील अभिमान पाहून हनुमानास हसू आले व तो भीमास म्हणाला की मी वार्धक्यामुळे खूप थकलो आहे मला खरंच उठता येणार नाही, तू एक काम कर माझी शेपटी उचलून बाजूला कर आणि पुढे जा.

भीमाने हे ऐकल्यावर त्याने हसतच आपल्या डाव्या हाताने हनुमानाची शेपटी धरली पण जेव्हा ती उचलण्यास गेला तेव्हा शेपटी एक इंचही वर उचलली जाईना. भीमाने मग दोन्ही हातांनी आपला सर्व जोर लावला मात्र हनुमानाची शेपटी हलायलाच तयार नव्हती. बळ लावून भीमाचे सर्वांग घामाने डबडबले. ज्या वानराला आपण दंड करण्याची गोष्ट करीत होतो त्याची साधी शेपटीही आपल्याला उचलता येत नाही या भावनेने भीम लज्जित झाला आणि त्याने हनुमानासमोर हात जोडले व म्हणाला की माझ्याकडून जे विधान झाले त्याबद्दल मी माफी मागतो, आपण कोण आहात ते मला सांगा.

यानंतर हनुमानाने भीमास आपल्या खऱ्या रूपाचे दर्शन दिले, साक्षात हनुमानास पाहून भीमाने त्यास चरणस्पर्श केला आणि म्हणाला की आज मला साक्षात आपले दर्शन झाल्याने मी खरंच खूप धन्य झालोय, आपले दर्शन म्हणजे एक प्रकारे माझ्यावर आपण केलेले उपकारच आहेत.

त्यानतंर हनुमानाने भीमास सुंगधी फुलांच्या वनाकडे जाण्याचा मार्ग दाखवला आणि म्हणाला की कुरुश्रेष्ठा, या मार्गाने तू यक्ष व राक्षस ज्याचे रक्षण करीत आहेत अशा कुबेराच्या सुंगंधी फुलांच्या वनात जाऊ शकतोस. मगाशी मी तुला अडवले कारण तू पुढे गेला असतास तर कदाचित तुझे आणखी कुणाशी द्वंद्व झाले असते किंवा तुला कोणीतरी शाप दिला असता.

यानंतर हनुमानाने भीमास अमूल्य असे धर्मज्ञान दिले आणि आपण सांगितलेल्या धर्ममार्गाचा वापर करायचा उपदेश करून त्यास प्रेमाने आलिंगन दिले व म्हणाला की ज्या कौरवांनी तुम्हा बांधून त्रास दिला त्यांचा मीच सर्वनाश करू का? यावर भीम म्हणाला की आपला आशीर्वाद असेल तर कौरवांचा नाश आमच्या हातून होईल यात काहीच शंका नाही. तुम्ही आम्हास आशीर्वाद दिल्याने आमचे धैर्य अधिकच वाढले आहे. आपले तेज फक्त आमच्यासोबत असेल तर आम्ही शत्रूंचा विनाश निश्चितच करू. 

यानंतर हनुमान भीमास म्हणाला की एका मोठ्या भावाच्या नात्याने तुला हवी ती मदत मी करेन, शत्रुसैन्यात शिरून जेव्हा तू त्यांची दाणादाण उडवताना जेव्हा सिंहनाद करशील त्यावेळी मी अर्जुनाच्या ध्वजावर बसून तुझ्या सिंहनादात शत्रूचे प्राणहारण करू शकणाऱ्या मोठ्या आरोळ्या देऊन त्यांचा विनाश करण्याचे तुमचे कार्य सोपे करून देईन. 

यानंतर आशिर्वाद देऊन हनुमान अंतर्धान पावले आणि भीम मनात आत्यंतिक समाधान घेऊन कुबेर वनाच्या दिशेने सुगंधी फुले आणावयास निघाला.