धामणदऱ्याची ऐतिहासिकता

मावळ तालुक्यात अनेक ठिकाणी अशा पोढी आहेत. बोरघाटातून पुणे किंवा चाकण कडे जाणाऱ्या मार्गावर - 'वलवण, देवघर, शिलाटणे, टाकवे, कान्हे' अशी पाणपोढ्यांची माळच आहे. - दिपक पटेकर

धामणदऱ्याची ऐतिहासिकता

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

प्राचीन काळापासून कोकणातून घाटमाथ्यावरील महत्त्वाच्या वसाहतींकडे जाणारे अनेक घाटमार्ग सह्याद्रीच्या डोंगररांगेतून जातात. ह्या मार्गांवरुन प्रवास करणाऱ्या व्यापारी, लष्करी, भिक्षूक तसेच इतर प्रवाश्यांची तहान भागवण्यासाठी मार्गांमध्ये अनेक ठिकाणी पाण्याची कातळात खोदलेली टाकी आढळतात. परिसरातील लेण्यांमध्ये आढळणाऱ्या टाक्यांसारखीच ह्या मार्गांवरील टाक्यांची रचना असलेली दिसते. लेण्यांमधील शिलालेखांमध्ये ह्या टाक्यांसाठी 'पोढी' असा शब्द आला आहे.

मावळ तालुक्यात अनेक ठिकाणी अशा पोढी आहेत. बोरघाटातून पुणे किंवा चाकण कडे जाणाऱ्या मार्गावर - 'वलवण, देवघर, शिलाटणे, टाकवे, कान्हे' अशी पाणपोढ्यांची माळच आहे. अंदर मावळात कुसुर घाटात व मालेगाव-पिंपरी गावातून पधारवाडी-वांद्रे कडे जाणाऱ्या पायवाटेवर वांद्रे-खिंडीत पाणपोढी आहेत. पौन मावळातही बहुतेक दोन ठिकाणी अश्या टाक्या असल्याची माहिती माझ्याकडे आली होती, पण प्रत्यक्ष वा फोटोस्वरुपात पाहिले नसल्यामुळे, मला खात्रीशीर माहिती देता येणार नाही. (कृपया, कुणाला माहिती असल्यास नक्की कळवा.)

पाणपोढींची रचना तसेच शिलालेख ह्यांवरुन लेण्यांचा व टाक्यांचा काळ एकच असलेला दिसून येतो. राजसत्तेचा उल्लेख करायचा झाल्यास लेण्यांसह मार्गांवरील पोढीही 'सातवाहन' कालीन आहेत, असे म्हणावे लागेल.

आता मुख्य विषयाकडे येऊयात. मध्ययुगीन नाणे मावळ व पौन मावळ ह्या दोन प्रदेशांमधील नैसर्गिक सीमारेषा म्हणजे लोहगडाची डोंगररांग. (ह्या रांगेवर लोहगड हा परिसरातील महत्वाचा किल्ला वसला आहे. रांगेचे विशेष काही नाव असल्यास, ते मला सध्या माहित नसल्याने येथे लोहगडाची डोंगररांग असा उल्लेख केला आहे.) ही रांग कुरवंडे-साकुर पठार येथून सुरु होऊन तळेगाव येथे संपते. ही डोंगररांग पार करुन जाण्यासाठी जागोजागी नैसर्गीक खिंडी आहेत. त्यांचा वापर आजच नाही तर अगदी खुप आधीच्या काळापासून होत असल्याच्या ऐतिहासिक खुणा तेथे आढळतात. उदाहरणार्थ : लोहगडाखालील दुधीवरे खिंडीच्या अलिकडे वाघोबाचे शिल्प आहे. चिखलसे-ब‌ऊर येथील खिंडीत महादेवाचे मंदिर आहे‌.

अशीच एक खिंड दुधिवरे खिंडीच्या अलिकडे आहे. 'धामणदरा' असे ऐतिहासिक नावही ह्या खिंडीत आहे. खिंडीच्या बरोबर मध्यभागी वाघोबाचे स्थानही आहे. ह्या खिंडीतून जाणारा मार्ग नाणे मावळातील औंढे खुर्द ह्या ऐतिहासिक गावाला पौन मावळातील आपटी-पाले-आंबेगाव ह्या पवना नदीच्या काठावरील ऐतिहासिक गावांना जोडत असे. कोकणातील परळी-जांभूळपाडा येथून सवघाटातून वर येणारा एक मार्ग आंबेगावात मिळत असे व येथून पुढे डोणे - कासारसाई - मारुंजी - वाकड मार्गे पुण्यातकडे जाता येत असे. मुंबईहून पुण्याकडे जाण्याचा हा आणखी एक पर्यायी मार्ग. एल्फिन्स्टन, जेम्स वेल्स ह्यांनी ह्या मार्गांचा वापर केल्याचा उल्लेख त्यांच्या प्रवासवृत्तांता मध्ये केला आहे.

औंढे खुर्द ह्या गावात अनेक ऐतिहासिक अवशेष विखुरलेले आहेत. गावात नागनाथ महादेवाचे जुने मंदिर आहे. सध्या 'जिर्णोद्धार' झालाय पण दगडी बांधणीचे गर्भगृह अजूनही व्यवस्थित आहे. मंदिरासमोर दगडी खांब, वीरगळ, स्मृतीशिळा, मूर्ती असे अवशेष आहेत. स्मृतिशिळांवर शिलालेखही आहेत. गुरांना चरण्यासाठी दान दिलेली जमीन दर्शवणारी 'सवत्स-धेनूगळ' शिळाही जवळच आहे. महादेव मंदिराच्या मागेही वाघोबा मंदिर आहे.

नागनाथ मंदिराच्या दक्षिणेस सातशे मीटर अंतरावर धामणदरा खिंडीच्या पायथ्याशी एके ठिकाणी दोन कातळात कोरलेल्या पाण्याच्या टाक्या आहेत. पैकी एका टाक्यात मुखापर्यंत माती भरलेली आहे. तर दुसरे मोकळे असून त्यात पाणी आहे. सोबत फोटो मध्ये टाक्याचे चौकोनी मुख दिसून येईल. अशी रचना वर उल्लेख केल्या बऱ्याच पोढींशी मिळती-जुळती आहे. ह्यावर कोठेही शिलालेख आढळून आला नाही. पण रचनेवरुन हेही पाणटाके वर उल्लेख केलेल्या काळातील असण्याची शक्यता दाट आहे. ह्या टाक्याचा उपयोग अर्थातच धामणदरा खिंडीतून‌ प्रवास करणाऱ्या प्रवाश्याची तहान भागवण्यासाठी होत असणार. स्थानिकांशिवाय इतरांना ह्या पोढीबद्दल अधिक कल्पना नाही.

१७७४ ते १७८४ दरम्यान झालेल्या इंग्रज-मराठा युद्धाच्या कागदपत्रांमध्ये - इंग्रजांना हरवण्यासाठी मराठा सैन्याने अडवलेले मार्ग व खिंडी ह्यांमध्ये धामणदऱ्याचा उल्लेख येतो. धामणदरा बोरघाटावरील पुण्याच्या मार्गातील काही अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणांपैकी एक दिसून येते. १८२९ च्या जॉन क्लून्स संपादित पश्चिम भारतातील मार्गांच्या पुस्तकातही धामणदऱ्याच्या उल्लेख Damun Khind असा येतो.

सध्याची धामणदरा खिंडीतील मार्गाची स्थिती फारशी बरी नाही. औंढेतून खिंडीपर्यंत पक्का डांबरी मार्ग गेलेला आहे. पण तेथून पुढे आपटीच्या दिशेला उतरणारा मार्ग अनेक ठिकाणी पावसाच्या माऱ्यामुळे वाहुन गेलेला दिसतो. काही ठिकाणी अगदीच दगड-मातीच आहे. तरीही त्या रस्त्यावरुन दुचाकीवरुन लोणावळ्यात शाळा व‌ कॉलेजला जाणाऱ्या मुलांचे साहसी कसब पहायला मिळते. सध्या हा रस्ता कुठलेही वाहन चालवण्यासाठी अयोग्यच आहे. ह्याला कारण आहे, पवना धरणाच्या बांधकामामुळे पलिकडील बरीच गावे स्थलांतरीत झाली आहे. दुधिवरे खिंड हा पर्यायी मार्ग उपलब्ध आहे. सध्या खिंडीच्या खालील भागात वस्ती बऱ्यापैकी कमी आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्राच्या किनाऱ्यावर मूळ लोकांच्या वस्तीपेक्षा मोठ्या शहरातील श्रीमंतांचे बंगलेच अधिक आहेत. असो !

मावळातील प्राचीन मार्गांचे जाळे समजून घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या भौतिक साधनांमध्ये आणखी एका ठिकाणाची भर पडली आहे. औंढे येथील पोढीची ओळख करुन देऊ शकलो, ह्याचा मला आनंद आहे. ह्या पोढीबद्दल स्थानिकांकडून माहिती मिळवून ती माझ्यापर्यंत पोहचवणारे श्री. Shivaji Gade ह्यांचे अनेकानेक आभार !!

- दिपक पटेकर