पारशी समाजाचा इतिहास
पारशी समाजाचे व्यापारातील कौशल्य व सातत्य यामुळे समाजातील अनेक जण व्यावसायिक क्षेत्रात पुढे आले यामध्ये सर जमशेदजी जिजाबाई, टाटा ग्रुपचे संस्थापक जमशेदजी टाटा इत्यादींची नावे घेता येतील. ही परंपरा पुढे दोराबजी टाटा, रतनजी टाटा, नवल टाटा, आर. डी. टाटा, जे. आर. डी. टाटा, रतन टाटा इत्यादींनी कायम राखली.

भारतात जे विविध धर्मीय लोक गुण्यागोविंदाने राहतात त्यापैकी एक म्हणजे पारशी समाज. पारशी समाज हा भारतातील एक महत्वाचा मात्र अल्पसंख्याक समाज म्हणून ओळखला जातो. लोकसंख्येने कमी असला तरी पारशी समाजाने देशास अनेक महान व्यक्तिमत्वे दिली आहेत. पारशी समाजाचा इतिहास व ते भारतात कसे व केव्हा आले हे जाणून घेण्याचा प्रयत्न या लेखाच्या माध्यमातून करू.
पारशी हे मुळचे सध्याच्या इराण देशातले नागरिक. पूर्वी इराण देशास पर्शिया या नावाने ओळखले जात असे. पारशी हे मूळचे आर्यवंशीय असून झरतुष्ट्रने पारशी धर्माची संस्थापना केल्यावर ते पारशी धर्माचे अनुयायी झाले. पारशी धर्माच्या मते उर्मजद हा जगाचा उत्पत्ती स्थिती व लय कर्ता असून सद्गुणांचे आश्रयस्थान आहे व अहरीमन हा पापकर्माचा उत्पादक आणि प्रसारक असून उर्मजदने निर्माण केलेल्या सृष्टीत बिघाड करण्याचा सारखा प्रयत्न करत असतो. असे असले तरी अखेरीस सर्वशक्तिमान उर्मजदचाच विजय होऊन अहरीमनचा पराजय होईल व हेच पारशी धर्माचे सार आहे.
पारशी लोक मूर्तिपूजा करीत नाहीत मात्र ते अग्नीस ईश्वराचे पवित्र आणि उज्वल चिन्ह मानीत असल्याने ते अग्निपूजक आहेत व अग्नी (तेज) व्यतिरिक्त पंचमहाभूतांतील पृथ्वी, आप (जल), वायू आणि आकाश इत्यादी गोष्टींनाही ते पवित्र मानतात. शुद्ध आचार व विचार यांचे पालन करणे ते महत्वाचे मानतात. पारशी धर्मियांच्या पूजास्थानास अग्यारी या नावाने ओळखले जाते.
इराण देशात जो पर्यंत सिकंदरचे राज्य होते तोपर्यंत पारशी समाज इराणमध्ये खूप चांगल्या स्थितीत होत्या मात्र सिकंदरनंतर पारशी धर्मास इराणमध्ये उतरती कळा लागली कारण इसवी सनाच्या सातव्या शतकाच्या सुरुवातीस अरब देशांत इस्लाम धर्माची स्थापना होऊन पुढे त्याची वाढ झपाट्याने होऊ लागली आणि याच काळात म्हणजे इसवीसन ६४१ साली पारशी समाजाचा शेवटचा बादशाह यझदजर्द याचा अरबांनी निहाबंद येथील युद्धात दारुण पराभव केला. पराभवानंतर यझदजर्द आपला जीव वाचवून पळाला मात्र त्याने आपल्या मदतीस जे तुर्की सैन्य बोलावले होते ते फितूर झाले आणि त्यांनी यझदजर्दची हत्या केली.
यझदजर्द ज्या दिवशी राज्याच्या गादीवर बसला त्या दिवसापासून पारशी लोकांच्या कालगणनेचा आरंभ होतो. यझदजर्द याच्या मृत्यूनंतर सर्व इराण मुस्लिम धर्मीय अरबांच्या हाती आला आणि इराणमध्ये मोठ्या प्रमाणात धर्मांतर होऊन अनेक पारशी मुस्लिम झाले मात्र जे पारशी आपला धर्म धरून राहिले त्यांचा प्रचंड छळ सुरु झाला व यामुळे आपली मूळ भूमी सोडणे हाच पर्याय उर्वरित पारशी धर्मियांकडे उरून ते प्रथम इराणच्या ईशान्य दिशेकडील खुरासान प्रांताच्या डोंगराळ भागात जाऊन राहिले.
खुरासान या प्रांतातही पारशी लोकांचा फारसा निभाव लागला नाही त्यामुळे यापैकी काही लोक इराणच्या आखातातील उर्मझ नावाच्या बेटावर गेले मात्र त्याच्या दुर्दैवाने उर्मझ हे बेटही अरबांच्या ताब्यात गेले व शेवटी आपला जीव घालवण्यापेक्षा अरबस्थान कायमचा सोडणे योग्य समजून पारशी लोकांचा एक समूह भारताच्या दिशेने निघाले.
पारशी लोकांनी भारतास आपले आश्रयस्थान म्हणून निवडण्याचे कारण म्हणजे प्राचीन काळापासून भारत व इतर देशांचे व्यापारानिमित्त संबंध होते व यामध्ये पर्शिया अर्थात इराण देशाचाही समावेश होता त्यामुळे पारशी समाजास भारतात विविध संस्कृती वर्षानुवर्षे गुण्यागोविंदाने नांदत असल्याचे माहित होते. अशा प्रकारे उर्मझ येथून पारशी लोकांचा एक समूह भारताकडे समुद्रमार्गे रवाना होऊन प्रथम गुजरात येथील काठेवाड प्रांतातील दीव या बेटात पोहोचला व दीव येथे त्यांनी अदमासे एकोणीस वर्षे वास्तव्य केले.
दिव येथे निवास करत असताना पारशी समाजातील एका वृद्ध ज्योतिषाच्या सल्ल्यानुसार पारशी लोकांनी दीव बेटावरून तत्कालीन ठाणे जिल्यातील व सध्याच्या गुजरातमधील संजान नामक बंदरावर स्थलांतर केले. संजान बंदराचा समावेश त्याकाळी जदू उर्फ यदुराणा या राजाच्या ताब्यात होत असे व हा राजा म्हणजे देवगिरीच्या यादव वंशातील एक असावा.
संजान येथे पोहोचल्यावर पारशी समाजाने यदुराण्याची भेट घेतली व त्याच्याकडे आश्रय मागितला त्यावेळी यदुराण्याने काही अटींवर पारशी समाजास आश्रय देण्याचे कबूल केले व या अटी म्हणजे पारशी लोकांनी गुजराती भाषा बोलणे, स्त्रिया व पुरुषांचा पोशाख स्थानिक लोकांप्रमाणे ठेवणे, लग्नविधी रात्री करणे आणि हत्यारांचा वापर न करणे या होत्या.
पारशी लोकांनी या अटी मान्य केल्या व संजान बंदरात तब्बल तीनशे वर्षे सुखाने वास्तव्य केले. या दरम्यान इराण येथून पारशी लोकांचे समूह थोड्या थोड्या काळाने भारतात येतच होते व संजान येथून हळू हळू पारशी समाजाच्या वसाहती नारगोळ, ठाणे, सुरत, नवसारी, खंबायत, अंकलेश्वर इत्यादी ठिकाणीही विस्तारित होत गेल्या.
इसवी सनाच्या अकराव्या बाराव्या शतकात पारशी लोकांची एक वसाहत पंजाब येथेही असल्याचे उल्लेख मिळतात. पारशी लोक सुरत येथे राहत असताना इंग्रजांनी भारतात व्यापारानिमित्ताने प्रवेश करून सुरत येथे वखार सुरु केली त्यावेळी पारशी लोकांनी इंग्रजांना व्यापारात मदत केली आणि पुढे इंग्रज व पारशी समाजाचे जे ऋणानुबंध निर्माण झाले ते अखेरपर्यंत कायम राहिले.
पुढील काळात इंग्रजांचे ठाणे मुंबईस गेले त्यावेळी सर्व पारशी मुंबई येथे स्थलांतरित झाले आणि पाहता पाहता व्यापाराच्या माध्यमातून पारशी लोकांनी मुंबई इलाख्यात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले. पारशी समाजाचे व्यापारातील कौशल्य व सातत्य यामुळे समाजातील अनेक जण व्यावसायिक क्षेत्रात पुढे आले यामध्ये सर जमशेदजी जिजाबाई, टाटा ग्रुपचे संस्थापक जमशेदजी टाटा इत्यादींची नावे घेता येतील. ही परंपरा पुढे दोराबजी टाटा, रतनजी टाटा, नवल टाटा, आर. डी. टाटा, जे. आर. डी. टाटा, रतन टाटा इत्यादींनी कायम राखली.
पारशी समाज हा कर्मप्रधान असल्याने प्रत्येक पारशी हा काहीनाकाही व्यवसाय करूनच उपजीविका करतो व यामुळे रस्त्यावर भिक्षा मागणारा एकही पारशी आपल्या दृष्टीस पडणार नाही असे फार पूर्वीपासून म्हटले जाते. अशाप्रकारे लोकसंख्येने कमी मात्र कर्तबगारीने उच्च असा हा पारशी समाज भारताच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीतील एक महत्वाचा घटक आहे.