केदारेश्वर मंदिर व सुभानमंगळ

दि.६ फेब्रुवारी २०२१ रोजी शनिवार असल्यामुळे मला सुट्टी होती. आज काय करायचे म्हणताना ' जाऊ या शिरवळला! असे मनात आले.

केदारेश्वर मंदिर व सुभानमंगळ

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

नोकरीच्या काळात मी नेहमीच शिरवळ येथे जात असे, कधी बाजारहाट आणायला तर कधी वित्तीय संस्थेत जमा होणारे वेतन काढण्यासाठी. आज मात्र ऐतिहासिक शिरवळला भेट देण्यासाठी पहिल्यांदाच चाललो होतो. सकाळी १० वाजता भोरहून शिरवळ जाण्यासाठी निघालो. शिरवळ येथे चौगुले नावाचे माझे मित्र राहतात, त्यांच्या घरी पोहोचलो. चहापान झाल्यावर माझी गाडी केदारेश्वर मंदिराकडे निघाली.

(छाया-सुरेश शिंदे)

शिरवळ गावाच्या शेजारुन दक्षिणोत्तर प्रवाहीत होणारा लहान ओढा निरा नदीस मिळतो. याच ओढ्याच्या एका बाजूला केदारेश्वर मंदिर तर दुसऱ्या बाजूला शिरवळ गाव. पूर्वाभिमुखी मंदिर भव्य घडीव दगडी सुरक्षारक्षक तटबंदीत असलेला परिसर रमणीय आहे. तटबंदीच्या पूर्वेकडील मुख्य प्रवेशद्वारासमोर आयताकृती दगडी बांधकामातील जिवंत पाण्याने भरलेली बारव असून तिच्यात उतरण्यासाठी भव्य पायऱ्या दक्षिणेस आहेत,तर पश्चिमेस एका व्यक्तिस उतरता येईल असा काटकोनात असलेला मार्ग आहे. प्रवेशद्वाराच्या तटबंदीला लागूनच दोन्हीही बाजूस भव्य वृक्ष शितल छाया देत उभे आहेत. चारपाच पायऱ्या चढून गेल्यावर आपण मंदिर प्रारंगणात प्रवेश करतो. समोर घडीव दगडांवर कलाकुसर केलेल्या स्तभांवर विशाल नंदी मंडप असून सामान्यतः स्तंभावर छत व शिखर असते मात्र त्याला हे मंदिर अपवाद आहे कारण छतावर देखील स्तंभ असून त्याच्यावर असलेल्या छतावर कळस आहे. तटबंदीच्या अंतर्गत भागात असलेल्या ओवरीत बसून क्षणभर विसावल्यावर मन नकळतच ऐतिहासिक कालखंडात जाते. या पुरातन मंदिरात इतिहासकाळात अनेक दिव्य, मजहर झालेले आहेत. काही वर्षापूर्वी पुण्यातील इतिहास संशोधकांनी या मंदिरात झालेल्या मजहर ( न्यायनिवाडा) प्रसंगी सरसेनापति प्रतापराव (कुडतोजी) गुजर हजर असलेला ऐतिहासिक कागद शोधून काढला आहे. तर पुणे परगणाच्या नीरथडी तरफेतील मांढर व धनकवडी या गावच्या कुलकर्णी असलेल्या जिवाजी विठ्ठल याने १४ जानेवारी १७१९ हकीकतीत म्हटले आहे की, शिवकाळात धनकवडी गावच्या कुलकर्ण्यवरुन वाद निर्माण झाला होता तेव्हा तंट्याचा न्यायनिवाडा करण्याचे स्थळ शिरवळ हे पुणे परगण्याचे कारकून व देशमुख-देशपांडे यांनी नमुद केले होते. याचा दुसरा अर्थ असा की, शिरवळ म्हणजेच शिरवळ मधील केदारेश्वर मंदिर हे होय. अशाप्रकारे इतिहासात असे अनेक मजहर व दिव्य या मंदिरात झालेले आहेत. ओवरीतून उठून केदारेश्वराच्या दर्शनासाठी जाताना मुख्य मंदिराच्या उजव्या बाजूला असलेली सुरेख दगडी दीपमाळ आपले ऐतिहासिक अस्तित्व अधोरेखीत करताना दिसते. नंदी दर्शन घेऊन आपण मंदिरात प्रवेश करतो.संपूर्ण नक्षीदार दगडी स्तंभावर असलेल्या सभामंडपात पोहोचतो. आधुनिक तेल रंगांचा वापर केल्याने त्याचे पुरातन अकृत्रिम सौंदर्य लोप पावले आहे. त्यानंतर अंतराल भव्य असून आत अतिशय शितल वातावरण अनुभवता येते. गर्भगृह काहीसे खोलगट असून केदारेश्वराच्या दर्शनाने आत्मिक समाधान मिळते. मंदिर परिसरात विविध मूर्ती आढळून येतात.

(छाया-सुरेश शिंदे)

आता इतिहासकाळाचा वारसा किंवा शिरवळ गावची ओळख असणाऱ्या सुभानमंगळ किल्ल्याच्या भेटीला जायचे. निरानदीच्या तिरावर असलेल्या सुभानमंगळ भुईकोटाचे अवशेष म्हणजे एका ढासळणा-या बुरूजाशिवाय काहीही नाही. भुईकोट किल्ला आजमितिस भुईसपाट झालेला आहे. सुभानमंगळचा तो जीर्ण बुरूज आपल्याला शिवकाळात घेऊन जातो. आदिलशाही सत्तेचा अमल असताना किल्ले सिंहगड, तोरणा, राजगड व रोहीडा यांच्यावर नियंत्रण ठेऊन परिसरात असलेल्या बारा मावळातील महसूल जमा करण्याचे शिरवळ हे ठाणे होते. सुभानमंगळ किल्ल्याच्या वेगवेगळ्या कालखंडातील वेगवेगळ्या आदिलशाही अधिका-यांनी आपल्या सुलतानाच्या वतीने किल्ल्यावरील किल्लेदारास आदेश काढल्याची अनेक पत्र उपलब्ध आहेत. निरानदी तीरावर मातीच्या भेंड्याची तटबंदीला बाहेरील बाजूने दगडी बांधकाम असलेला सुभानमंगळचा निर्मितीकाळ व निर्माता इतिहासास ज्ञात. छत्रपति शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या सुरूवातीस म्हणजेच इ.स.१६४८ मधे आदिलशाही सरदार फतहखानाची फौज पुरंदर जवळील बेलसर या गावी सैनिकी तळ ठोकला होता व आदिशाहच्या वतीने बाळाजी हैबतराव शिरवळचा सुभानमंगळ किल्ला ताब्यात घेतला होता. अशावेळी महाराजांनी सुभानमंगळवर मावळी सेनेला कावजीच्या नेतृत्वाखाली शिरवळला पाठविले होते, त्यात गोदाजी जगताप, भीमाजी वाघ, संभाजी काटे, शिवाजी इंगळे, भिकाजी चोर इ. शूरवीर होते. यातील कावजी म्हणजे कावजी कोंढाळकर असण्याचा संभव जास्त आहे. मावळी सेनेने सुभानमंगळवर जोरदार हल्ला चढवून बाळाजी हैबतरावच्या तुकडीचा पराभव केला. सुभानमंगळच्या विजयाने मावळ्यांचा उत्साह वाढला होता. सुभानमंगळची ही लढाई इतिहास प्रसिध्द असल्याने ती प्रत्येकाच्या मनात आहे.

थोरले छत्रपति शाहू महाराजांच्या काळात देखील शिरवळ हे प्रमुख ठाणे होते. याच शिरवळ मधे भोर संस्थानचे अधिपतिंचा राहता वाडा असून आजमितिस तेथे एक शैक्षणिक संकुल आहे. भोर संस्थान काळात विचित्रगड नामक तालुका होता, अशा या तालुक्याचा सर्व सरकारी कारभार शिरवळ येथून चालत असे. अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेल्या शिरवळच्या भेटीने इतिहासाची पाने मनात उलगडली जातात. दुपार झाली होती, आता पोटपूजा करण्यासाठी भोरकडे निघालो पण डोक्यात किल्ले सुभानमंगळ व केदारेश्वर मंदिरच होते.

© सुरेश नारायण शिंदे, भोर ([email protected])