राजगड किल्ल्याचा अभेद्य पाली दरवाजा

ज्या दुर्गावर छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वाधिक वास्तव्य केले त्या राजगड किल्ल्याच्या पद्मावती माचीवर पोहोचण्यासाठी जे दोन प्रमुख मार्ग आहेत त्यांची नावे अनुक्रमे गुंजवणे व पाली अशी आहेत. वेल्हे या गावापासून जर राजगडाच्या पदमावती माचीवर दाखल व्हायचं असेल तर पाली दरवाज्याच्या मार्गाचा वापर करणे उत्तम आहे.

राजगड किल्ल्याचा अभेद्य पाली दरवाजा
पाली दरवाजा

राजगड हा किल्ला म्हणजे शिवरायांचे पहिले राजकीय केंद्र कारण शिवचरित्रातील अत्यंत प्रमुख ऐतिहासिक घटनांचा हा किल्ला साक्षीदार आहे. या किल्ल्याच्या साक्षीनेच स्वराज्य फुलले व पुढे त्याचे साम्राज्यात रूपांतर झाले. १२ मावळांपैकी गुंजण मावळ खोऱ्याचा एक संरक्षक असलेला हा किल्ला शिवरायांनी जिंकलेला दुसरा किल्ला होय. तोरण्यावर मिळालेल्या खजिन्याचा उपयोग महाराजांनी राजगड हा किल्ला बांधण्यास केला व येथून स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर करण्यासाठी यत्न केले.

पुण्यापासून वेल्हे हे गाव ५६ किमी असून हे गाव तालुक्याच्या ठिकाणाचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. वेल्हे गावात आल्यावर तेथून पाबे  नावाचे एक गाव आहे तेथपर्यंत जावे व पुढे लागणारी कानदी हि नदी व खरीव खिंड ओलांडून वाजे या गावापर्यंत जाता येते. वाजे गावापासून किल्ल्याची खरी चढण सुरु होते आणि हि चढण सरळसोट असल्याने दमछाक करणारी असते. मात्र पाली दरवाज्याकडे जाणारा हा रस्ता प्रशस्त असल्याने जाण्याचा मार्ग सुखकर होतो.

राजगड या किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून तब्बल १३९४ मीटर उंच आहे. शिवचरित्र अभ्यासकांच्या मते राजगड हा स्वराज्याची उंची दाखवितो तर रायगड स्वराज्याचा विस्तार. राजगड हा किल्ला बांधताना राजधानीचे ठिकाण नजरेसमोर ठेवूनच किल्ल्यावरील इमारतींचे बांधकाम करण्यात आले होते त्यामुळे राजगडावरील प्रत्येक वस्तूचा एक स्वतंत्र इतिहास होऊ शकेल. राजगडावरील अशीच एक वस्तू म्हणजे पाली दरवाजा. 

पाली दरवाज्यास एकूण दोन दरवाजे आहेत यातील पहिल्या प्रवेशद्वारातून हत्तीसुद्धा आरामात जाऊ शकेल इतके ते उंच व भव्य बनवले आहे. या दरवाज्याच्या दोन्ही बाजूना मजबूत बुरुज बांधले असून हे प्रवेशद्वार ओलांडून काही मीटर चालत गेल्यास दुसरे प्रवेशद्वार लागते. याही दरवाज्याच्या दोनही बाजूस भक्कम बुरुज आहेत आणि वरील बाजूना शत्रूंवर गोळ्यांचा मारा करण्यासाठी छिद्रांची व्यवस्था केली आहे. 

या दरवाज्यावर आणि त्याच्या बुरुजांवर गोल आकाराचे झरोके ठेवले आहेत ज्यांचा वापर खालून येणाऱ्या शत्रूंवर तोफांचा मारा करण्यासाठी होत असे. प्रवेशद्वाराच्या मध्यभागी एक खिडकी दिसून येते जिचा वापर दरवाजा बंद असताना पहारा ठेवण्यासाठी होत असावा. टोकदार कमानीच्या वरच्या बाजूस राजमुकुट सदृश शिल्प कोरलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले सार्वभौमत्व दाखवण्यासाठी हि आकृती कोरली असावी असे अभ्यासकांचे मत आहे. दुसऱ्या दरवाज्यातून बाहेर निघाल्यावर आपण जेव्हा डाव्या बाजूस जातो तेव्हा तेथे पहारेकऱ्यांची खोली असून या ठिकाणाहून दरवाजातून आत येणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवले जात असे. आणि अशाच प्रकारची  खोली डाव्या बाजूसही आहे जिच्यामधून किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर लक्ष ठेवता येत असे.

तर अशा पद्धतीने राजगडाच्या पदमावती या अतिशय महत्वाच्या माचीकडे जाणारा हा पाली दरवाजा शिवकाळात किती महत्वाचा होता हे आपल्याला लक्षात येईल. पदमावती माचीवरून होणारे याचे दर्शन तिन्ही ऋतूंत अतिशय अवर्णनीय असते व ते दर्शन याची देही याची डोळा घ्यावयाचे असल्यास राजगड यात्रा करणे गरजेचे आहे.