मांडवा - अष्टागरांचा मांडव

मांडवा हे गाव रायगड जिल्ह्यातल्या तसेच ठाणे-मुंबईच्या नागरिकांना नवीन नाही. पश्चीम समुद्रातले मुंबईमार्गे रायगड जिल्ह्याचे प्रवेशद्वार म्हणुन मांडवा प्रख्यात आहे.

मांडवा - अष्टागरांचा मांडव

निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला अलिबाग व रायगड जिल्हा गेल्या काही वर्षांत आघाडीचे पर्यटनस्थळ म्हणुन उदयास आल्याने मुंबईहून लॉन्चेस मार्गे लाखो पर्यटक दर वर्षी मांडवामार्गे रायगड जिल्ह्यास भेट देत असतात. मांडवा येथील पी.एन्.पी. सारखी सर्व सुविधांनी युक्त असलेल्य कॅटमरान सर्व्हीस मुळे मुंबई ते अलिबाग हा प्रवास पर्यटकांसाठी पर्वणी ठरला आहे. कॅटमरान मार्गे मुंबई ते अलिबाग हा प्रवास फक्त पैसेच नाही तर पर्यटकांचा वेळ व प्रवासाचा त्रासही बर्‍याच प्रमाणात वाचवतो त्यामुळे दर आठवड्यास विरंगुळ्यासाठी अलिबाग येथे येणार्‍या पर्यटकांची संख्या अनेक पटींनी वाढली आहे याचे श्रेय पी.एन्.पी. कॅटमरान ला द्यावेच लागेल.

मांडवा हे गाव अबालवृद्धांमध्ये प्रसिद्ध झालं ते ९० च्या दशकाच्या सुरुवातीस प्रसिद्ध झालेल्या अग्नीपथ या चित्रपटामुळे, या चित्रपटातल्या विजय दिनानाथ चव्हाण चे व खलनायक असलेल्या कांचा चिनाचे गाव हे मांडवाच दाखवले होते. अर्थात ही पात्रे काल्पनिक असली तरी या चित्रपटासाठी संशोधन करताना दिग्दर्शक मुकूल आनंद यांनी मांडवा या गावास भेट दिली होती व यानंतर या गावाचे भौगोलिक स्थळ पाहून चित्रपटात हे स्थान निश्चित केले होते. या चित्रपटाचा रिमेक नुकताच प्रदर्शित झाला त्यामध्येही मांडवा गावाचा उल्लेख आला होता. आजही मांडवा गावास अनेक पर्यटक फक्त विजय चव्हाण व कांचा चिनाचे घर पहाण्याच्या उद्देशाने भेट देतात असे येथील ग्रामस्थ मिश्किलपणे सांगतात.

मांडवा गावाच्या इतिहासाबद्दल मात्र इतिहासपुरुष मौन बाळगुन असला तरी या गावास इतिहासच नाही असे म्हणणे चुकीचे ठरेल. कारण अगदी पुरातन काळापासून एक प्राचिन व्यापारी व सांस्कृतीक केंद्र म्हणुन प्रसिद्ध असलेल्या चौल प्रांताचे प्रवेशद्वार म्हणुन मांडवा फार पुर्वीपासून प्रसिद्ध आहे. धरमतर खाडीच्या मुखाशी असल्याने पश्चिमी राष्ट्रांशी चालणाच्या व्यापाराचे प्रमुख टेहळणी व कर वसुली केंद्र म्हणुन मांडवाचे स्थान महत्त्वाचे असले पाहिजे. इसवी सनापुर्वी कोकण प्रांतावर राज्य केलेल्या सातवाहन साम्राज्याच्या काळात कोकणचा पश्चिमी राष्ट्रांशी व्यापार भरभराटीत होता. याकाळी सातवाहनांचे कोकणचे मुख्याधिकारी अर्थात सामंत म्हणुन महाभोज नावाचे घराणे कारभार पहात होते आणि या घराण्यातल्या एका ज्ञात सामंताचे नाव होते महाभोज मांडव स्कंदपलित. रायगड जिल्ह्यातीलच कुडा येथील सातवाहनकालीन लेण्यांमध्ये मांडव स्कंदपलित याचे अनेक उल्लेख आहेत. कुडा शैलगृह क्रमांक एक मध्ये महाभोजी विजया हिचा पुत्र मांडव स्कंदपलित याचा लेखक सुलसदत्त व उत्तरदत्त याचा पुत्र शिवभुती व पत्नी नंदा यांनी दिलेली देणगी नमुद करण्यात आलेली आहे. दुसर्‍या एका शैलगृहातल्या लेखात मांडव कोच्छीपुत्र वेलिदत्त हा महाभोज असताना अहिलपुत्र रामदत्त व त्याची पत्नी वेलिदत्ता हिने एक लेणे दान केल्याचा उल्लेख आहे याशिवाय शैलगृह क्र. ६ मध्ये सुलभदत्त व उत्तरदता यांचा पुत्र शिवम तसेच त्यांचे पुत्र शिवपालित, शिवदत्त व सर्पिल यांची देणगी व त्यांच्या कन्या सर्पा , शिवपालिता, शिवदत्ता व सुलसदता यांचे उल्लेख येतात. यावरुन हा निष्कर्ष काढता येतो की महाभोज मांडव यांच्या अखत्यारित असणारा प्रचंड प्रदेश हा सध्याच्या मांडव्यापासून सुरु होत असावा व कुडा लेणी व परिसरही त्याच्याच अखत्यारित असावा. भारतीय संस्कृतीमध्ये प्राचिन काळापासून मांडव पद्धतीस अनन्यसाधारण महत्त्व असते. आजही लग्न, सभा, कार्यक्रम, खेळ इत्यादी ठिकाणी मांडव घालण्याची पद्धत दिसून येते, मांडव हा कायम प्रवेशद्वारापाशी असतो यावरुन हा सुद्धा निष्कर्ष काढता येऊ शकतो की महाभोज मांडवच्या विस्तृत प्रदेशाच्या प्रवेशद्वाराचा मांडव या अर्थाने या परिसरास मांडव हे नाव मिळाले असावे व कालांतराने अपभ्रंश होऊन सध्याचे मांडवा हे नाव सर्वमुख झाले असावे.

अनेकांनी मांडवा गावात प्राचिन वास्तू नसल्याने गावाच्या प्राचिनत्वावर संशय व्यक्त केला असला तरी आजही गावात फेरफटका मारल्यास अनेक जुन्या पद्धतीचे पाषाणी जोते दिसून येतात जे या गावाच्या प्राचिन वैभवसंपन्नतेचे साक्षी आहेत. गावाच्या मध्यभागी दोन समाधी शिल्पे दिसून येतात जी वरवर पाहता मध्ययुगिन वाटतात या दोनही शिल्पांवर अश्वारुढ व्यक्ती दिसून येतात यावरुन त्या काळातील एखाद्या दुर्धर संग्रामात धारातिर्थी पडलेल्या मांडवा गावातील सेनापतींची हि समाधीशिल्पे असावीत हे लक्षात येते. शिवकाळातही मांडवा गावास अनन्यसाधारण महत्त्व होते, त्याकाळी या परिसरावरुन स्वराज्याची हद्द सुरु होत असे व समोर करंजा येथे पोर्तुगिज व मुंबई येथे इंग्रज असल्याने मांडवा मोहिमा तसेच टेहळणीच्या दृष्टीने मोक्याचे होते याच परिसराच्या संरक्षणासाठी शिवकाळात येथे श्रीवर्धन नावाची एक गढी उभारण्यात आली होती मात्र शाहू महाराजांच्या काळात झालेल्या सिद्दी सात व चिमाजी अप्पा यांच्या तुंबळ युद्धात ही गढी नष्ट झाली आज या गढीचे कोणतेच अवशेष या परिसरात दिसत नाहीत.

मुंबईहून गेट वे ऑफ इंडीया मार्गे पी.एन्.पी. कॅटमरानचा प्रवास सुरु केल्यावर काही वेळातच अथांग अरबी समुद्राच्या मधोमध इंग्रजी 'एल' आकारातली जेट्टी आपले लक्ष वेधून घेते व आजुबाजुस सिंधुसागराचे निळे पाणी, दोनही बाजूस पसरलेली दाट सुरुची वन, वॉटर स्पोर्ट्स व कॅटमरानच्या रंगिबेरंगी बोटी दिसू लागतात व कॅटमरानवरुन प्रवास करताना हिवाळ्यात परदेशी पाहूणे फ्लेमिंगो व सिगल सारखे पक्षीगण प्रवासात आपली साथसोबत करत असतात. खाण्याच्या आशेने हे पक्षी आपल्या आजुबाजुस विहार करीत असले तरी आपण देत असलेले सर्वच अन्न यांना लाभतेच असे नाही. हे सर्व स्वर्गातित दृश्य पहात असताना कधी कॅटमरान मांडवा जेट्टीवर लागते हे कळत नाही. मांडवा येथे पाहण्यासारख्या अनेक स्थळांमध्ये येथील टाकादेवी या जागृत देवस्थानाचे नाव घ्यावे लागेल. टाकादेवी ही येथील स्थानिकांची इष्टदेवता भर समुद्रातल्या कपारीत आहे व येथे जाण्यासाठी अनेक किलोमिटरचा रस्ता कपारीतून पार करावा लागतो. हे दिव्य पार केल्यावर कपारीतच खोलवर गेलेले एक भुयार दिसून येते या भुयारात ही देवी आहे. या देवीचे दर्शन घेण्यासाठी ओहोटीच्या वेळेसच यावे लागते भरतीच्या उधाणास ही भेट शक्यतो टाळावी.

मांडवा बीच सुद्धा अतिशय प्रेक्षणीय आहे, वॉटर स्पोर्टसचा व समुद्र स्नानाचा आनंद घ्यावयाचा असल्यास येथे नक्की भेट द्यावी. मांडवा हे गाव निसर्गरम्य असल्याने व मुंबईहून अगदी हाकेच्या अंतरावर असल्याने अनेक बॉलिवुड सेलिब्रिटी, राजकारणी तथा उद्योजकांनी येथे बंगले बांधले असून दर आठवड्यास ते येथे भेट देत असतात तसेच येथील निसर्गरम्यतेमुळे हा सर्व परिसर अनेक चित्रपटाच्या शुटींग्सनी वर्दळलेला असतो.

रायगड जिल्ह्यातला हा अष्टागरांचा परिसर फार प्राचिन काळापासून सर्वसंपन्न आहे व हजारो वर्षे लोटली तरी येथील नागरिकांचे निसर्गप्रेम शाबुत असल्याने या परिसराची खरी ओळख आजतागायत अबाधित आहे. अष्टागरांची सफर करावयाची असल्यास अष्टागरांच्या या मांडवास भेट द्यायलाच हवी तरच अष्टागरांचा वैभवसंपन्न सोहळा खर्‍या अर्थी अनुभवता येईल.