गिरनार येथील सम्राट अशोकच्या राजाज्ञा
गिरनार येथील अधिकाऱ्यांना व जनतेस मानवतेचा उपदेश करणाऱ्या अशोकाच्या १२ व्या शासनाच्या चौदा राजाज्ञा ज्या प्रख्यात आहेत त्यांची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू.
भारतीय इतिहासातील एक प्रभावी पुरुष म्हणून सम्राट अशोकाचे नाव घेतले जाते. सम्राट अशोक हा मौर्य साम्राज्याचा संस्थापक चंद्रगुप्त मौर्य याचा नातू व बिंदुसार याचा पुत्र. आपल्या शूर स्वभावामुळे संपूर्ण भारतखंडाचा सम्राट झालेल्या अशोकास कलिंग देशाच्या युद्धात झालेली भयंकर हानी पाहून हिंसेबद्दल तिरस्कार निर्माण झाला व अहिंसेच्या मार्गावर चालावयास शिकवणाऱ्या बौद्ध धर्माचा स्वीकार करून त्याने बौद्ध धर्माचा प्रसार व प्रचार केला.
युद्ध न करताही राज्य करता येते व यासाठी दया, अहिंसा व स्नेहभाव या गुणांचा स्वीकार राजाने व प्रजेने केला तर खऱ्या अर्थी मानवतेचे राज्य स्थापित होऊ शकते या उद्देशाने अशोकाने आपल्या राजाज्ञा कोरून त्यातून मानवतेची शिकवण दिली.
अशोकाच्या अनेक राजाज्ञा असून त्या भारताच्या चारही दिशांना आढळल्या आहेत. पाकिस्तानातील पेशावरजवळ असलेल्या शहाबादगड येथे, ठाणे जिल्ह्यातील नाला सोपारा येते, गुजरातच्या काठेवाड प्रांतातील गिरनार येथे, ओरिसा राज्यातील जगन्नाथपुरी येथील धौली आणि गजम जिल्ह्यातील जावगड येथे अशोकाच्या राजाज्ञा आढळल्या आहेत.
सम्राट अशोकाच्या राजाज्ञा लेणी, स्तंभ, स्तूप आणि डोंगरात कोरलेल्या आढळून येतात. यापैकी गिरनार येथील अधिकाऱ्यांना व जनतेस मानवतेचा उपदेश करणाऱ्या अशोकाच्या १२ व्या शासनाच्या चौदा राजाज्ञा ज्या प्रख्यात आहेत त्यांची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू.
- राजा देवप्रिय प्रियदर्शी सर्व संप्रदायांना मान देतो. संन्यासी व गृहस्थाश्रमी या दोघांनाही मान देतो. तो राजा दान व नाना तर्हेने पूजा व सत्कार करून मान देतो.
- परंतु हा देवप्रिय राजा दान किंवा सत्कार याना सर्व संप्रदायांची सारबुद्धी एवढे महत्व देत नाही.
- परंतु सर्व संप्रदायांची सारबुद्धी पुष्कळ मार्गांनी होऊ शकेल.
- परंतु त्याचे मूळ म्हणजे आपल्या स्वतःच्या वाचेवर नियंत्रण म्हणजे संप्रदायाची स्तुती करणे, पर संप्रदायाची अवास्तव निंदा न करणे किंवा ती अप्रासंगिक तरी न करणे किंवा प्रसंगामुळे निंदा करावी लागली तर थोडी करणे हे होय.
- परंतु अन्य संप्रदायांचा सुद्धा वाजवी सत्कार केलाच पाहिजे.
- जर एखादा याप्रमाणे आचरण करेल तर तो स्वपंथाची उन्नती करेल आणि परपंथाला उपकृत करेल.
- परंतु जर एखादा या विरुद्ध आचरण करेल तर तो स्वपंथ नष्ट करून परपंथावर अपकार करेल.
- जो कोणी आपल्या संप्रदायाची पूजा करतो आणि परसंप्रदायाची निंदा करतो तो हे सर्व आपल्या संप्रदायावरील भक्तीने करतो आणि त्यास वाटते की मी आपला संप्रदाय उद्दीपित केला मात्र तो तसे करताना आपल्या संप्रदायाचा घातच करतो.
- तर मग समवाय हीच गोष्ट चांगली आहे की एकमेकांचे धर्म एकमेकांनी ऐकावेत आणि मानावेत.
- देवानांप्रियांची ही इच्छा आहे की सर्वच संप्रदाय बहुश्रुत आणि कल्याणपर असोत.
- जे तेथे आपल्या मतावर प्रसन्न आहेत त्यांना असे सांगावयाचे की.
- देवानांप्रिय जितका सर्व मतांच्या मूलभूत तत्वांच्या पुरस्कारास मान देतो तितका दान किंवा पूजा यांस देत नाही.
- या कामासाठी पुष्कळ अधिकारी आहेत. धर्मासाठी महामात्र, स्त्रियांसाठी महामात्र, व्रजांचे तपासनीस व इतर अधिकारी.
- आणि याचे फळ असे आहे की याच्या योगाने स्वतःच्या संप्रदायाची वृद्धी होते आणि धर्माचे दीपन होते.