सर आइजैक न्यूटन - एक महान वैज्ञानिक
१६६० साली न्यूटनने केम्ब्रिज येथील विद्यालयात प्रवेश घेतला व येथे शिक्षण घेत असताना प्रकाशकिरणांचे पृथक्करण करण्याच्या प्रयोगावर त्याने लक्ष केंद्रित केले व या प्रयोगात त्यास चांगले यश मिळाले व हा प्रयोग म्हणजे न्यूटनने लावलेला पहिला शोध म्हणून प्रसिद्ध आहे.
जगाच्या इतिहासात प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत जे शास्त्रज्ञ व संशोधक झाले त्यापैकी एक प्रसिद्ध नाव म्हणजे सर आइजैक न्यूटन. न्यूटनचा जन्म १६४२ साली इंग्लडमधील लिंकशायर नावाच्या प्रांतातील एका छोट्याश्या खेड्यात झाला. लिंकशायर हा त्याकाळी इंग्लंड मधील एक परगणा म्हणून ओळखला जात असे.
प्राथमिक शिक्षण आपल्या जन्मगावीच पूर्ण केल्यानंतर वयाच्या बाराव्या वर्षी पुढील शिक्षणासाठी न्यूटन ग्रांथम येथे गेला व तेथून त्याने पुढील विद्याभ्यासास सुरुवात केली. लहानपणापासूनच विविध यंत्रांचे आकर्षण असल्याने ही यंत्रे कशी कार्य करतात हे पाहण्यासाठी न्यूटन या यंत्रांचे तासनतास निरीक्षण करीत बसे व तशाप्रकारची यंत्रे स्वतः तयार करण्याचा प्रयत्न करीत असे. या काळातच न्यूटनने एक घड्याळ व छायायंत्र स्वतः तयार केले.
१६६० साली न्यूटनने केम्ब्रिज येथील विद्यालयात प्रवेश घेतला व येथे शिक्षण घेत असताना प्रकाशकिरणांचे पृथक्करण करण्याच्या प्रयोगावर त्याने लक्ष केंद्रित केले व अथक प्रयत्नांती या प्रयोगात त्यास चांगले यश मिळाले. प्रकाशकिरणांच्या पृथकरणाचा हा प्रयोग म्हणजे न्यूटनने लावलेला पहिला शोध म्हणून प्रसिद्ध आहे.
१६६५ साली इंग्लंडमध्ये प्लेगची मोठी साथ आली ज्यामुळे न्यूटनला केम्ब्रिज येथून आपल्या घरी जावे लागले व याच काळात न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा अतिशय महत्वाचा शोध लावला. गुरुत्वाकर्षणाच्या या शोधामागे एक प्रसिद्ध कहाणी आहे व ती म्हणजे एक दिवस न्यूटन आपल्या बागेत झाडाखाली बसला असता एक फळ (बहुदा सफरचंद) झाडावरून खाली पडताना त्याला दिसले व हे फळ झाडावरून खाली कसे पडले याचा विचार करताना त्यास पृथीमध्ये असलेल्या आकर्षण शक्तीमुळे पदार्थ तिच्याकडे आकर्षित होत असावेत असा सिद्धांत त्याने मांडला व याच सिद्धान्तावरून त्याने पुढे चंद्र व सूर्यमालेतील इतर ग्रह आपापल्या कक्षांमध्ये फिरतात त्याचे कारण गुरुत्वाकर्षण असावे असा शोध लावला व हा शोध पुढे सर्वमान्य झाला.
१६६७ साली न्यूटन पुन्हा एकदा केम्ब्रिज येथे आला व येथे त्याने एका विद्यालयात गणिताच्या शिक्षकाचे कार्य सुरु केले. गणिताचा शिक्षक म्हणून नोकरी करताना न्यूटनला फार कमी पगार प्राप्त होत असे व हा पगार संपूर्णपणे त्याच्या आईच्या उपजीविकेसाठी खर्च होत असल्याने न्यूटनला संशोधनासाठी पुस्तके आणि प्रयोगाची साधने विकत घेण्यास पैसा शिल्लक राहत नसे तरी उपलब्ध साधनांच्या बळावर न्यूटनने आपल्या संशोधनाच्या कार्यात सातत्य ठेवले.
१६८३ साली न्यूटनने 'प्रिन्सिपिया' नामक एक गणितावरील ग्रंथ लिहून तो प्रसिद्ध केला व या ग्रंथामुळे न्यूटनला नावलौकिक मिळून त्यास शासनाच्या टांकसाळेवर मुख्य अधिकाऱ्याची नोकरी मिळाली व ही नोकरी न्यूटनने शेवटपर्यंत कायम ठेवली.
त्याकाळी संपूर्ण युरोपखंडात न्यूटनएवढा हुशार माणूस कुणीच नव्हता असे म्हटले जायचे मात्र या विद्येचा गर्व न्यूटनने कधीच केला नाही उलट एकेदिवशी मित्रासोबत समुद्र किनाऱ्यावर फिरत असताना किनाऱ्यावरील वाळूचा एक लहानगा कण त्याने हाती घेतला व म्हणाला की 'या अनंत विश्वात जे काही सामावले आहे त्यामानाने माझे ज्ञान हे या वाळूच्या कानाएवढेच असेल' .
१७२७ साली न्यूटनचे वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले मात्र आपल्या कार्यकाळात त्याने गणित, भौतिकशास्त्र, ज्योतिषशास्त्र आणि दार्शनिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले व ग्रहांची गती, धूमकेतूंच्या कक्षा, समुद्राच्या भरती व ओहोटीची कारणे, प्रकाशाचे पृथक्करण, गुरुत्वाकर्षण, प्रकाश व रंग यांचे गुणधर्म असे अतिशय महत्वाचे शोध लावून जगाच्या वैज्ञानिक इतिहासात एक आदर्श प्रस्थापित केला.