दालचिनीची माहिती व फायदे

पूर्वी श्रीलंका बेटावर डचांचे राज्य असताना त्यांनी या पदार्थास असलेल्या प्रचंड मागणीमुळे श्रीलंकेतील दालचिनी उत्पादन पूर्णपणे स्वतःच्या नियंत्रणात ठेवले होते व इतर कुणासही ते दालचिनीचे उत्पादन करण्यास देत नसत.

दालचिनीची माहिती व फायदे
दालचिनी

भारतातील मसाल्यात वापरला जाणारा प्रसिद्ध पदार्थ म्हणजे दालचिनी. दालचिनीस इंग्लिशमध्ये सिनॅमन (Cinnamon) या नावाने ओळखले जात असून हे नाव ग्रीक भाषेतील सिन्नामोमोन या शब्दापासून निर्माण झाले आहे.

मसाल्यामुळे अन्नास चव, सुगंध व रंग प्राप्त होतो याशिवाय मसाला हा त्याच्या औषधी गुणधर्मांसाठीही ओळखला जातो. मसाल्याचे अनेक पदार्थ असले तरी हे पदार्थ जगातील विविध देशांमध्येच निर्माण होतात कारण त्या देशांतील मातीचा व हवामानाचा गुणधर्म हा त्या पदार्थांच्या निर्मितीसाठी महत्वाचा घटक असतो.

दालचिनी हा मुळात भारताच्या दक्षिणेस असलेल्या श्रीलंका उर्फ सिंहलद्वीप या देशात उत्पन्न होणारी वनस्पती. गेल्या काही वर्षांत दालचिनीचे उत्पादन भारतातील तामिळनाडू व केरळ या प्रांतात होत असले तरी एकेकाळी हा पदार्थ श्रीलंकेव्यतिरिक्त कुठेच मिळत नसे. श्रीलंकेत दालचिनीच्या झाडांची विस्तीर्ण जंगले असून दालचिनीचे मळेही तेथे विपुल प्रमाणात आहेत.

पूर्वी श्रीलंका बेटावर डचांचे राज्य असताना त्यांनी या पदार्थास असलेल्या प्रचंड मागणीमुळे श्रीलंकेतील दालचिनी उत्पादन पूर्णपणे स्वतःच्या नियंत्रणात ठेवले होते व इतर कुणासही ते दालचिनीचे उत्पादन करण्यास देत नसत. श्रीलंकेतील दालचिनीची जंगले आणि मळे स्वतःच्या ताब्यात ठेवून तिचे भरघोस पीक घेऊन स्वतःच तिचे दर ठरवून ते इतर देशांना विकत कारण त्याकाळी श्रीलंकेशिवाय हे उत्पादन दुसरे कुठेही होत नसे. 

श्रीलंकेच्या मातीशी व हवामानाशी समरूप अशा इतर देशातील भूमीवर जर हे दालचिनीच्या उत्पादनाचा प्रयोग केला तर आपल्या हाती असलेला दालचिनीचा व्यापार दुसऱ्या देशाकडेही जाईल या धास्तीने त्यांनी दालचिनीचे रोपही श्रीलंकेच्या बाहेर जाऊ नये असा बंदोबस्त केला होता व सामान्य शेतकऱ्यांस दालचिनीचे उत्पादन घेण्यास पूर्ण बंदी केली होती आणि जर कुणी दालचिनीचे साधे रोपही शेतात लावले तर त्यास मोठा दंड केला जात असे. 

श्रीलंकेत दालचिनीचे उत्पादन व व्यापार करून डचांनी प्रचंड पैसा कमावला मात्र कालांतराने हे बेट ब्रिटिशांच्या ताब्यात गेले व त्यांनी दालचिनीच्या उत्पादनावरील डचांनी लावलेले निर्बंध कमी करून या पिकाचे उत्पादन सामान्य शेतकऱ्यांनाही घेण्यास परवानगी दिली. दालचिनीस जगभरात असलेल्या मागणीमुळे श्रीलंकेत जागोजागी दालचिनीची झाडेच दिसू लागली व एक वेळ अशी आली की दालचिनीच्या झाडांच्या विपुलतेमुळे श्रीलंकेतील लोक जळणासाठी सुद्धा दालचिनीचीच लाकडे वापरू लागले.

दालचिनीचे झाड पूर्ण तयार होण्यास तीन वर्षे लागतात व त्यानंतर झाडाचे साल काढून उन्हात वळवण्यात येते व हे वाळवलेले साल म्हणजेच दालचिनी. दालचिनीच्या झाडांच्या मुळाचे व फळाचे तेलही तयार केले जाते. दालचिनीचे तेल थंड केल्यास ते मेणासारखे घट्ट होते म्हणून पूर्वी या तेलापासून मेणबत्त्याही तयार केल्या जात असत.

दालचिनी ही मसाल्यातील घटकासोबतच तिच्या औषधी गुणधर्माकरिताही प्रसिद्ध असून वात अथवा पित्ताचा त्रास असल्यास दालचिनीचा काढा गुणकारी ठरतो. याशिवाय वाताच्या विकारात दालचिनीचा अर्क शरीरास लावल्यास फायदा होतो.