सिद्दीचा जंजिरा व त्यांचे हिंदू कारभारी

अनेकदा जंजिरा किल्ल्यावरिल 'शरभ' शिल्पाविषयी प्रश्न विचारले जात असतात व जर शरभ हे शैव संस्कृतीचे प्रतिक असेल तर जंजिरा किल्ल्यावर शरभ असण्याचे प्रयोजन काय हा प्रश्न अनेकांना असेल त्याची उत्तरे या लेखात आपण जाणुन घेऊ.

सिद्दीचा जंजिरा व त्यांचे हिंदू कारभारी
सिद्दीचा जंजिरा व त्यांचे हिंदू कारभारी

निजामशाही काळात या बेटावर कोळ्यांची वस्ती असून राम पाटील हा तेव्हाचा कोळ्यांचा नायक होता व या टापूच्या रक्षणाकरिता तेव्हा लाकडी मेढेकोट बांधण्यात आला होता. यावेळी राजपुरी येथे निजामशाही ठाणेदार होता त्याचे काही कारणावरुन रामा पाटलासोबत बिनसले तेव्हा त्याने निजामशहाची मदत मागितली तेव्हा निजामशहाने आपल्या पिरमखान या सरदारास आरमार देऊन टापुवर पाठवले त्याने कपटाने किल्ला घेण्याचा बेत केला व चर्चेचे निमित्त करुन दारुचा नजराणा पाठवुन टापुवरिल लोकांना धुंद करुन मग कैद केले तसेच नंतर तह करुन किताब व छत्राचा मान दिला. मात्र पिरमखानाचे व रामा पाटलाचे सारखे बिनसत असल्याने पिरमखानाने निजामशहाच्या मदतीने एक दिवस त्याचे डोके मारले. १५७१ मध्ये बुर्‍हाण नामक सरदाराने निजामशहाकडून परवानगि घेऊन या टापुवर कोट बांधून त्याचे जंजिरा असे नामकरण केले व हा बुर्‍हाण सिद्दी नव्हता हे लक्षात घेतले पाहिजे. त्यानंतर १६१७ साली पहिला सिद्दी सरदार या किल्ल्याचा कारभारी झाला तेव्हापासुन सिद्दींचा अमल येथे सुरु झाला.

या सिद्दींचे अनेक वंशज या किल्ल्याचे मालक झाले मात्र त्यांचे कारभारी हे अनेक हिंदूच होते १८व्या शतकात सिद्दी याकुतखान होता त्याचे कारभारी बाळाजी विश्वनाथ व जानोजी विश्वनाथ होते मात्र कुठल्यातरी संशयाने त्यांचे बिनसले व बाळाजी देशावर निघुन गेले व जानोजीला गोणत्यात घालून समुद्रात बुडवले गेले.

किल्ल्याच्या कामात हिंदू लोक आघाडीवर असल्याचे पुरावे आहेत, बाळसावंत मोकाशी नामक एक सरदार होता त्याने तब्बल ३२ माणसांच्या वजनाची चिरा उचलुन किल्ल्याच्या थरावर ठेवली तेव्हा सिद्दीने खुष होऊन त्याला व त्याच्या कुटुंबास करात माफी दिली.

तुर्तास आपण किल्ल्याची बाहेरची तटबंदी अथवा कोट पहातो तो सन १७२८ साली बांधला गेलेला आहे. याकाळात सिद्द्यांमध्ये सिद्दी याकुत म्हणुन एक सरदार होता त्याला शेख याकुत असेही म्हणायचे तो मुळचा हिंदू असुन गुहागरचा पाटलांपैकी होता मात्र त्याला लहानपणीच बाटवण्यात आले होते. जंजिर्‍याचे राजे सिद्दी असले तरी मुख्य कारभारी हे हिंदू असून अगदी संस्थानाच्या आरंभी प्रधान आडनावाच दिवाण किल्ल्याच्या बांधकामापासुन होते कालांतराने कर्णिक घराण्याकडे जबाबदारी येऊन नंतर मग गुप्ते घराण्याकडे हा हक्क आला, शिवाजी महाराजांचे चिटणीस बाळाजी आवजी यांचे घराणेही पुर्वी सिद्दीकडेच होते.

जंजिरा किल्ल्यात वस्ती करणारी दोन प्रमुख हिंदू घराणी म्हणजे सबनिस व दिवाण हे अगदी पुर्वीपासून याच किल्ल्यात आहेत व यांच्या हाती संपुर्ण संस्थानाचा कारभार असे. शादी खुशीचे सर्व शिरस्ते व मानमतराब यांना संस्थानात चालू होते व यांना सर्व सिद्दी लोक खुप मान देत असत. कालांतराने हि घराणी राजपुरी येथे गेली मात्र नंतर १८६६ साली किल्ल्याला आग लागल्यावर यांचे इतरत्र स्थलांतर झाले.

काही काळ तर हिंदू कारभार्‍यांकडेच जंजिर्‍याचा कारभार अप्रत्यक्ष आला होता जेव्हा राजा मेल्यावर त्याचा वारस हा लहान असे तेव्हा सर्व कारभार हे हिंदू लोकच पहात. सिद्दी इब्राह्मिम व सदाशिव अनंत याची मैत्री जगजाहिर आहे. १७९८ मध्ये सिद्दी जमरुतखानाने सर्व कारभार सदाशिव अनंत याच्या हाती सोपवला होता. असे व इतर अनेक दाखले आहेत जे जंजिर्‍यावरिल हिंदू प्रभावाचे अस्तित्व दाखवतात तेव्हा हे शरभशिल्प याच हिंदू प्रभावाखाली तयार केले गेले हे निसंशय सिद्ध होते.