श्री शिवराजेश्वर - सिंधुदुर्ग किल्ल्यातील महाराजांचे सर्वात पहिले मंदिर

छत्रपती शिवाजी महाराज हे अवघ्या महाराष्ट्राचे दैवत व अशावेळी त्यांची मंदिरे अवघ्या महाराष्ट्रात व भारतातही असणे हे त्यांच्या कीर्तीस शोभेल असेच आहे. मात्र अनेकदा आपल्या सर्वांच्या मनात हा प्रश्न येत असेल कि महाराजांचे सर्वात पहिले मंदिर कुठले? तर या प्रश्नाचे उत्तर म्हणजे सिंधुदुर्ग किल्ल्यातील श्री शिवराजेश्वर मंदिर!

श्री शिवराजेश्वर - सिंधुदुर्ग किल्ल्यातील महाराजांचे सर्वात पहिले मंदिर
श्री शिवराजेश्वर

सिंधुदुर्ग या अरबी समुद्रातील प्रसिद्ध अशा जलदुर्गात अगदी मध्यवर्ती ठिकाणी महाराजांचे हे मंदिर आहे. या मंदिराची उभारणी शिवरायांचे द्वितीय पुत्र राजाराम महाराज यांच्या कारकिर्दीत झाली. मंदिराची लांबी १७ मीटर लांब तर रुंदी ७ मीटर आहे. 

या मंदिरातील महाराजांच्या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे हि मूर्ती बिन दाढीची अशी असून वेशभूषा हि पारंपरिक नावाड्याची आहे. शिवराजेश्वर मंदिरातली महाराजांची ही मूर्ती पन्हाळा येथे तयार केली गेली व तेथून ती सिंधुदुर्गास आणून तिची येथे प्रतिष्ठापना करण्यात आली. कृष्ण पाषाणात घडवलेली हि मूर्ती वीरासन पद्धतीची बैठक असलेली अशी असून दोन्ही पायांचे तळवे एकमेकांकडे केलेले आणि उजवा हात उजव्या मांडीवर तसेच डावा हात डाव्या गुडघ्यावर आहे . मूर्तीच्या गळ्यात कंठा, डाव्या दंडामध्ये तसेच`उजव्या व डाव्या मनगटांत कडे आहेत. मूर्तीच्या पायांत वाळे असून कमरेस मेखला व छातीवर जानवे अथवा यज्ञोपवीत आहे. 

मूर्तीस वेगळ्या पद्धतीचे शिरस्त्राण असून कमरेस तुमान आहे. मूर्तीच्या मागे उजव्या बाजूस सूर्य तर डाव्या बाजूस चंद्राची प्रतिमा कोरली आहे यावरून जोवर चंद्र सूर्याचे अस्तित्व आहे तोपर्यंत महाराजांची कीर्ती दिगंत राहील असे विचार मूर्तीचे निर्माण करणाऱ्याने मांडले आहेत. प्रभावळीत दोनही बाजूस मोरचेल सुद्धा कोरली आहे. 

अनेकांना हा प्रश्न पडू शकेल कि महाराजांची सर्वमान्य प्रतिमा तर दाढी असलेली आहे तर सदर मूर्ती हि दाढीशिवाय कशी असू शकते ? तर याचे उत्तर असे आहे कि या मंदिराचे निर्माण हे छत्रपती राजाराम महाराज यांच्या काळात झाले होते व राजाराम महाराजांचा जन्म हा १६७० साली झाला असल्याने १६८० साली जेव्हा शिवाजी महाराजांचे देहावसान झाले तेव्हा राजाराम महाराजांचे वय फक्त १० वर्षे होते तसेच शिवाजी महाराजांची जी काही मूळ चित्रे आज उपलब्ध आहेत ती राज्याभिषेकापूर्वीची असून राज्याभिषेक झाल्यानंतर काही दिवसांतच राजमाता जिजाऊंचे निधन झाले व अशावेळी क्षौर केल्यामुळे शिवाजी महाराजांचे दाढीशिवाय असलेले रूप लहानग्या राजाराम महाराजांच्या मनात ठासले असावे व ते रूपच या श्री शिवराजेश्वर मंदिरातील मूर्तीच्या रचनेत उतरले असावे. 

शिवाजी महाराजांच्या या मंदिराची व्यवस्था येथील संकपाळ या घराण्याकडे पारंपरिक असून या मूर्तीची रोज पूजा केली जाते. पूजा केल्यावर मूर्तीस मुखवटा चढवला जातो. मूर्तीस दोन मुखवटे असून एक सोन्याचा तर एक चांदीचा आहे. मूर्तीच्या समोर एक शिवकालीन तलवार असून तिच्या म्यानावर एका बाजूला उड्डाण करणारा हनुमान व दुसऱ्या बाजूला गरुड कोरलेला आहे. 

तर असे हे  श्री शिवराजेश्वर मंदिर म्हणजे समस्त महाराष्ट्रीय लोकांचे श्रद्धास्थान असून या मंदिरास भेट देऊन अनेक शिवभक्त महाराजांचे दर्शन घेत असतात. तेव्हा आपणही महाराजांच्या या शिवलंकेस भेट देऊन श्री शिवराजेश्वर महाराजांसमोर नतमस्तक व्हा.