कड्यावरचा गणपती - आंजर्ले

कोकणातल्या दापोली तालुक्यातील आंजर्ले हे गाव म्हणजे विस्तीर्ण अशा समुद्रकिनाऱ्याबरोबरच निसर्गाची झालर पांघरलेले गावं.

कड्यावरचा गणपती - आंजर्ले

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

या गावाच्या निसर्गरम्यतेचा आस्वाद घेण्यासाठी दर आठवड्यास पर्यटक येत असतात. राहण्या खाण्याच्या उत्तम सोयीबरोबरच आसमंतात विखुरलेली असंख्य पर्यटनस्थळे पाहताना सुट्टी कशी संपते समजूनच येत नाही.

याच आंजर्ले परिसरातील एक धार्मिक पर्यटनस्थळ म्हणजे कड्यावरचा गणपती. मुंबई गोवा महामार्गावरील मुर्डी येथून आंजर्ले येथे जाण्यास जो फाटा फुटतो त्या रस्त्यावरच हे मंदिर असून मुर्डी-आंजर्ले रस्त्यावर उजव्या बाजूस या मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता आहे. या मंदिरास कड्यावरचा गणपती म्हणायचे कारण म्हणजे गणपतीचे स्थान एका छोट्याशा डोंगरावरील कड्यावर असून खाली उतरण्यास पायऱ्या आहेत. असे म्हणतात की हे मंदिर पूर्वी गावातील समुद्र किनाऱ्यावर होते मात्र समुद्राची पातळी वाढून मंदिर जलाधीन झाले यानंतर समुद्रापासून थोडे दूर एका टेकडीवर नवीन मंदिराची स्थापना करण्यात आली यावेळी साक्षात श्रीगणेश या मंदिरात स्थानापन्न होण्यासाठी जेव्हा आले तेव्हा त्यांचे पहिले पाऊल डोंगराच्या माथ्यावर पडले ज्यास 'गणपतीचे पाऊल' असे म्हंटले जाते आणि दुसरे पाऊल थेट नव्याने स्थापन केलेल्या मंदिरात पडले. 

असे म्हणतात की वर्षातून जेव्हा पूर्ण ओहोटी असते तेव्हा जुन्या मंदिराचे अवशेष दिसून येतात मात्र हा क्षण वर्षातून दोन वेळच येतो. पूर्वी मंदिराचे तत्कालीन व्यवस्थापक रामकृष्णभट नित्सुरे यांना स्वप्नात दृष्टांत झाला की माझे मंदिर अतिशय जीर्ण झाल्याने त्याच जागी दुसरे मंदिर त्वरित बांध. यानंतर रामकृष्णभट नित्सुरे यांनी पुण्यास जाऊन सादर दृष्टांत मूळचे आंजर्लेकर मात्र त्यावेळी पुण्यात पेशव्यांकडे सावकार असलेले दादाजी घाणेकर आणि रघुनाथ धारवाड यांच्या कानावर घातला. यानंतर दोघेही मंदिर निर्माणात योगदान देण्यास त्वरित तयार होऊन त्यांच्या आर्थिक सहकार्याने रामकृष्णभट यांनी जांभ्या दगडात सध्याचे मंदिर बांधले. पूर्वी हे मंदिर कौलारू होते नव्याने बांधलेले मंदिर हे कलशयुक्त होते.  मंदिराच्या बांधकामास सुमारे १२ वर्षे लागली व सन १७८० साली मंदिराचे बांधकाम पूर्णत्वास गेले. 

पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिराची लांबी ५५ फूट, रुंदी ३९ फूट व उंची ६० फूट आहे. सभागृहास  कमानी असून पहिला घुमट ३५ फूट उंच आहे. मंदिराच्या उत्तर दिशेस वर जाण्याकरिता जिना आहे. मंदिराचा ९० च्या दशकात दुसऱ्यांदा जीर्णोद्धार करण्यात आला जो १९९६ साली पूर्णत्वास आला. जीर्णोद्धाराच्या वेळी मंदिराचे तेव्हाचे विश्वस्त कै.गणेश नित्सुरे, कै.रंगनाथ नित्सुरे, कै.मुकुंद नित्सुरे व कै.मधुअण्णा नित्सुरे यांनी समस्त ग्रामस्थांच्या व भक्तांच्या सहकार्यातून मंदिराच्या जीर्णोद्धाराचे कार्य संपन्न केले. 

कड्यावरचा गणपती या देवस्थानाचे विश्वस्तपदी सलग आठ पिढ्या नित्सुरे घराण्याकडे होते. १९९६ साली मंदिराच्या जीर्णोद्धाराचे कार्य पूर्ण झाल्यावर सर्वांच्या संमतीने देवस्थानाचा कार्यभार ग्रामस्थ विश्वस्त मंडळाकडे सोपवण्यात आला. यानंतर ग्रामस्थ विश्वस्त मंडळाकडून २००२ साली दर्शनास दूरहून येणाऱ्या भक्तांसाठी भक्तिधाम ही वास्तू बांधण्यात आली याशिवाय बाजूस असणाऱ्या हरिहरेश्वर शिवमंदिराच्या जीर्णोद्धारही करण्यात आला. 

माघ शुद्ध प्रतिपदेपासून माघ शुद्ध पंचमी पर्यंत म्हणजे एकूण पाच दिवस गणरायाचा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. यावेळी पंचक्रोशीतून व दूरदूरहून भक्त व ग्रामस्थ मंडळी श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतात व उत्साहाने उत्सवात सहभाग घेतात. मंदिरातील गणेशमूर्ती अतिशय रेखीव असून तिचे वाहन मूषक आहे. गणेशाची सोंड सरळ असून सोंडेमध्ये मोदक आहे. गणेशाने यज्ञोपवीत धारण केले असून उदरास नागपाश आहे. दोन्ही बाजूला रिद्धी सिद्धी असून गणेशाची मूर्ती चतुर्भुज अशी आहे. मूर्तीचे रंगकाम हे पेणच्या हजारे कुटुंबीयांकडे असून दर वर्षी ते करण्यात येते. कड्यावर असलेल्या गणपतीचे पाऊल येथेही छोटेखानी मंदिर असून प्रथम पाऊलचे दर्शन घेणून मग गणेशाचे दर्शन घेण्याची प्रथा आहे.