श्री दत्त देवस्थान - चौल

चौल नगरीच्या पूर्वेकडील डोंगराळ प्रदेशात एक स्वयंभू दत्तस्थान आहे. चौल परिसरात जी छोटी गावे येतात त्यापैकी एक म्हणजे भोवाळे हे गाव. या गावात एक भलेमोठे तळे आहे ज्यास भोवाळे याच नावाने ओळखले जाते.

श्री दत्त देवस्थान - चौल
श्री दत्त देवस्थान - चौल

कोकणातील चौल हे शहर म्हणजे प्राचीन काळापासून संपन्नतेच्या शिखरावर असलेले एक बागायती नगर. साक्षात शिवाने येथे स्थापन केलेले लिंग आहे ज्यास रामेश्वर या नावाने ओळखले जाते. पूर्वी या नगराच्या चारही बाजूस चाफ्याच्या अर्थात चंपावतीच्या फुलांची झाडे होती यामुळे शहरास चंपावती असे म्हटले जायचे. चंपावतीचे पुढे चैमूल्य झाले आणि चैमूल्यचे रूपांतर चौलमध्ये झाले.

याच चौल नगरीच्या पूर्वेकडील डोंगराळ प्रदेशात एक स्वयंभू दत्तस्थान आहे. चौल परिसरात जी छोटी गावे येतात त्यापैकी एक म्हणजे भोवाळे हे गाव. या गावात एक भलेमोठे तळे आहे ज्यास भोवाळे याच नावाने ओळखले जाते. गावाचे मुख्य दैवत म्हणजे भोलंबिका अथवा भोवाई देवी. 

याच भोवाळे गावाच्या पूर्व दिशेस असलेल्या टेकडीच्या माथ्यावर हे स्वयंभू दत्तस्थान आहे. टेकडीची उंची समुद्रसपाटीपासून अदमासे १७० मीटर आहे. गावातून टेकडीच्या प्रवास करताना रामाचे व जाखमातेचे मंदिर दृष्टीस पडते. टेकडीच्या पायथ्याशी आल्यावर दत्तमंदिराचा फलक व त्यामागून टेकडीवर गेलेल्या वळणा वळणाच्या पायऱ्या दिसून येतात. 

या पायऱ्यांची संख्या अंदाजे ७०० इतकी असावी. अर्ध्या पायऱ्या चालून गेल्यावर स्वामी समार्थांचा मठ दृष्टीस पडतो. येथून देवघर या गावाकडे जाण्यासाठी एक मार्ग गेला आहे. पुढे काही अंतरावर बुरांडी बाबांचा मठ, सत चित आनंद साधना कुटी आहेत. शेवटच्या टप्यात दोन मठ आहेत. एक हरिराम बाबा यांनी बांधलेला मठ तर दुसऱ्या बाजूस आणखी एक मठ आहे.

हे मठ ओलांडून पुढे गेल्यावर सर्वोच माथ्यावर दत्तात्रेयांचे स्वयंभू स्थान दृष्टीस पडते. मंदिरात दत्तप्रभूंची तीनमुखी मूर्ती आहे. मूर्तीच्या खाली एक शिलालेख पाहावयास मिळतो. याच ठिकाणी दत्त पादुकांही आहेत. या स्थानावरून दिसणारा चोहोबाजूचा आसमंत अप्रतिम असतो. पश्चिमेस नारळी पोफळीच्या बागांत हरवलेली चौल व रेवदंडा ही शहरे. कोर्लईचा किल्ला, अलिबाग व मुरुड तालुक्यांना जोडणारा साळाव पूल असे अनेक नजारे येथून दृष्टीस पडतात.

दत्त टेकडीचा हा परिसर पूर्वी ध्यानधारणेसाठी प्रसिद्ध होता. अनेक योगी पुरुष व स्त्रिया या परिसरात तपश्चर्या करण्यास येत असत. मुख्यतः नाथपंथीय योग्यांचे हे स्थान अतिशय प्रिय असे स्थान आहे कारण चौलचा उल्लेख नाथपंथीय साधनांमध्ये सापडतो. 

टेकडीच्या आसमंतात अनेक गूढ जागा व मंदिरे आहेत. आजूबाजूच्या पायवाटा पकडल्यास डोंगरात खोदलेल्या काही गुहा सुद्धा दृष्टीस पडतात. मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेस दत्तजयंतीच्या मुहूर्तावर येथे खूप मोठी यात्रा असते जी एकूण पाच दिवसांची असते. अनेक भाविक लांबून लांबून येथे दर्शनास येत असतात. 

अतिशय गूढरम्य असे हे दत्तस्थान एकदा तरी आवर्जून पाहावेच. टेकडीवर या दत्त मंदिराचे दर्शन घेणे म्हणजे चौल परिसराची परिक्रमाचं पूर्ण झाल्यासारखे आहे.