विजापूरचा गोल घुमट
विजापूरमधील एक प्रसिद्ध स्थळ म्हणजे गोल घुमट. आपल्याकडे यास गोल घुमट या नावाने ओळखले जात असले तरी या स्थानाचे मूळ नाव आहे गोल गुम्बझ.
कर्नाटक राज्यातील विजापूर हे स्थळ आपल्या ऐकण्यात आले नसेल असे होऊच शकत नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण करताना ज्यांच्यासोबत प्रथम लढा द्यावा लागला त्या आदिलशाही राज्याची विजापूर ही राजधानी असून शिवरायांनी स्वराज्य स्थापन करण्यापूर्वी महाराष्ट्रातील बराचसा भाग या आदिलशाही राज्याच्या अंतर्गत येत असे.
अशा या विजापूरमधील एक प्रसिद्ध स्थळ म्हणजे गोल घुमट. आपल्याकडे यास गोल घुमट या नावाने ओळखले जात असले तरी या स्थानाचे मूळ नाव आहे गोल गुम्बझ. जुन्या साधनांत या इमारतीचा बोळ घुमझ अथवा गोल घुंबड असाही उल्लेख आला आहे. या इमारतीच्या घुमटाचा आकार गोल असल्याने यास गोल घुमट असे नाव पडले असावे.
गोल घुमट म्हणजे मुहम्मद आदिलशाह या आदिलशाही सुलतानाची कबर असून या इमारतीस सुलतान मुहम्मद आदिलशहाचा दर्गा या नावानेही ओळखले जाते. मुहम्मद आदिलशाह हा एक प्रबळ आदिलशाही सुलतान मानला जात असे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळी मावळ प्रांतात नुकतीच स्वराज्य निर्मितीस सुरुवात केली त्यावेळी त्यांना याच सुलताना विरोधात सर्वप्रथम लढा उभारावा लागला होता. मुहम्मद आदिलशहाचा १६५६ साली मृत्यू झाला आणि विजापूरची सूत्रे त्याची पत्नी बडी बेगम हिच्याकडे गेली व यानंतर आदिलशाही राज्याचे वैभव हळू हळू कमी होत गेले.
गोलघुमट या इमारतीच्या निर्मितीचे कार्य मोहम्मद आदिलशहाच्या काळातच सुरु झाले होते मात्र त्यानंतर एका वर्षातच त्याचा मृत्यू झाल्याने या इमारतीचे काम काहीसे अपूर्ण राहिले होते. कालांतराने या इमारतीचा वापर मोहम्मद आदिलशहाची कबर म्हणून करण्यात आला. या ठिकाणी मुहम्मद आदिलशहाच्या कबरीव्यतिरिक्त त्याच्या दोन पत्नी, एक प्रेयसी, कन्या आणि नातू यांचासुद्धा कबरी आहेत.
विजापूर शहराच्या ईशान्य दिशेस गोल घुमट असून याची उंची २२३ फूट असल्याने फार दुरूनही याचे दर्शन होते. गोल घुमटाची लांबी १९८ फूट असून रुंदी सुद्धा तेवढीच आहे. गोल घुमटाच्या चारही बाजूना चार मनोरे आहेत आणि मनोऱ्याच्या सहाव्या मजल्यास लागून इमारतीच्या सभोवताली वर्तुळाकार सज्जा आहे. गोल घुमटाची उंची २२३ फूट असली तरी वरील ताज महाल अंतर्भूत केल्यास याची उंची २५० फूट होते.
घुमटास जे चार मनोरे आहेत त्या प्रत्येकास आठ मजले आहेत. गोल घुमटाची जाडी १२ फूट, व्यास १३५ फूट, सज्ज्याचा घेर ४०० फूट आहे. गोल घुमटाचे एक वैशिट्य म्हणजे त्याच्या एका टोकास उभे राहून आणि भिंतीला तोंड लावून काही बोलल्यास दुसऱ्या बाजूच्या भिंतीला कान लावलेल्या माणसास सर्व काही स्पष्ट ऐकू येते. विशेष म्हणजे या दोन्ही बाजूंमधील अंतर १३० फूट एवढे आहे.
गोल घुमट हा भारतातील सर्वात मोठा घुमट आहे असे म्हणतात. घुमटाच्या दिवाणखान्यात हाक मारली असता पुन्हा ती हाक आपल्याला चार पाच वेळा ऐकू येते. दिवाणखान्याच्या सज्जात बसण्यासाठी जागा असून येथे एका चौथऱ्यावर बसून हळू आवाजात काही बोलल्यास दुसऱ्या चौथऱ्यावर बसलेल्या व्यक्तीस आपले बोलणे ऐकू येते. घड्याळ्याच्या काट्यांचा आवाज सुद्धा येथे स्पष्ट ऐकू येतो असेही म्हणतात.
मध्ययुगीन मुस्लिम स्थापत्यशैलीची अनेक उदाहरणे विजापूर येथे अस्तित्वात असली तरी गोल घुमट ही वस्तू या सर्वांमध्ये अत्यंत प्रसिद्ध अशी वस्तू असून जगभरातून पर्यटक या वास्तूस भेट देत असतात.