घनगड किल्ला - सह्याद्रीच्या घाटवाटांवर नजर ठेवणारा दुर्ग
समुद्रसपाटीपासून अदमासे ८४० मीटर उंच व सह्याद्रीच्या मुख्य धारेत स्थित घाटवाटांवर नजर ठेवणारा घनगड किल्ला पाहणे हा खऱ्या अर्थी एक समाधान देणारा अनुभव असतो.
पुणे जिल्ह्यातील घनगड हा सह्याद्रीच्या मुख्य धारेतील एक महत्त्वाचा दुर्ग. कोकणातून घाटमाथ्यावर जाणाऱ्या सवाष्णी, नाणदांड आणि नाळेचा या तीन घाटवाटांवर नजर ठेवण्यासाठी या दुर्गाची बांधणी करण्यातआली.
घनगड किल्ला पुण्याहून सव्वादोन ते अडीच तास अंतरावर असून गडावर जाणारी वाट ही एकोले गावातून आहे.
ताम्हणी घाट येथून उजव्या बाजूस लोणावळ्याकडे जाणारा मार्ग आहे. येथून काही अंतर पुढे गेल्यास एकोले हे गाव लागते. एकोले गावात गाडी पार्क करण्याचीव्यवस्था आहे.
किल्ल्याचे पायथ्याशी एक ऐतिहासिक शिवमंदिर असून अनेक वीरगळी याठिकाणी पहावयास मिळतात. थोडे अंतर चालून गेल्यावर दोन देवतांची मंदिरे पहावयास मिळतात.
वाटेवरच गारजाई देवीचे मंदिर असून याठिकाणी काही दिपस्तंभ आपल्या नजरेस पडतात. मंदिराच्या पुढे काही अंतर चढून आल्यावर मारखिंड लागते. मारखिंड येथून गडाचा माथा लक्ष वेधून घेतो.
मार खिंडीजवळ पाषाणाचे एक निसर्गनिर्मित शिल्प दिसते. इथून दिसणारी खोल दरी पाहताना हृदयाचे ठोके चुकतात.
गडाचे मुख्य प्रवेशद्वार गोमुखी बांधणीचे असून आजही सुस्थितीत आहे.
प्रवेशद्वार पार केल्यावर कातळात कोरलेल्या गुहा दिसून येतात. या गुहांचा वापर पूर्वी कैदी ठेवण्यासाठी अथवा वस्तीसाठी करण्यात येत असावा.
गडावर एके ठिकाणी कातळात बांधलेला एक लोखंडी जिना दिसून येतो. हा जिना वर चढून गेल्यावर एका धोकादायक चढणीवर पाण्याचे टाके दिसून येते.
काही अंतरावर एक भलामोठा कड्याचा कातळ खाली तुटून पडलेला दिसून येतो. या भव्य कातळामुळे तयार झालेला बोगदा पार केल्यावर गुहेतील एक मंदिर दिसते व या मंदिरात देवीची मूर्ती आहे.
किल्ल्यास घनगड हे नाव त्याच्या घनाकृती आकारामुळे मिळाले असावे मात्र पावसाळ्यात हा किल्ला घनांच्या छायेत दडलेला पाहून हा किल्ला त्याचे घनगड हे नाव दुसऱ्या अर्थाने सार्थ करतो.
गडाच्या माथ्यावर जाणारी वाट थोडी अवघड असून सुरक्षिततेसाठी कड्यात दोरखंड लावण्यात आले आहेत व या दोरखंडांचा आधार घेऊन आपण वर चढू शकतो.
या मार्गात आपल्याला खांब टाक्यांचा एक मोठा समूह पाहावयास मिळतो.
गडाच्या माथ्यावर प्रवेश करण्यापूर्वी आणखीन एक छोटा दरवाजापार करावा लागतो.
माथ्यावर पोहोचल्यावर टेहळणी बुरूज दृष्टीस पडतो. पूर्वी या टेहळणी बुरुजावरून दूरवरील प्रदेशावर लक्ष ठेवणे शक्य होत असे.
माथ्यावर एक ध्वजस्तंभ असून त्यावर स्वराज्याचा जरीपटका डौलाने फडकताना दिसतो.
माथ्यावर पाण्याची आणखी काही टाकी पाहावयास मिळतात.
घनगडावरील इमारतींचे अवशेष भग्न झाले असले तरी हा अवशेष पाहून गडावरील पूर्वीच्या शिबंदी व्यवस्थेचा अंदाज येतो.
गडाच्या बालेकिल्ल्यावर एक बुरुज असून त्यातील छिद्रांमध्ये शत्रूंवर आग आग ओकणाऱ्या तोफा ठेवल्या जात.
घनगडाच्या बालेकिल्ल्यावर विहिरीसारखी रचना असणारी एक गुप्त वाट दिसून येते. विहिरीसारखी रचना आणि आत पाणी असल्याने कुणालाही या ठिकाणी गुप्त दरवाजा असावा याची कल्पना येऊ शकत नाही मात्र घनगडाच्या शेजारी असलेल्या सुधागड किल्यावर सुद्धा याच प्रकारची एक रचना पाहावयास मिळते.
समुद्रसपाटीपासून अदमासे ८४० मीटर उंच व सह्याद्रीच्या मुख्य धारेत स्थित घाटवाटांवर नजर ठेवणारा घनगड किल्ला पाहणे हा खऱ्या अर्थी एक समाधान देणारा अनुभव असतो.