खोपोली शहराची माहिती व इतिहास
आधुनिक युगात खोपीलीची ओळख मुंबई पुणे महामार्ग व मध्य रेल्वेवरील एक औद्योगिकरण झालेले शहर अशी असली तरी या गावास एक इतिहासही आहे. पूर्वी कोकणातून देशावर जाण्यासाठी बोरघाट हा अत्यंत प्रमुख मार्ग होता व या मार्गाने प्रवास करताना जसं जसे आपण सह्याद्रीत निर्माण केलेल्या मार्गावरून वर जाऊ लागतो अथवा खाली येऊ लागतो आपल्याला पायथ्याशी खोपोली हे शहर दिसते.
रायगड जिल्ह्यातील शहरीकरण झालेली जी गावे आहेत त्यापैकी एक म्हणजे खोपोली. खोपोली हे शहर रायगड जिल्ह्याच्या खालापूर तालुक्यात असून तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातीलही एक मोठे शहर म्हणून ओळखले जाते.
खोपोली शहराचा गेल्या काही दशकांत झपाट्याने विकास होण्याचे कारण म्हणजे हे गाव कोकणातून देशावर जाणाऱ्या प्रसिद्ध बोरघाटाच्या पायथ्याचे शहर असल्याने मालाची नेआण करण्यासाठी हे पूर्वीपासून एक मोठे केंद्र होते. कालांतराने मुंबई पुणे महामार्ग व मध्य रेल्वे येथूनच गेल्याने गावाचा चौफेर विकास झाला.
१९१० साली येथे टाटा पॉवर हाऊस अर्थात खोपोली जलविद्युत निर्मिती केंद्राची स्थापना झाली आणि हळूहळू अनेक उद्योग खोपोलीकडे वळू लागले आणि पाहता पाहता खोपोली हे एक औद्योगिक केंद्र म्हणूनही ओळखले जाऊ लागले. खोपोली जलविद्युत निर्मिती केंद्रात निर्माण झालेली वीज ही मुंबईत घरगुती व व्यावसायिक कारणांसाठी वापरली जाते. रायगड जिल्ह्यातही येथील वीज पुरवली जाते. पूर्वी मुंबईतील कापड गिरण्या खोपोली वीज केंद्रात निर्माण झालेल्या विजेवरच चालत.
आधुनिक युगात खोपीलीची ओळख मुंबई पुणे महामार्ग व मध्य रेल्वेवरील एक औद्योगिकरण झालेले शहर अशी असली तरी या गावास एक इतिहासही आहे. पूर्वी कोकणातून देशावर जाण्यासाठी बोरघाट हा अत्यंत प्रमुख मार्ग होता व या मार्गाने प्रवास करताना जसं जसे आपण सह्याद्रीत निर्माण केलेल्या मार्गावरून वर जाऊ लागतो अथवा खाली येऊ लागतो आपल्याला पायथ्याशी खोपोली हे शहर दिसते. पूर्वी हे शहर एक छोटेसे खेडे होते व या ठिकाणी केंबळीने शाकारलेली घरे होती त्यामुळे बोरघाटातून प्रवास करताना या घरांची एक ओळ नजरेस दिसून यायची त्यामुळे गावास खोप (घरे) आवली (ओळ) यावरून खोपआवली असे नाव प्राप्त झाले. कालांतराने खोपआवली चे खोपिवली असे नाव होऊन पुढे त्याचे खोपोलीत रूपांतर झाले. ब्रिटिश लोक खोपीलीचा उल्लेख कंपोली असाही करत.
१७७९ साली खोपोली येथे इंग्रज व मराठे यांच्यात एक मोठी लढाई झाली होती व या लढाईत दोन इंग्रज अधिकारी ठार झाले होते. लॉर्ड वेंटेनिया याने १८०४ साली खोपोली गावास भेट दिली व येथील घाट, घनदाट जंगल, तलाव आणि मंदिराचे वर्णन आपल्या प्रवास वृत्तात केले आहे. बिशप हेबर याने १८२५ साली खोपीलीचे सुंदर तळे आणि मंदिर असणारे खेडे असे वर्णन केले आहे. १८३१ साली मिसेस विल्सनने खोपोलीचे वर्णन पुणे रस्त्याचे विहंगम दृश्य दिसेल अशा ठिकाणी वसलेले गाव असे केले आहे.
खोपोली शहरातील अतिशय जुनी अशी स्थळे म्हणजे येथील विरेश्वर महादेव मंदिर आणि त्याच्या शेजारी असलेला एक भव्य अंडाकृती तलाव. विरेश्वर मंदिर हे हेमाडपंती धाटणीचे असून त्याची उंची वीस मीटर आहे. हे मुळात एक प्राचीन मंदिर असले तरी १७९० ते १८०० या काळात त्याचा नाना फडणवीसांनी जीर्णोद्धार केला आणि शेजारी १.५ हेक्टर जागेत एक भव्य तलाव निर्माण केला व पुढे या तलावास नाना फडणवीस तलाव या नावानेच ओळखले गेले. या तलावाचा परीघ अदमासे एक किलोमीटर असून त्यास दीड ते दोन मीटर जाड भक्कम पाषाणी भिंती आहेत. तलावाच्या आत उतरण्यासाठी पायऱ्यांची निर्मिती करण्यात आली आहे. विरेश्वर मंदिराच्या उजव्या बाजूस एक अज्ञात समाधी दिसून येते जी खोपोलीतील कुणा इतिहासप्रसिद्ध व्यक्तीची असावी. या ठिकाणाहून बोरघाट व सह्याद्रीचे विलोभनीय दृश्य दिसून येते.
विरेश्वर मंदिराशिवाय खोपोली येथील मुंबई पुणे महामार्गावरील एक सुंदर व प्रशस्त असे हनुमान मंदिरही प्रसिद्ध आहे. आधुनिक काळातील एक प्रसिद्ध संत श्री गगनगिरी महाराज यांनी सुद्धा आपल्या वास्तव्यासाठी खोपोलीची निवड केली आणि खोपोलीस एक धार्मिक महत्वही प्राप्त झाले. गगनगिरी महाराजांचा भव्य मठ खोपोली येथे असून अनेक भाविक मनोभावे येथे येऊन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतात.
पावसाळयात खोपोलीच्या सौंदर्यात अधिकच भर पडते. सह्याद्रीतील जलप्रपात ओसंडून वाहू लागतात. पाताळ गंगा नदीही भरून वाहू लागले. पावसाळ्यात खोपोली येथील झेनिथ हा धबधबा पाहण्यासाठी मुंबई पुणे येथून अनेक पर्यटक येथे भेट देतात. खोपोली गावात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री या नावाची दोन उद्यानेही नगर परिषदेतर्फे निर्माण करण्यात आली आहेत. तर असे हे खोपोली नामक बोरघाटाच्या पायथ्याशी वसलेले एक सुंदर शहर एकदातरी वेगळ्या दृष्टीने पाहायलाच हवे.