रायगड किल्ल्याचा अभेद्य वाघ दरवाजा

वाघ दरवाजा किल्ल्याच्या दक्षिण दिशेस असलेला एकमेव दरवाजा असून याची बांधणी आपत्कालीन स्थितीत गडावरून बाहेर पडण्याकरिता आणि शत्रुंना फसवण्यासाठी करण्यात आली होती.

रायगड किल्ल्याचा अभेद्य वाघ दरवाजा

स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडाचा विस्तार प्रचंड आहे व या ठिकाणी राजधानीस शोभेशा अनेक वास्तू आहेत. 

स्वराज्याची ही राजधानी पाहण्यासाठी अनेक शिवप्रेमी रायगडास भेट देत असतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांना व  भूतलावरील आश्चर्यकारक अशा या किल्ल्यास नमन करीत असतात.

रायगडावर आजही अनेक वास्तू आहेत ज्यांना फार कमी शिवप्रेमी भेट देतात व यापैकी एक म्हणजे वाघ दरवाजा.

आज्ञापत्रात लिहिले आहे की, किल्ल्याचा येक दरवाजा हा ऐब थोरलाच आहे. याकरिता गड पाहोन येक, दोन, तीन दरवाजे, तैशाच थोर दिंड्या करून ठेवाव्यात.

वाघ दरवाजा किल्ल्याच्या दक्षिण दिशेस असलेला एकमेव दरवाजा असून याची बांधणी आपत्कालीन स्थितीत गडावरून बाहेर पडण्याकरिता आणि शत्रुंना फसवण्यासाठी करण्यात आली होती.

येथे येण्यासाठी ८६० मीटर उंच अशा बालेकिल्ल्यावरून दक्षिणेस असलेल्या कुशावर्त तलावाच्या मागील बाजूस अदमासे १४५ मीटर खाली उतरावे लागते. 

वाघ दरवाज्याची समुद्रसपाटीपासून उंची ७१५ मीटर आहे. हा दरवाजा म्हणजे किल्ल्याच्या महादरवाज्याची हुबेहूब प्रतिकृती असून दोघांत फक्त आकाराचा फरक आहे.

यादवांची राजधानी देवगिरी हा दुर्गस्थापत्याचे उत्तम उदाहरण असला तरी या गडास फक्त एकच वाट असल्याने शत्रुंना हा जिंकता आला. दुर्गस्थापत्याची उत्तम माहिती असलेल्या शिवाजी महाराजांनी म्हणूनच वाघ दरवाज्याची दूरदृष्टी ठेवून निर्मिती केली व त्यामुळेच १६८९ साली मोगलांनी किल्ल्यास वेढा घातल्यावर राजाराम महाराज आपल्या सहकाऱ्यांसह वाघ दरवाज्यामार्गेच गड उतरून जिंजीस गेले.

वाघ दरवाज्याचे मुख्य वैशिट्य म्हणजे येथून खाली उतरण्यास महादरवाज्याप्रमाणे वाट नसून खाली सरळ कडा आहे आणि खाली उतरण्यासाठी कातळारोहणाची कला अवगत असणे आवश्यक आहे. पूर्वी येथून कातळारोहण अथवा दोरखंड लावून उतरता येत असे.

रायगड किल्ल्याचा हा अभेद्य वाघ दरवाजा पाहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीपुढें आपले हात आपोआप जोडले जातात.