कालिका पुराण - मराठी भाषेची प्राचिनता सिद्ध करणारा ग्रंथ

मराठी भाषेची उत्पत्ती प्राचीन आहे. हाल सातवाहनाने इसवी सनाच्या पहिल्या शतकात संपादीत केलेला गाथा सप्तशती, इसवी सनाच्या ९व्या शतकातला श्रावणबेळगोळ शिलालेख, नाणेघाटातील नागनिकेचा लेख, इ.स.१०१२ मधिल अक्षीचा शिलालेख, इ.स. १३ व्या शतकातील ज्ञानेश्वरी, लिळाचरित्र व विवेकसिंधू हे अत्युच्च दर्जाचे मराठी ग्रंथ मराठीच्या अभिजातपणाला बळकटी देतात.

कालिका पुराण - मराठी भाषेची प्राचिनता सिद्ध करणारा ग्रंथ
कालिका पुराण

मराठी भाषा अभिजात असल्याचे साहित्य अकादमीने मान्य करुनही केंद्र सरकारने अजुनही मराठी भाषेस अभिजात दर्जा दिलेला नाही मात्र मराठीत प्राचीन व मध्ययुगीन काळात निर्माण झालेले उच्च दर्जाचे साहित्य लवकरच हा दर्जा मराठीस प्राप्त करुन देईल यात शंका नाही.

मराठी भाषेच्या समृद्धीमध्ये भर घालणारा एक दुर्मिळ ग्रंथ म्हणजे कालिकापुराण. कालिकापुराण ग्रंथाचा कर्ता शारंगधर हा असून या ग्रंथात एकूण ३१ अध्याय व १७३४ ओव्या आहेत. सदर ग्रंथात सोमवंशाचे वर्णन करुन कालिका माहात्म्य वर्णन केले आहे. कासार समाजाची उत्पत्ती देणारा हा ग्रंथ अमुद्रीत स्वरुपात होता मात्र सन १८९३ साली पुण्यातील जगद्धितेच्छु छापखान्याने याच्या काही मुद्रीत प्रती काढल्या मात्र कालांतराने या प्रतीही दुर्मिळ झाल्या.

परभणीचे एक अभ्यासू शिक्षक आळंदकर यांना कालिकापुराणाची एक दुर्मिळ प्रत मिळाली व त्यांनी मला संपर्क करुन यावर अभ्यास करण्याची विनंती केली. त्यानुसार त्यांनी पुण्यात येऊन सदर ग्रंथाची छायांकित प्रत माझ्याकडे दिली. ग्रंथाचा कर्ता सारंगधर स्वतःचा परिचय फक्त 'महामायेचा कुमरु' असा करतो व याव्यतिरिक्त तो स्वतःविषयी काहीही लिहीत नाही.

ग्रंथाच्या सुरुवातीला तो हा ग्रंथ संस्कृत पद्मपुराणातल्या उत्तरखंडातील कालिकामाहात्म्यावरुन लिहील्याचे सांगतो व या ग्रंथाचे मराठी लेखन करण्यामागचा उद्देश पुढीलप्रमाणे स्पष्ट करतो 

'यासंस्कृताच्याआगरी || ग्रंथी मर्‍हाठीअर्थुभरी || कथा प्रगटकरी || दावीश्रोतयाते|| हेसंस्कृताचीपेटी || उघडुनियाप्राकृतींकरीदृष्टी || कथाबोलेनमर्‍हाटी || हरिकिर्तीची||'

या ग्रंथाच्या चौदाव्या अध्यायात तो विठ्ठलाची स्तुती करताना म्हणतो की 

'पाहेपुंडलिकुभक्तपुर्णगाभा || अठ्ठाविसयुगेतुंतेथेउभा || कावृंदावनीपद्मनाभा || संततअससी ||'

ग्रंथाची भाषा यादवकालीन असल्याचे लिखाणावरुन समजते मात्र या ग्रंथाचा काळ सारंगधराने लिहीला नसल्याने नेमक्या कुठल्या काळात सदर ग्रंथ निर्मिला गेला हे कळणे कठीण होऊन बसते अशावेळी स्वतः सारंगधरच या कोड्याचे उत्तर त्याने दिलेल्या देवगिरीच्या यादव राजांच्या वंशावळीतून देतो. देवगिरीच्या यादव राजांच्या सात ते आठ वंशावळी प्रसिद्ध आहेत मात्र यापैकी एकही वंशावळ एकमेकांशी मेळ खात नाहीत. सारंगधराने कालिकापुराणात दिलेली वंशावळ वैशिष्ट्यपुर्ण असून सदर वंशावळ देवगिरीच्या यादवांच्या व पर्यायाने महाराष्ट्राच्या इतिहासात मोलाची भर घालेल.

वंशावळ पुढीलप्रमाणे आहे, 

गळेसीपुत्रकोथळी || कोथळीसी नुरु (नृसिंह) || नुरुचा भोगु || भोगूचा आध्या || आध्याचा कोथळी || कोथळीचा दंडप्रहरी (दृढप्रहर) || दंडप्रहरीचा शिंगणू (सिंघण) || शिंगणाचा भिलमु (भिल्लम) || भीलमाचा अमरगंगी (अमरगंगेय) || अमरगंगीचा जैत्रपाळ (जैतुगी) || जैतपाळाचा कान्हादंडदेव (कान्हा उर्फ कृष्ण).

सदर वंशावळीतील नृसिंह, दृढप्रहर, सिंघण, भिल्लम, अमरगंगेय, जैतुगी, कान्हा ही नावे देवगिरीच्या प्रसिद्ध यादव राजांची असून ही वंशावळ कान्हा उर्फ कृष्ण या राजापर्यंत आहे. कान्हानंतर त्याचा लहान भाऊ महादेव हा सुद्धा पराक्रमी निघाला मात्र पुढे महादेव वारल्यानंतर महादेवाचा पुत्र अम्मण गादीवर बसला असता त्याला कान्हाचा पुत्र रामदेव याने पदच्युत केले व स्वतः गादीवर बसला.

रामदेव हा यादव साम्राज्याचा अखेरचा सम्राट. रामदेव राजाच्या काळात ज्ञानेश्वरी या ग्रंथाची निर्मिती झाली. शारंगधराने दिलेल्या वंशावळीचा विचार करावयाचा तर सदर वंशावळ कृष्ण उर्फ कान्हेर राजापर्यंत आहे व त्यानंतरच्या महादेव व रामदेव या प्रसिद्ध राजांचा सदर वंशावळीत उल्लेख सापडत नाही. त्याअर्थी कालिकापुराण या ग्रंथाची निर्मीती कृष्णदेवाच्या कारकिर्दीत झाली असावी हे अनुमान काढता येते. कृष्ण उर्फ कान्हेर राजाचा काळ इ.स. १२४७ ते इ.स. १२६० मानला जातो. ज्ञानेश्वरी व लिळाचरित्र या ग्रंथांची रचना रामदेवाच्या कारकिर्दीतील मानली जाते कारण या दोनही ग्रंथात रामदेवाचा उल्लेख येतो. कालिकापुराणात महादेव व रामदेवाचाही उल्लेख मिळत नसल्याने हा ग्रंथ ज्ञानेश्वरी व लिळाचरित्र यांच्या समकाली अथवा काही वर्षे अगोदर लिहीला गेला असला पाहिजे.

मराठी भाषेस अभिजात दर्जा मिळवण्यासाठी अनेक वर्षे प्रयत्न सुरु आहेत. २०१३ साली प्रा. रंगनाथ पाठारे यांच्या अध्यक्षतेखाली 'अभिजात मराठी भाषा समिती' स्थापून सदर समितीचा अहवाल २०१३ साली केंद्र सरकारला देण्यात आला मात्र या घटनेस आता सात वर्षांहून अधिक काळ लोटला तरिही मराठी भाषेस अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही हे दुर्दैव आहे. मराठी भाषेत प्राचीन व मध्ययुगात विपुल लिखाण झाले आहे व दिवसेंदिवस नवीन शोध लागत आहेत. कालिकापुराण हे मराठीला अभिजात भाषा म्हणून मान्यता मिळण्याकडे टाकलेले आणखी एक पाऊल आहे. आगामी काळात नवे संदर्भ मिळतील व लवकरच मराठी भाषेस अभिजात दर्जा मिळेल हीच आशा करुयात.