महाभारतातील खांडववन घटना व नागसत्र मोहीम

खांडववन हे उत्तरेस कुरुक्षेत्राच्या सीमेवर वसलेले आणि वनौषधी वनस्पती, अनेक पशू, पक्षी, श्वापदे आणि आदिवासी इत्यादींनी समृद्ध असे वन होते. दक्षिणेतल्या दंडकारण्यासोबत याची तुलना केली जात असे.

महाभारतातील खांडववन घटना व नागसत्र मोहीम

Marathi Buzz Shop

Marathi Buzz Shop

कौरव-पांडव वादानंतर जेव्हा पांडवांनी इंद्रप्रस्थ नामक नगरी उभारून स्वत:चा राज्यविस्तार सुरु केला; तेव्हा हे खांडववन जाळून तेथे मयसभा नामक एक महाल उभारण्यात आला होता; जो मयासुराने वृषपर्वा नामक राक्षसाच्या बिंदू सरोवर याठिकाणी उभारला होता. मात्र याच खांडववनामध्ये नागकुळातली काही राज्येसुद्धा राज्य करीत होती. ज्यामधले एक कुळ म्हणजे तक्षक कुळ.

ज्यावेळी खांडववनास आग लावण्यात आली; त्यावेळी या कुळातील समाज या खांडववनाच्या आगीत भस्मसात होऊन बेघर झाल्याने तक्षक कुळ हे पांडव कुळाचे कट्टर वैरी झाले होते. नागवंशामध्ये जरी सर्प आणि नाग असे दोन पोटभेद पडले असले तरी मुख्यत: हे भेद स्वभावदर्शी होते. सोमवंशी, सूर्यवंशी अशा इतर कुळांसाठी नाग कुळात सर्पकुळ व नागकुळ असा सरळ भेद पडला होता. ज्यामध्ये जे सूर्यवंशी वा सोमवंशींना त्रास देतात ते सर्प (उदा. तक्षक, वासुकी कुळ) आणि जे शांत व संयमी असून सोमवंशी व सूर्यवंशींना मदत करतात ते नाग कुळ (अनंत, शेष) असा हा भेद होता. भगवद्गीतेतल्या एका संस्कृत श्लोकात म्हटले आहे "सर्पाणामस्मिवासुकि:'' आणि "अनंतस्मि नागानां''.

तक्षक कुळ पांडवांचे शत्रू झाल्यानंतर त्यांनी कुरुक्षेत्रावरील युद्धामध्ये कर्णास पांडवांविरूद्ध मदत केली होती. उत्तर महाभारत काळात खांडववनाच्या घटनेचा बदला घेण्याचा योग तक्षकाला आला. याकाळी हस्तिनापूरच्या गादीवर अर्जुनाचा नातू व अभिमन्युचा पुत्र परीक्षित विराजमान झाला होता. मात्र जुन्या वैरापायी विषप्रयोग करून तक्षकाने परीक्षितास ठार मारले.

परीक्षिताचा पुत्र जनमेजयाने वडिलांच्या हत्येचा सूड घेण्यासाठी सर्पसत्र नावाची युद्ध मोहीम आरंभली. ओल्याबरोबर सुके जळते त्याप्रमाणे सर्पांबरोबर नागलोकांनासुद्धा दोष नसताना या युद्धाची झळ बसू लागली. नाग लोक व सर्प लोक यांना नष्ट करणे हाच या मोहिमेचा उद्देश होता. साहजिकच कुरुराज्ये व मित्रराष्ट्रांपुढे नागांचे बळ कमी पडू लागले व नाग राज्यांचा विनाश होऊ लागला. हे युद्ध एवढे भयानक होते की, नागांची सोळा राज्ये (कुळे) यामध्ये नष्ट झाली. खुद्द तक्षकाचे राज्यसुद्धा या संहारात नष्ट झाले मात्र तक्षकाने कशीबशी आपली सुटका करून घेऊन तो इंद्राच्या आश्रयास गेला.

मात्र या सर्पसत्रापुढे इंद्राच्या सैन्याची ताकदसुद्धा कमी पडू लागली आणि इंद्रालाच बंदिवान होण्याची पाळी आली. शेवटी त्याने तक्षकास दिलेले अभय काढून घेतले. आणि मग तक्षकास बंदिवान बनवून जनमेजयाच्या नागसत्र यज्ञाजवळ आणले गेले. मात्र क्षमेची याचना करणाऱ्या तक्षकाची दया येऊन आस्तिक ऋषींनी जनमेजयास तक्षकास आता पश्चाताप झाला आहे. तेव्हा त्यास सोडून दे असे सांगितल्यामुळे नाईलाजाने जनमेजयास तक्षकास सोडून द्यावे लागले.

या नागसत्र अभियानाच्या वेळी जी नागराज्ये नष्ट झाली; त्यापैकी काही वाचलेल्या नागकुळांनी भारतखंडाच्या इतरत्र राज्यामध्ये जाऊन आसरा मागितला व त्या त्या प्रांतातल्या राजांनीही त्यांना आसरा दिला. दक्षिणेकडे आलेल्या काही नागकुळांचे कोकण प्रांतातही आगमन झाले होते. कोकण हे आपल्या भौगोलिक विविधतेमुळे तेव्हा स्वतंत्र राज्य म्हणून गणले जात होते व त्यास अपरांत म्हणजे पृथ्वीचा पश्चिमेकडील अंत या नावानेसुद्धा ओळखले जात असे. कोकणातल्या दऱ्या खोऱ्यात, समुद्राने व्यापलेल्या निबिड अरण्यात जे खांडववनाशी समरूप होते त्यामध्ये या नाग लोकांनी आसरा घेतला व ते वस्ती करून राहू लागले.

महाराष्ट्रात, दक्षिणेत तथा कोकणात आजही नागांची नावे असलेली विपुल गावे आढळून येतात. उदा. नागपूर, नागापट्टणम, पन्नगपल्ली (पनवेल), नागपाडा, नागाव, नागोठणे, नागठाणे, इत्यादी. नागोठण्यास नागांनी वस्ती केली म्हणून नागोठण्यास नागस्थान असे नामाभिमान प्राप्त झाले. नागस्थान म्हणजे नागांचे स्थान. नागांची नावे असलेल्या प्रत्येक गावात एक तरी नागमूर्ती किंवा मंदिर असल्याचे दिसून येईल, कारण हे नाग लोक आपल्या नऊ नागांची मंदिरे अथवा मूर्ती त्या त्या ठिकाणी स्थापन करुन राहात असत. आजही रायगड जिल्ह्रातील नागाव, आवास, तळा, पनवेल इत्यादी गावांत नागशिल्पे पहावयास मिळतात व नागोठण्यातही आपल्याला पुरातन कुंडलिनीचे प्रतिक असलेल्या कुंड नागाची पुरातन संगमरवरी मूर्ती पहावयास मिळते. ज्या नागाचा उल्लेख महाभारतामध्ये आहे.

याकाळी कोकण परिसरात शैवपंथांचा आणि थोडाफार वैष्णव व शाक्तांचा प्रभाव होता. नागलोकांनी अनेक वर्षे येथे आपली मूळ संस्कृती जपून ठेवली असावी मात्र कालांतराने नागसंस्कृती ही शैवसंस्कृतीमध्ये विलीन झाली असावी. एका वेगळ्या विचार प्रवाहाप्रमाणे नाग शब्दाचा विचार करता हे लोक मूळचे डोंगरद¬यांतले रहिवासी असावेत, कारण नग या शब्दाचा संस्कृत अर्थ डोंगर असा होतो. त्यामुळे नाग लोक मूळचे डोंगराळ मुलुखातील रहिवासी असून ते कालांतराने जिकडे तिकडे पसरले असावेत. जर यांची समुद्रांतरी द्वीपें (उदा. नागोठणे, नागाव, पनवेल, नागापट्टणम) होती, तर जलयानाच्याशी यांचा बराच परिचय पूर्वीच्या काळी असला पाहिजे. नागलोक हे पाताळातले रहिवासी समजण्याचा संस्कृतात संप्रदाय आहे. या संप्रदायावरून नाग हे मूळचे दक्षिण दिशेचे (कोकणपट्ट्यातले) रहिवासी असून, ते पुढे वर हिमालयापर्यंत व काश्मिरापर्यंत पसरले असेंही म्हटले जाते. सप्तपाताळ या शब्दाचा सप्तकोकण या शब्दाशी काहीतरी संबंध असावा.

महाभारत काळात कुंकण नामक एका नागकुळाने येथे आपले राज्य स्थापिल्यामुळे या परिसरात सप्तकुंकण असे म्हटले गेले असेही म्हटले जाते. गुजरातमध्ये आजही नागर नामक  एक समाज अस्तित्वात आहे. याच नागलोकांचा मराठी भाषेच्या निर्मितीशीसुद्धा गहिरा संबंध आहे. नागांची स्वत:ची एक वेगळी संस्कृती होती. जेव्हा नागांनी दक्षिणेमध्ये येऊन नागोठणे (नागस्थान), पन्नगपल्ली (पनवेल), नागग्राम (नागाव) सारखी गावे स्थापन केली. इ. स. पूर्व सहाव्या-सातव्या शतकामध्ये येथे राष्ट्रीक, वैराष्ट्रीक आणि महाराष्ट्रीक ह्रा तीन संघाचे लोक उदयास आले व मरहट्ट (महारथी) अर्थात मराठा वंशाचा उदय झाला. नाग लोक वैदिक अपभ्रंशित भाषा बोलत असत तर महाराष्ट्रीक त्यांची महाराष्ट्री बोलत असत. याच महाराष्ट्रीक आणि वैदिक अपभ्रंशित भाषांच्या मिलनातून मराठी भाषेचा उदय झाला.

बुद्ध काळात कोकणामध्ये लहान सहान नागराज्ये स्थापन झाली असल्याचे संदर्भ मिळतात. नागलोक हे निष्णात दर्यावर्दी असून कोकणपट्टीतली पहिली आरमारे यांनीच स्थापन केली असे म्हणावयास हरकत नाही. नागकुळांची वस्ती कोकणात ज्या ठिकाणी होती ती ठिकाणे एका विशिष्ट खाडीत, समुद्रतटाजवळ, बंदरात असल्याचे दिसून येते. नागलोक हे पूर्वीपासून युद्धकलेत निष्णात असून लढवय्ये असल्याने या काळात कोकणपट्टीत युद्धाचे ढग जमले होते त्यामुळे येथील इतर वंशांच्या काही राजांनी बुद्धांची भेट घेऊन नागराज्यांना युद्ध टाळण्याचा संदेश देण्याची याचना केली. तेव्हा बुद्ध स्वत: कोकणात अनुयायांसह दाखल झाले. यावेळी युद्धाची धामधुम होती आणि नागांच्या जहाजाचे मोठमोठे तांडे कोकण किनारपट्टीवर शत्रूवर चाल करून येण्याच्या तयारीमध्ये होते. अर्थात हे तांडे म्हणजे आरमार कोकणातल्या महत्वाच्या बंदरांमध्ये, खाड्यांमध्ये असले पाहिजेत ज्यामध्ये नागोठणे बंदराचासुद्धा समावेश नक्कीच होत असेल. अशावेळी बुद्धांनी नागराज्यांच्या सम्राटांना भेटून त्यांना शांतीचा संदेश दिला व युद्ध होण्यापासून रोखले. पश्चात नाग लोक हे बुद्धांचे सहकारी म्हणून ओळखले गेले हे ज्ञातच आहे.