अवचितगड किल्ला
नागोठणे शहराच्या दक्षिणेस सहा किलोमीटरवर मोटार रस्त्याने व सरळ रेषेत पायवाटेने अनुक्रमे सहा किलोमीटर व चार किलोमीटर अंतरावर असलेला अवचितगड, रोहे व नागोठण्यामधील डोंगरांच्या टेकडीवर मेढा या गावानजिक आहे.
नागोठणे शहराच्या दक्षिणेस सहा किलोमीटरवर मोटार रस्त्याने व सरळ रेषेत पायवाटेने अनुक्रमे सहा किलोमीटर व चार किलोमीटर अंतरावर असलेला हा अवचितगड, रोहे व नागोठण्यामधील डोंगरांच्या टेकडीवर मेढा या गावानजिक आहे.
याच गावावरून या किल्ल्यावर जाण्यास वाट आहे. हा गड शिलाहारांनी बांधला असावा असे इतिहास तज्ज्ञांचे मत आहे. कारण अहमदनगरच्या निजामशाहीत बाह्य अंगावरून हा किल्ला मोगलांनी बांधला असावा असे मत नेर्न या लेखकाने व्यक्त केले आहे आणि याच ग्रंथांमध्ये शिवाजीराजांनी या गडाचे बांधकाम शेख महंमद नामक वास्तुविशारदाच्या मदतीने केले असा उल्लेख आहे, कारण मुरुड-जंजिऱ्याच्या सिद्दीवर लक्ष ठेवण्यासाठी शिवाजी महाराजांनी हा अवचितगड बांधला असा दावा इतिहासकारांमध्ये केला जातो.
१६४८ साली शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेतला व १८८१ मध्ये कर्नल प्रार्थरने सरसगड व भोरपगडासह हा किल्ला काबीज केला. बुरुज व इतर कामाबरोबर महाराजांनी या किल्ल्यावर श्रीशिवमंदिर बांधले, किल्ल्यात प्रवेश करताना प्रवेशद्वाराजवळ दोन बुरूज आहेत. एका बुरूजाची पडझड झाली आहे. गडाला तटबंदी असून त्याची लांबी ५४९ मीटर आहे. ती अनेक ठिकाणी ढासळलेली आहे. काही ठिकाणी कडे फुटल्याने वरचा भाग निमुळता व निसरडा झाला आहे.
किल्ल्यावर उत्तरेकड़न दक्षिणेकडे येताना सरदारांच्या इमारतीच्या जोत्यांचे अवशेष हात येतात. याच किल्ल्यात १२ कोनी तलावात भरपूर पाणी आहे, तलावाच्या पश्चिमेस एक टाकी असून त्यातही भरपूर पाणी आहे. मेढ्यांचे एक वयोवृद्ध प्रतिष्ठित नागरिक आबा जोशी यांनी या किल्ल्यावरचे पाणी संपूर्ण मेढे गावाला भर उन्हाळ्यातही पुरेल असे यापूर्वीच सांगितले होते. काही वर्षापूर्वी तशी योजना या गावासाठी तयार झाली परंतु पुढे ती का बंद पडली हे काही समजले नाही.
याच पाण्याच्या टाक्यांजवळ गडाचा हवालदार बाजी पासलकराच्या स्मरणार्थ एक प्रतिमा कोरलेली आहे व तिच्या जवळच एक दीपमाळ आहे. पाण्याच्या टाक्यांच्या वरच्या बाजूला श्रीमहादेवाच्या लहानशा देवळात गणपती, पार्वती आणि विष्णूंच्या मूर्ती आहेत. महादेवाच्या पिंडीसमोर चांगल्या अवस्थेत असलेला नंदीही आहे.
जवळच दारू कोठाराची इमारत असून दक्षिणेच्या भिंतीत
"श्री गणेशाय नमः श्री जयदेव शके १७१८ नलनाम संवत्सरे चैत्र शुद्ध प्रतिपदा."
असा देवनागरी लिपीतील शिलालेख आहेत. किल्ल्याच्या पायथ्याजवळच असलेल्या मेढे गावात श्रीवाकेश्वर महाराजांचे एक ऐतिहासिक मंदिर असून जवळच्या बाजूचे तळे व परिसर अजूनही इतिहासाची साथ देत आहेत. समोरच वरोठे-पाले या गावातील श्रीमहादेवीचे देवस्थानही ऐतिहासिक काळाशी निगडीत आहे. जवळच भिसे खिंडीत नागेश्वर निडी पडम येथे कोसबाईचे ऐतिहासिक मंदिर आहे.