माथेरान - निसर्गाला पडलेलं स्वप्न

हिरविकंच वनश्री, उंचच उंच डोंगर आणि तेवढ्याच खोल द-या, आरोग्यदायक आणि उत्साहवर्धक हवामान, मोहक सृष्टीसौंदर्य आणि मुंबईचं सानिध्य यामुळं माथेरानला या थंड हवेच्या ठिकाणाला विषेश महत्त्व प्राप्त झालं आहे. मुंबईकरांसाठी माथेरान हे सर्वात जवळचं पर्यटनस्थळ असल्यानं सुट्टीच्या दिवशी अथवा वीक एन्डला माथेरान हाउसफुल्ल असतं.

माथेरान - निसर्गाला पडलेलं स्वप्न

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

महाबळेश्वर, चिखलदरा, आदी थंड हवेच्या ठिकाणाप्रमाणंच माथेरानची ख्याती सर्वत्र वाढली असली तरी १८५० पर्यंत माथेरान कोणासही ज्ञात नव्हतं. मे १८५० मध्ये मुंबई नागरी सेवेतील ह्यू मॅलेट या अधिका-यानं प्रथम या स्थानाला भेट दिली आणि माथेरानचं गिरिस्थान म्हणून महत्व ओळखलं. माथेरानच्या सृष्टीसौंदर्याने मोहीत झालेला मॅलेट केब्रुवारी १८५१ मध्ये पुन्हा माथेरानला आला. या मुक्कामात त्याने बाईक नावाचा बंगला बांधला. १८५२ मध्ये कॅप्टन डे या याने लष्करी आरोग्य धामासाठी माथेरानचं सर्वेक्षण केले. कॅप्टन पॉनसॉनबीने माथेरानचा नकाशा तयार केला. १८५३ मध्ये कॅप्टन पिकॉक याने पुन्हा सर्वेक्षण केलं. १८५३ मध्ये तेथे वसाहत उभारण्याचं ठरविलं. माथेरान मध्ये प्रथम एच्.पी.मॅलेटचा बाईक, इ.जी फॉसेटचा हर्मिटेज, कॅ. हेन्री बारचा बार हाऊस, कॅ सी.वॉकरचा वॉकर्स कॉटेज आणि आर्थर मॅलेटचा स्टोन हेअज हे पाच बंगले उभे राहीले. १८५५ ते १८५८ या दरम्यान मुंबईचा गव्हर्नर लॉर्ड एल्फीन्स्टनने माथेरानच्या विकासासाठी भरपुर प्रयत्न केले. माथेरानच्या व्यवस्थापनासाठी मेजर पार्किन्सनची अधीक्षक म्हणून निवड केली. १८७० मध्ये हिल स्टेशन कमिटी स्थापन झाली. १९०५ मध्ये माथेरान नगरपालिका अस्तित्वात आली.

डोंगर्माथ्यावरील घनदाट वनश्रीमुळे माथेरान असं नाव पडलं. धनगराचे आद्य मातापिता याच जंगलात मरण पावल्याने या जंगलाला मातेचं रान असं नाव पडलं. पुढं त्याचा अपभ्रंश होऊन त्याचं नाव माथेरान झालं अशी येथील धनगर समाजाची धारणा आहे. १८५० मध्ये प्रथम मॅलेट माथेरानला पोहोचला असला तरी वरोसा घळीतील चढण मार्गास 'शिवाजी चढण' असल्यानं माथेरान शिवकाला पासून ज्ञात असावं असंही काहींच मत आहे. विठ्ठल लक्ष्मण कोतवाल उर्फ भाई कोतवाल यांनी माथेरानचं नाव स्वातंत्र्यालढ्याशी जोडलं. भाई कोतवालांनी १९४२ च्या 'छोडो भारत' आंदोलनात भाग घेतला आणि ते हुतात्मा झाले. त्यां स्मारक इथं आहे.

समुद्रसपाटीपासून ७९१.५ मीटर उंचीवर असलेल्या माथेरान गिरिस्थानचा विस्तार २०.७ चौ. कि.मी असून त्याचा अंगाला दोन घटक आहे. इथं अनेक सौंदर्यस्थळं (पॉईंट्स) आहेत. त्यामध्ये पॅनोरमा पॉईंट, गार्बट पॉईंट, अलेक्झांडर, लिटील चौक, ग्रेट चौक, वन ट्री हिल, डेंजर, इको लँडस्केप, लुईसा, पॉर्क्युपाईन, मंकी, आर्टिस्ट, स्फिंक्स, बार्टल, दस्तुरी, माउंट बेरी, गव्हर्नर हिल, हार्ट पॉईंट, सखाराम तुकाराम पॉईंट, वुडवर्ड पॉईंट, बेल्वेडेअर पॉईंट, माजॉर नुक इत्यादी पॉईंट प्रसिध्द आहेत.

सिमसन तलाव तसेच शार्लोट तलाव प्रसिध्द आहे. मुंबई प्रांताच्या गव्हर्नरच्या लॉर्ड एल्फिन्स्टनची पत्नी लेडी शार्लोटचे नाव या तलावास देण्यात आले आहे. माथेरानचा पाणीपुरवठा याच तलावातून होतो. तलावाच्या परीसरातील देखावा मनमोहक आहे. शार्लोट

तलावाच्या दक्षिणेस ५० मी. पिसरनाथ मंदिर आहे. पिसरनाथ हे माथेरानचं ग्रामदैवत आहे. माथेरानमध्ये हिंदूंची शिव, राम, मारुती मंदिर तर आहेतच त्याचबरोबर मशिद आणि सेंटपॉल चर्चही आहेत.

पॉईंटबरोबर माथेरानमध्ये नवरोजी लॉर्ड गार्डन, ऑलिंपिया, पे मास्टर पार्क आदी ठिकाणीही पर्टकांची गर्दी असते. पर्यटकांसाठी येथे भरपूर हॉटेल्स आहेत. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचं विश्रामगृह आहे. तसेच बांधकाम खात्याचं विश्रामगृह येथे आहे. त्याचं बुकींग ठाणे येथुन होते. माथेरानला पर्यटकांची गर्दी वर्षभर असते. त्यातही ऑक्टोबर-नोव्हेंबर आणि मार्च ते जून या काळात मोठ्या प्रमाणात पर्यटक माथेरानला येतात. मुंबईच्या पूर्वेस ५० कि.मी. असलेल्या माथेरानला जाण्यासाठी मुंबई-पुणे लोहमार्गाव्ररील नेरळ स्टेशनवर उतरुन झुकझुक गाडीनं माथेरानला जाता येते किंवा टॅक्सीनेही माथेरानला जाता येते. मिनीट्रेन थेट माथेरान बाजारपेठेपर्यंत जात असली तरी टॅक्सीने मात्र दस्तुरी नाक्यापर्यंतच नाता येते. माथेरान मधील वातावरण बिघडु नये म्हणून कोणतेही मानवनिर्मित वाहानास (अगदी सायकलदेखील) माथेरानमध्ये प्रवेशबंदी आहे. दस्तुर नाक्यावरुन, घोड्यावर किंवा हातगाडीत बसून माथेरान गावात जाव्म लागतं. दस्तुरी नाका ते माथेरान अंतर साधाराणतः अडीच ते तीन कि.मी. आहे. विविध पॉईंट्स पाहाण्यासाठी देखील उपलब्ध असतात. माथेरानची संपुर्ण अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबुन असली तरी शासनाचं या पर्यटनस्थळाकडे विषेश लक्ष नाही. माथेरानला नुकताच इको सेन्सिटिव्ह झोन कायदा लागू केला गेल्यानं माथेरानच्या विकासाला कुलुप लागलं आहे. अनेक वेळा पहाणी झाल्यानंतरही नेरळ ते दस्तुरी नाका मिनीबस सुरु होत नाही. त्यामुळं विद्यार्थी, रुग्णांचे प्रचंड हाल होतात. माथेरानमध्ये प्रत्येक व्यक्ती मागे पंचवीस रुपये आकारले जातात.

माथेरानची झुकझुक गाडी

भारतात रेल्वेगाडी सुरु झाली त्याला दिडशे वर्षापेक्षाही जास्त कालावधी उलटला. या काळात कोळशावर चालणा-या रेल्वेपासुन ते ताशी १५० कि.मी. वेगाने धावणा-या बुलेट ट्रेनपर्यंत भारतानं मजल मारली. रेल्वेच्या क्षेत्रात मोठी प्रगती असली तरी शंभर वर्षापुर्वी सुरु झालेल्या नेरळ माथेरान झुकझुक गाडीचं आकर्षण किंवा या गाडीत बसून माथेरानला जाण्याची पर्यटकांची ओढ जराही कमी झालेली नाही. त्यामुळं आता दिवसातुन नेरळ-माथेरान या मिनीट्रेनच्या चार पाच फे-या होत असल्या तरी गाडी हाउसफुल्ल असते.

समुद्रसपाटीपासून ७९५ मीटर उंचीवर असलेल्या माथेरानला रेल्वे कशी सुरु झाली याचा इतिहास रंजक आहे. मुंबईचे सुप्रसिध्द बोहरा व्यापारी सर आदमजी पिरभॉय माथेरानला जाण्यासाठी मुंबईहुन नेरळला आले. ही घटना १९०० ची. आदमजी पिरभॉय येण्यापुर्वीच माथेरानला जाणारे घोडे आणि पालख्या अगोदरच निघून गेल्यामुळं आदमजींना पायी चढण्याशिवाय मार्ग नव्हता. आदमजींना ते शक्य नव्हतं. त्यामुळे निराश मनानं ते परत गेले पण त्यांची ही निराशा माथेरानकरांसाठी उपकारक ठरलो. नेरळ्हून माथेरानला रेल्वे सुरु कारायची असं आदमजींनी ठरवलं आणि ते कामाला लागले. सरकारची परवानगी घेतली गेली. सर्व्हेक्षणाचं काम सुरु झालं. प्रारंभी एका जर्मन अभियंत्याला हे काम दिल गेलं. त्यानंतर 'सिमला-कालका माउंट योजना' आखणारा रायसाहेब हरिश्चंद्र यांच्याकडं हे काम दिल गेलं. १९०३ ला सरकारनं मंजुरी दिली आणि चार वर्षात रेल्वेमार्गाचं काम पूर्ण झालं. जर्मन बनावटीचं नॅरोगेज इंजिन व डबे मागविण्यात आले. आणि १५ एप्रिल १९०७ रोजी नेरळ माथेरान मिनिट्रेननं पहिला प्रवास केला. आदमजींचं स्वप्न साकार झालं. रेल्वेमार्गाच्या उभारणीसाठी १३ लाख रुपये खर्च आला. आदमजी हयात असेपर्यंत अडचण आली नाही. आदमजींच्या निधनानंतर मुलगा हुसेन यांच्याकडून रेल्वेकडे दुर्लक्ष झालं. रेल्वे तोट्यात आली. अब्दूल हुसेन यांनी १९२७ मध्ये रेल्वे मालमत्ता ग्वाल्हेरचे राजे शिंदे यांच्याकडे चार लाख रुपयांना गहाण टाकली. त्यानंतर उभयतांमध्ये वाद झाला. १९४८ मध्ये ही रेल्वे 'जीआयपी' रेल्वेनं ताब्यात घेतली व १९५१ मध्ये भारतीय रेल्वेचं पुनर्गठण झाल्यानंतर ती मध्य रेल्वेच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आली.

नेरळ हे समुद्रसपाटीपासून ४० मीटर उंचीवर आहे. नेरळहून निघाल्यानंतर १.५ कि.मी. अंतरावरच कठीण चढाव सुरु होतो. तेथून ती पश्चिमेकडे वळते व नागमोडी वळणाने जाते. नेरळहून ६.४ कि.मी. अंतर कापून गेल्यानंतर जुम्मापट्टी हे पहिलं रेल्वेस्थानक लागतं जुम्मापट्टी स्थानकाआधीचा भाग घोड्याच्या नालेसारखा आहे. इथंच नेरळ-माथेरान रस्ता लागतो. पुढं छोटासा बोगदा आहे. वनकोस टिनेल हे त्याचं नाव. पुढं ४९१ मीटर उंचीवर वॉटरपाईप स्थानक लागतं. नेरळहून १८ कि.मी.आणि समुद्रसपाटीपासून ६८२.५ मीटर उंचीवर अमन लॉज स्थानक आहे. माथेरान टर्मिनल ते नेरळचं अंतर २१ कि.मी. एवढे आहे. समुद्रसपाटीपासून उंची ७९१.५ मीटर आहे. झुकझुक गाडीनं २१ कि.मी. च्या प्रवासासाठी साधारणता: दोन तास लागतात. रेल्वेनं गेल्यास आपणास थेट माथेरानमध्ये जाता येते. चार चाकी गाड्या फक्त दस्तुरी नाक्यापर्यंतच जाऊ शकतात. माथेरानची मिनीट्रेन हे छोट्यामोठ्यांसाठी आकर्षण आणि माथेरानचं हे एक वैशिष्ट्य आहे. माथेरानला जाण्यासाठी आपणास नेरळ रेल्वे स्थानकावर उतरुन माथेरान नॅरोगेज प्लॅटफॉर्मवर यावं लागतं. गर्दीमुळे आगाऊ तिकीट काढणं योग्य. गाडीला प्रथम श्रेणीचाही डबा आहे. माथेरानला जाणा-या प्रवाशांना जातानाचा किंवा परतीचा प्रवास मिनिट्रेननं केलाच पाहिजे. हा प्रवास आनंद देणारा आहे. माथेरान ते नेरळ या अंतरासाठी रेल्वे तिकीट ३५ रुपये आहे. पावसाळ्यात या रेल्वेचा प्रवास अनोखा आनंद देणारा असतो.