इंद्रप्रस्थ ते दिल्ली - नामांतराचा इतिहास

प्राचीन काळात दिल्ली शहराचा विस्तार तब्बल ४५ मैल होता. इंद्रप्रस्थाच्याच परिघात पूर्वी कुरुवंशाची राजधानी हस्तिनापूर होती.

इंद्रप्रस्थ ते दिल्ली - नामांतराचा इतिहास

Marathi Buzz Shop

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

Marathi Buzz Shop

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

भारत देशाची राजधानी म्हणून ज्या शहरास ओळखले जाते ते शहर म्हणजे दिल्ली शहर. भारतवर्षात प्राचीन वारसा असणारी असंख्य शहरे असतानाही देशाची राजधानी म्हणून दिल्लीचीच निवड का करण्यात आली याचे उत्तर या शहराच्याच इतिहासात आहे.

खरं तर दिल्ली हे नाव या शहरास फार उशिरा मिळाले. या शहराचे मूळ नाव इंद्रप्रस्थ. इंद्र म्हणजे देवांचा राजा. प्राचीन काळात राजासही इंद्र म्हटले जाई. त्यामुळे साक्षात इंद्राचे अथवा राजाचे प्रस्थ ज्या ठिकाणी होते ते शहर अर्थातच प्राचीन काळापासून प्रख्यात असले पाहिजे. 

प्राचीन काळात दिल्ली शहराचा विस्तार तब्बल ४५ मैल होता. इंद्रप्रस्थाच्याच परिघात पूर्वी कुरुवंशाची राजधानी हस्तिनापूर होती. मोगलांनी दिल्लीवर ताबा मिळवल्यावर या ठिकाणी शाहजहानाबाद हे शहर वसवण्यात आले आणि हेच शहर सध्या नवी दिल्ली या नावाने ओळखले जाते. जुन्या दिल्लीतील पुराना किल्ला हे ठिकाण इंद्रप्रस्थाचे मुख्य ठिकाण होते.

प्राचीन काळात जर या शहरास इंद्रप्रस्थ या नावाने ओळखले जात असे तर या शहराचे नाव दिल्ली हे केव्हा व कसे झाले असा प्रश्न अनेकांना पडतो. इंद्रप्रस्थच्या दिल्ली म्हणून नामांतराची जी कथा फार पूर्वीपासून प्रसिद्ध आहे ती या लेखाच्या निमित्ताने जाणून घेऊ.

इसवी सन १०५१ मध्ये इंद्रप्रस्थ शहरावर तुवर वंशातील अनंगपाळ या राजाचे शासन होते. अनंगपाल म्हणजे दिल्लीचा शेवटचा हिंदू सम्राट पृथ्वीराज चौहान याचे आजोबा. अनंगपालास पुत्र नसल्याने त्याने आपल्या मुलीच्या मुलास म्हणजे पृथ्वीराजास दत्तक घेऊन या शहराचा अधिभार सोपवला होता. मात्र त्यापूर्वी जेव्हा अनंगपालाने इंद्रप्रस्थ शहरास आपल्या राजधानीचे ठिकाण करून ते नव्याने वसवणे सुरु केले त्यावेळी त्याने एका ज्योतिषाकडून मुहूर्त काढून राजवाड्याच्या पायाचे दगड रोवले होते.

दगड रोवण्याचे काम झाल्यावर अनंगपालाने ज्योतिषास प्रश्न विचारला की हे पाषाण किती खोल गेले आहेत? यावेळी ज्योतिषाने उत्तर दिले की हे दगड एवढे खोल गेले आहेत की यांच्या खाली थेट शेषनागाचे मस्तक आहे. आता हे पाषाण येथे कायम झाले असून तुवर (तोमर) वंशाची राजधानी ही कधीही नष्ट होणार नाही.

ज्योतिषाचे हे उत्तर ऐकून अनंगपालास आश्चर्य वाटले आणि त्याने प्रतिप्रश्न केला की नक्की कशावरून हे पाषाण शेषनागाच्या मस्तकापर्यंत गेले आहेत? या दगडांखाली शेषनागाचे मस्तक आले आहे यास पुरावा काय? यावर ज्योतिषी म्हणाला की तुम्हाला विश्वास नसेल तर एखादा दगड काढून पहा. दगडासहित जर रक्त वर आले तर मी जे म्हणतो ते खरे आणि जर रक्त नाही आले तर खोटे असे समजा.

हे ऐकून अनंगपालाने तेथील एक पाषाण भूमीतून बाहेर काढावला आणि पाषाणासोबत खरोखर रक्त बाहेर आले. मात्र या सर्व घटनेत मुहूर्ताची वेळ मात्र चुकली आणि ज्योतिषी राजास म्हणाला की आता मुहूर्त बिघडला आहे तेव्हा हे शहर वसवण्यास हा योग्य काळ नाही. मात्र अनंगपालाने हट्टाने त्याच मुहूर्तावर शहर बसवण्यास सुरुवात केली. 

हे करताना राजाने मुहूर्ताची वेळ 'ढिली' केल्याने या शहरास 'दिल्ली' हे नवे नाव मिळाले अशी कथा ऐतिहासिक साधनांत आढळते. आजही दिल्लीच्या नावासंदर्भाने तेथील लोकांच्या तोंडी एक दोहरा आहे व तो म्हणजे

"खिली तो दिल्ली भई, तोमर भया मतहीन"

दिल्लीवर मोगलांचे राज्य येण्यापूर्वी प्राचीन काळी दिल्लीची स्थापना ही युधिष्ठिर राजाने केली व यानंतर असंख्य हिंदू राजांनी या शहरावर राज्य केले आणि दिल्लीचा शेवटचा हिंदू सम्राट म्हणून पृथ्वीराज चौहान प्रसिद्ध आहे.

दिल्लीवरील हिंदू शासन संपल्यावर दिल्लीवर घोरी, खिलजी, तुघलख, सय्यद, लोदी आणि मोगल अशा मुस्लिम सत्तांचे शासन निर्माण झाले. मोगलांच्या शेवटच्या काळात मराठ्यांनी दिल्लीचे तख्त सांभाळले होते. यानंतर दिल्लीची सूत्रे ब्रिटिशांकडे गेली व ब्रिटिशांकडून १९४७ साली दिल्ली ही स्वतंत्र भारताची पहिली राजधानी म्हणून निवडली गेली ती ओळख आजही कायम आहे.