पुण्याच्या खुन्या मुरलीधर मंदिराचा इतिहास

खुन्या मुरलीधराचे मंदिर हे पुण्याच्या सदाशिवपेठेत असून या मंदिरा शेजारी नरसोबाचे प्रसिद्ध मंदिर आहे. मुरलीधर म्हणजे अर्थातच कृष्ण असून कृष्णाचे हे मंदिर पेशवेकाळात बांधण्यात आले. मंदिराचा अंतर्भाग व बाह्यभाग आजही जसाच्या तसा असून अनेक भाविकांचे हे मंदिर श्रद्धास्थान आहे.

पुण्याच्या खुन्या मुरलीधर मंदिराचा इतिहास
पुण्याच्या खुन्या मुरलीधर मंदिराचा इतिहास

महाराष्ट्रात वैविध्यपूर्ण अशी देवस्थानांची नावे कुठे असतील तर ती पुणे शहरात. खुन्या मुरलीधर, भिकारदास मारुती, उपाशी विठोबा, चिमण्या गणपती अशी असंख्य वैविध्यपूर्ण नावे असलेली मंदिरे पुण्यात आहेत. नावात काय आहे अशी एक म्हण प्रसिद्ध आहे मात्र पुण्यातील या मंदिरांच्या नावामागील कहाणी समजल्याशिवाय या नावांचे महत्व लक्षात येणार नाही.

पुण्यातील असेच एक प्रसिद्ध मंदिर म्हणजे खुन्या मुरलीधर मंदिर. एखाद्या मंदिराच्या नावात जेव्हा खुन्या हा हिंसेचे दर्शन घडवणारा शब्द येतो तेव्हा हे नाव ऐकणाऱ्याची उत्सुकता अधिकच वाढते. अर्थात खुन्या मुरलीधर हे नाव पडण्यामागे खरोखरच या मंदिराशी संबंधित एक रक्तरंजित इतिहास आहे व हा इतिहास आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

खुन्या मुरलीधराचे मंदिर हे पुण्याच्या सदाशिवपेठेत असून या मंदिरा शेजारी नरसोबाचे प्रसिद्ध मंदिर आहे. मुरलीधर म्हणजे अर्थातच कृष्ण असून कृष्णाचे हे मंदिर पेशवेकाळात बांधण्यात आले. मंदिराचा अंतर्भाग व बाह्यभाग आजही जसाच्या तसा असून अनेक भाविकांचे हे मंदिर श्रद्धास्थान आहे.

मंदिराच्या गाभाऱ्यात श्रीकृष्णाची हातात मुरली घेतलेली अतिशय रेखीव मूर्ती आहे व या मूर्तीच्या स्थापनेच्या वेळी जी घटना घडली ज्यामुळे या देवतेस खुन्या मुरलीधर असे नाव मिळाले. पेशवाईत रघुनाथ सदाशिव उर्फ नाना दादा नावाचे एक मोठे प्रस्थ होते. ते पुण्यातील एक मोठे सावकार असून कृष्णभक्त होते.

दादा गद्रे यांनी सदाशिव पेठेत कृष्णाचे मंदिर बांधावयाचा विचार करून कृष्णाच्या मूर्तीचे काम जयपूर येथील बखतराम नामक एका तज्ञ कारागिरास दिले. बखतरामाने हातात मुरली घेतलेली श्रीकृष्णाची अत्यंत सुरेख अशी संगमरवरी मूर्ती घडवली व दादा गद्रे यांना दाखवायला त्यांच्या घरी आणली. दादा गद्रे यांना मूर्ती आवडलीच मात्र या मूर्तीच्या सौंदर्याची चर्चा पुण्यात सर्व ठिकाणी होऊन नाना फडणीस यांच्या कानावरही ही बातमी गेली. 

यानंतर मूर्ती पाहण्यास नाना फडणीस दादा गद्रे यांच्या घरी गेले. मूर्ती पाहून साहजिकच नाना फडणीस विलोभित झाले व त्यांच्या मनात ही मूर्ती बेलबागेत स्थानापन्न करण्याचा विचार आला. बेलबाग हे ठिकाण पुण्यातील बुधवार पेठेत असून पूर्वी येथे बेलाची पुष्कळ झाडे असल्याने या बागेस बेलबाग हे नाव पडले. या ठिकाणी पूर्वी पेशव्यांचे तबेले होते. नाना फडणीसांनी त्यांच्या काळात येथे विष्णूचे एक सुंदर मंदिर बांधले होते. बहुदा या मंदिरातच नानांना कृष्णमूर्ती ठेवायची असावी.

हा विचार त्यांनी दादा गद्रेंना बोलून दाखवला मात्र दादा गद्रेंनी त्यास साफ नकार दिला. नानांनी दादांची खूप समजूत काढली मात्र ही मूर्ती सदाशिव पेठेतच विराजमान होईल असे दादांनी नाना फडणीस यांना सांगितले.

आता विनंती करून कार्य साध्य होईल असे वाटत नाही तेव्हा बळाचा वापर करूनच ही मूर्ती मिळवावी असा विचार नाना फडणीस यांनी केला आणि ज्या दिवशी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार होती त्याच दिवशी अगदी पहाटे नानांनी मूर्ती बळजबरी करून घेण्यासाठी काही अरब घोडेस्वार सदाशिव पेठेत पाठवले. मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होण्यापूर्वी मूर्ती ताब्यात आली पाहिजे अशी सूचना नानांनी अरबांना केली होती मात्र या अरबांकडून मंदिराचा पत्ता चुकल्याने ते भलत्याच ठिकाणी गेले. 

आपण चुकीच्या ठिकाणी आलो आहोत हे अरबांच्या उशिरा लक्षात आले मग ते पुन्हा मूळ ठिकाणाकडे वळले. मंदिराजवळ आलयावर मूर्ती ताब्यात घेण्यासाठी अरबांनी शस्त्रांचा वापर करून हल्ला केला. यावेळी दादा गद्रे यांच्या पक्षातील लोकांनीही अरबांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत अनेक जण ठार झाले. परिसर लोकांच्या रक्ताने माखला गेला. एका बाजूला चकमक सुरु असताना दुसऱ्या बाजूला प्रचंड संरक्षणात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पार पडली. 

एकदा का मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली की तिचे स्थलांतर करणे म्हणजे महापातक असे पुण्यातील अनेक बड्या असामींनी नाना फडणिसांना समजावले व कुठलाच पर्याय न उरून नाना फडणीसांनी मूर्तीची अभिलाषा सोडून दिली आणि अरब मारेकऱ्यांना पुन्हा बोलावून घेतले. अशा प्रकारे या प्रकरणावर पडदा पडला तरी यावेळी झालेल्या प्रचंड रक्तपातामुळे या देवतेस खुन्या मुरलीधर याच नावाने लोक ओळखू लागले व आजही ही ओळख कायम आहे.