कडुनिंबाच्या झाडाचे महत्व व फायदे

कडुनिंबाच्या वृक्षाचे मूळ नाव आहे निंब मात्र या वृक्षाच्या पानांचा रस हा कडू असल्याने यास कडुनिंब या नावाने सुद्धा ओळखले जाते.

कडुनिंबाच्या झाडाचे महत्व व फायदे

आपल्या थंड छायेसाठी व औषधी गुणधर्मांसाठी ओळखला जाणारा कडुनिंब हा वृक्ष भारतात सर्वत्र आढळतो. कडुनिंबाच्या वृक्षाचे मूळ नाव आहे निंब मात्र या वृक्षाच्या पानांचा रस हा कडू असल्याने यास कडुनिंब या नावाने सुद्धा ओळखले जाते.

निंबाचा पाला कडू असला तरी अत्यंत औषधी असून अगदी कडुनिंबाच्या झाडाची छाया सुद्धा रोगनाशक असते अशी महती या वृक्षाची आहे.

प्राचीन काळापासून कडुनिबांच्या औषधी गुणधर्मांविषयी सांगितले गेले असल्याने वर्ष प्रतिपदेच्या दिवशी कडुनिंबाच्या कोवळ्या पानांचे व फुलांचे मिरी, हिंग, सैंधव, जिरे, ओवा, चिंच, आणि गूळ यांच्यासोबत मिश्रित करून सेवन केले जाते ज्यामुळे सर्व रोगांचा परिहार होतो असे मानले जाते. कडुनिंबाचे झाड शेताच्या बांधावर लावण्याचे सुद्धा अनेक फायदे असतात.

पूर्वी कडुनिंबाच्या लाकडाचा वापर बांधकामासाठी सुद्धा करण्यात येत असे व कडुनिंबाच्या लाकडाच्या कडू गुणधर्मामुळे त्यास कीड सुद्धा लागत नसे.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी कडुनिंबाच्या पाल्याचा रस पिण्याची परंपरा आहे व कडुनिंबाचा पाला पाण्यात घालून ते पाणी उकळून त्याने आंघोळ केल्यास अनेक त्वचारोग नाहीसे होतात असेही म्हटले जाते.

कडुनिंबाच्या झाडाची साल सुद्धा उपयुक्त असून कडुनिंबाच्या कांडीचा वापर पूर्वी दात साफ करण्यासाठी आजही केला जातो.

प्रसूतीनंतर मातेस पहिले तीन दिवस जेवणाच्या आधी कडुनिबांच्या पाल्याचा रस दिल्यास बाळंतपणानंतर आलेला थकवा लवकर दूर होतो. व्यायलेल्या गाईंना कडुनिंबाचा पाला खायला दिल्यास त्यांना दूध जास्त येऊन गाई निरोगी व सशक्त होतात.

कडुनिंबाच्या पाल्याचा रस लहान मुलांना सुद्धा त्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी पाजला जातो. कडुनिंबाच्या या गुणधर्मामुळे यास बाळनिंब अथवा बाळंतनिंब या नावानेसुद्धा ओळखले जाते.

भारतातल्या जैववैविधतेतील कडुनिंब हा अत्यंत महत्वाचा वृक्ष असून शुद्ध प्राणवायू, थंड हवा आणि आरोग्यवर्धक पाने असे अनेक गुणधर्म त्यामध्ये असल्याने त्याची लागवड करणे हे निसर्गाचा समतोल कायम राखण्यासाठी अतिशय आवश्यक आहे.