पुरंदर तालुक्यातील ऐतिहासिक हिवरे गावं

दि.१४ फेब्रुवारी २०२१ रोजी काही कामानिमित्ताने पुरंदर तालुक्यातील मौजे हिवरे येथे वैभवकुमार साळवे यांच्या बरोबर जाण्याचा योग आला किंवा आणला म्हणा ना!

पुरंदर तालुक्यातील ऐतिहासिक हिवरे गावं

Marathi Buzz Shop

Marathi Buzz Shop

जीवन व मृत्यू यातील अंतर कमी राहिल्याने भटकंतीचा काहीसा वेग वाढला आहे. ऐतिहासिक वाचन करताना अनेक संदर्भग्रंथात शिवकाळातील पंताजी गोपीनाथ व उत्तर पेशवाईतील पेशव्यांची कारभारी सखारामबापू भगवंत बोकील यांचे हे गाव असल्याने मनात अनेक प्रश्न होते. छत्रपति शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्त्वाची व प्रेरणादायी घटना म्हणजे प्रतापगडचा रणसंग्राम व त्यावेळी महाराजांचे हेजीब गोपीनाथपंत बोकील तर पेशवाईतील नामांकित साडेतीन शाहण्यापैकी एक असलेल्या सखारामबापू यांच्या हिवरे गावाला भेट देण्याचा योग जुळवून आणला.

सकाळी ८:३० वाजता भोरहून निघालो आणि कापुरव्होळ-नारायणपुर-कोडीत मार्गे बोपदेव येथील कानिफनाथ मंदिरात दर्शनासाठी पोहोचलो. प्राचीन काळी चालुक्य राजे हे राज्य करीत होते, तेव्हा चालुक्य राजा बोपदेव याच्या नावावरून या खिंडीस ' बोपदेव - बाबादेव खिंड ' हे नाव मिळाले. कानिफनाथाचे दर्शन करून हिवरेच्या दिशेला लागलो. चरणावती नदीच्या तीरावर काहीशा उंच ठिकाणी हिवरे गावची लोकवस्ति असून संपूर्ण गावाला असलेली तटबंदी/ कोटाची काळाच्या ओघात बरीच पडझड झालेली आहे. हिवरे येथील चरणावती नदी तीरावर सखारामबापूंनी बांधलेले दगडी बांधकामातील प्रेक्षणीय त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन मन प्रसन्न झाले. त्यानंतर गावाच्या तटबंदीतील पूर्वाभिमुखी प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दगडी बांधकामातील बुरूज तत्कालीन वैभवाची साक्ष देते.

(छाया-सुरेश शिंदे)

सखारामबापू हे गोपीनापंताच्या यमाजी या नावाच्या सख्या भावाचा पणतु होय. बोकील कुटुंब मूळचे सातारा जिल्ह्यातील कोरेगांव कुमठे येथील रहिवासी परंतु चौदाव्या शतकात यांचा मूळपुरूष सिध्देश्वरभट हे क-हेपठारावर येऊन राहु लागले व उपाध्याय्यवृत्ती चालवू लागले. अशा या सिध्देश्वरभटाचे पणतु गोपीनाथपंत बोकील यांचे बुद्धीकौशल्याचे कर्तृत्व अफजलखान प्रकरणी इतिहासाने पाहिले आहे. गावाच्या प्रवेशद्वारासमोर उभे राहिल्यावर नकळत पेशवाईतील साडेतीन शहाण्यांपैकी एक असलेल्या सखारामबापूंच्या पेशवाईतील कर्तृत्वाची साहजिकच आठवण होते. त्यांचा पेशव्यांशी पहिला संबंध आला तो प्रसंगही विलक्षण असा होता. पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ हे सासवडला राहत होते. पेशवे आणि पुरंदरे या दोन घराण्यांचा स्नेह त्याकाळापासूनचा. दोन्ही घराण्यातील कर्तृत्वान पुरुषांनी स्वराज्याची निष्ठेने सेवा केलेली. बाजीराव बाळाजी पेशवे हे सुरूवातीला सासवडला राहत होते. बाजीराव साहेबांना भोजनात तीळाची चटणी फार प्रिय असायची हे महादजी पुरंदरेंना ज्ञात होते. परंतु एकदा ते जेवायला आले असताना त्यांच्या ताटात तीळाची चटणी नव्हती, ही बाब त्यांच्या लक्षात आली. त्यावेळी तेथे पंगतीला जेवण वाढणारा पुरंदरेचा शार्गीद असलेला पोरसवदा मुलगा होता, तो म्हणजे सखारामबापू बोकील. प्रसंग पाहून तो पेशव्यांना म्हणाला," सरकार आज आदित्यवार (रविवार) आहे. या दिवशी तीळ, मधु, मांसाहार व स्त्री या गोष्टी वर्ज्य असतात. " हे बाणेदार उत्तर ऐकून बाजीराव पेशवे प्रसन्न झाले आणि सखारामबापूचा पेशवाईशी संबंध जोडला गेला. पेशव्यांनी त्यांना हिवरे गावचे कुलकर्ण्य दिले तर महादजी पुरंदरे यांनी कारकुनी पदावर त्यांना नेमले. पुढे शनिवारवाडा बांधकाम १० जानेवारी १७३० सुरू झाले तेव्हा सखारामबापूंनी वाड्याच्या कुलकर्णीपणाचे काम अतिशय चोखपणे केले आणि पेशव्यांची मर्जी संपादली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. आपल्या बुद्धीकौसल्याने अतिशय वेगाने प्रगती केली. नानासाहेब पेशवे यांच्या अनेक मोहिमात ते एक महत्त्वाचे सरदार म्हणून आघाडीवर असायचे. रघुनाथरावदादांनी उत्तरेची मोहिम आखली तेव्हा त्यांच्या समवेत ते होते. इ. स. १७५४ मधे सुरजमल जाट याच्याकडून खंडणीसाठी त्याच्या कुंभेरच्या किल्ल्यास रघुनाथरावदादा पेशवे, मल्हारराव होळकर व जयाजी शिंदे यांच्या सैन्याने वेढा दिला. या दरम्यान तोफेचा एक गोळा लागून मल्हाररावांचे पुत्र खंडेराव मरण पावले. मल्हाररावांना आपल्या मुलाच्या मृत्यूने अतिशय शोक झाला आणि त्यांनी प्रतिज्ञा केली, की " सुरजमलचा शिरच्छेद करून कुंभेरची माती यमुनेत टाकीन तरीच जन्मास आल्याचे सार्थक, नाही तर प्राणत्याग करीन." ही मल्हाररावांची प्रतिज्ञा सुरजमलच्या कानावर गेल्यावर तो घाबरला. त्याने आपली पगडी काढून ती जयाजी शिंदे यांच्या छावणीत पाठविली आणि पत्र दिले, " आजचे समयी तुम्ही वडील बंधु, मी धाकटा, कळेल त्या रीतीने बचाव करावा." शिंद्यांनी त्यांची विनंती मान्य केल्याने मल्हारराव काहीसे बिथरले. दोन मात्तबर मराठा सरदारांच्यात बेबनाव होणे हे पेशवाईसाठी चांगले नव्हते. अशावेळी सर्वकाही सुरळीत करण्यात सखारामबापूंची शिष्टाई फार मोलाची ठरली आणि सखारामबापू हे रघुनाथरावदादांचे खाजगी कारभारी झाले. त्यांनी पेशवाईसाठी अतिशय कष्ट घेतले व रघुनाथरावदादांचे निष्ठावान झाले. माधवराव पेशवेपदी असताना, त्यांना सखारामबापू हे अप्रिय होते, असे असूनहि ते महत्त्वाचे प्रसंगी त्यांचा सल्ला घेत यावरून त्यांचे महत्त्व किती होते हे दृष्टिपथास येते. मात्र नारायणराव पेशव्यांचा शनिवारवाड्यात खून झाल्यावर ते काहीसे बिथरले. त्यांनी रघुनाथरावदादांचा पक्ष सोडला आणि बारभाईचे नेतृत्व घेतले. पेशवाईच्या वर्चस्वासाठी झालेल्या गृहकलहात ते एका गटाचे प्रमुख झाले. नारायणराव पेशव्यांच्या गरोदर पत्नीला सुरक्षितेसाठी त्यांनी पुरंदर किल्यावर ठेवले. इ. स. १७७४ मधे नारायणराव पुत्र सवाई माधवराव या बालकाच्या नावाने पेशवाईची वस्त्रे सातारा छत्रपति यांच्याकडून त्यांनी आणली. उत्तरपेशवाईत अतिशय नावारुपाला आलेला हा मुत्सदी अनेक आरोपांचा व चुकांचा धनी झाला. त्यांचा एकुलता एक मुलगा अंकोपंत याचे लग्न १ जानेवारी १७६७ रोजी भोर संस्थानचे अधिपति श्रीमंत रघुनाथ चिमणाजी पंतसचिव यांच्या गोदूबाई नामक मुलीशी सासवड मुक्कामी झाले होते. हा विवाह सोहळा सुमारे दोन महिने चालला होता. सखारामबापूंची मुलगी भोरच्या पंतसचिव घराण्यातील शंकरराव रघुनाथ यांस दिली होती. हा विवाह वाई येथे २४ जानेवारी १७७९ रोजी संपन्न झाला होता व या लग्नप्रीत्यर्थ बापूंनी ४० हजार रुपये खर्च केले होते. सखारामबापूंचा एकुलता एक मुलगा आकोपंत मे १७७५ मधे निधन पावला. उतार वयात घराण्याला वारस राहिला नाही. काळ फिरला होता, पेशवाईत ज्याच्या शब्दाला फार मोठा मान होता, तो सखारामबापू कैदेत पडला. महादजी शिंद्यांनी चाळीस शेर वजनाची चांदीची बेडी त्यांच्या पायात टाकली. २ आॕगष्ट १७८२ रोजी रायगड किल्ल्यावर कैदेत असताना पेशवाईतील एका शहाण्याचा अंत झाला.

(छाया-सुरेश शिंदे)

हिवरे गावाच्या रस्त्याच्या कडेला दोन समाधि सदृश्य वास्तू आहेत, त्यापैकी एक लहान व एक मध्यम आकाराची आहे. या दोन्हीही वास्तू जर समाधिस्थळ असतील तर नक्कीच त्या गोपीनाथपंत व सखारामबापूंच्या असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. अशा या ऐतिहासिक वास्तू आपले अस्तित्व सांभाळण्यात किती दिवस यशस्वी होणार हे काळालाच ज्ञात !

संदर्भ - सखारामबापूचें चरित्र (लेखक - यशवंत गोपाळ कानेटकर)

© सुरेश नारायण शिंदे, भोर ([email protected])