दुर्गपरिभाषा - भाग ३

रात्रीच्या वेळी दुर्गाच्या रक्षणासाठी ठेवलेला जागृत पहारा. हा पहारा दुर्गाच्या संपूर्ण तटाला घालण्यात येत असे. दुर्गाच्या आकारमानानुसार कधी कधी यासाठी स्वतंत्र तटसरनौबत (प्राकारपाल:) नियुक्त केला जाई.

दुर्गपरिभाषा - भाग ३
दुर्गपरिभाषा - भाग ३

खंदक/परिखा - हा दुर्गविशेष खास करून स्थलदुर्गांमध्ये दिसून येतो. मात्र क्वचित प्रसंगी गिरिदुर्गात देखील खंदक बांधल्याचे आढळून आले आहे (उदा. जिंजीच्या राजगिरी या बालेकिल्य्यास असणारा खंदक).  स्थलदुर्ग  जमिनीवर असल्याने शत्रुसैन्यास थेट दुर्गाच्या ताटाला भिडता येऊ नये यासाठी दुर्गाच्या भोवती तटबंदीच्या बाहेर खोल व रुंद असा चर खोदण्यात येतो त्यालाच खंदक अथवा परिखा म्हणतात. बहुतेक करून खंदक हे पाण्याने भरलेले असतात मात्र क्वचित प्रसंगी तो काटेरी व विषारी वेली, झुडपे यांनी युक्त असे व शत्रूस फसविण्यासाठी त्याचा उत्कृष्ट उपयोग होई. कौटिल्य त्याच्या दुर्गविधानम मध्ये स्थलदुर्गाच्या संरक्षणासाठी तिहेरी खंदकाची साखळी असावी (एकामगोमाग एक  ३ खंदक १४, १२ व १० दंड रुंदीचे) असे सुचवितो. या खंदकात पाणी व अनेक प्रकारचे घातक जलचर असत जेणेकरून त्यात पडलेला शत्रू हा जीवित राहू नये. खंदक ओलांडण्यासाठी काढता घालता येईल असा लाकडी पूल असे. हा पूल वर उचलण्यासाठी व खाली सोडण्यासाठी प्रवेशद्वारात कप्यांची (pullies) योजना केली असे. या कप्या व दोराच्या मदतीने हा पूल वर खाली केला जाई. औसा उदगीर, नळदुर्ग, कंधार, परिंडा  अशा अनेक दुर्गाना खंदक पहावयास मिळतो. याशिवाय जयगड, देवगड, विजयदुर्ग, आग्वाद, निवती, खोलगड (काब-दि-राम) अशा सागरकिनारी असणाऱ्या दुर्गाना देखील खंदक आहेत मात्र हे सारे कोरडे खंदक आहेत. यांच्यात पाणी साठविण्यासाची सोय नाही. कदाचित शत्रूला थेट तटबंदीला भिडण्यापासून रोखता यावे या उद्देशाने ते असावेत. देवगिरीच्या बाल्लेकील्यास असणारा खंदक हा लष्करी स्थापत्याच्या एक अद्वितीय नमुना मानवा  लागेल सुमारे ८० लक्ष टन कातळ डोंगरातून खोदून हा खंदक तयार करण्यात आला आहे. एकंदरीतच स्थलदुर्गाच्या संरक्षक कवचातील हा पहिला स्तर असल्याने तो अधिकाधिक भक्कम व दुष्कर करण्याचाच प्रत्येक शासकाचा प्रयत्न असे.

गुसलखाना/मंत्रस्थानम (खलबतखाना) - या फारसी शब्दाचा मूळ अर्थ जरी स्नानगृह असा असला तरी दुर्गसंज्ञेत या जागेस राजाचे आपल्या विश्वासू मंत्री व अधिकारी यांच्यासोबत गुप्त चर्चा करण्याचे स्थान अथवा खलबतखाना असा होतो. मात्र आताच्या काळात हीच जागा खलबतखाना म्हणून वापरली जात होती असे सांगणे शक्य नाही. रायगडावर अशी एक वस्तू दाखविली जाते मात्र तिथे असणारा प्राणवायूचा अभाव व कोंदटपणा लक्षात घेता हि जागा गुप्त मंत्रांना करण्यासाठी अतिशय अयोग्य वाटते.

खानजादेवाडा अथवा कुमारसदनम - राजपुत्र अथवा दासीपुत्रांचे निवासस्थान. अर्थात हि वस्तू अगदी मोजक्याच दुर्गांवर असणार हे उघड आहे.

खासबाग/ क्रीडावनम  - राजघराण्यातील व्यक्तींना क्रीडा अथवा विहार करण्यासाठी  निर्मिलेली बाग अथवा उद्यान.

खंबीर/चुर्णकर्दम - आपणा सर्वांनाच जिलेबी फार आवडते. आणि बहुतेकांना जिलेबीच्या तयार पिठास खंबीर म्हणतात हे देखील माहित असेल. मात्र आता आपण जो खंबीर जाणून घेणार आहोत तो थोडा वेगळा  आहे. कोणत्याही दुर्गावर कोणतीही वस्तू उभारण्यासाठी दगडा इतकाच महत्वाचा घटक म्हणजे चुना. चुन्याभावी उभी केलेली वस्तू हि मजबूत नसते व हलक्याशा माऱ्याने देखील ती कोसळू शकते. त्यामुळे बांधकामासाठी घाणीत मळलेला उत्तम चुना हा अत्यावश्यक घटक असे. अशा उत्तम मळलेल्या चुन्यास खंबीर म्हणत. या चुन्यात गूळ, हिरडा, शिंपले व चुनकळी असे अनेक घटक वापरीत. असा हा उत्तम दळलेला चुना जसजसा जुना होतो तितकाच तो अधिक भक्कम होत जातो. सिंधुदुर्ग, जंजिरा, पदमदुर्ग अशा अनेक जलदुर्गाच्या दर्जांमध्ये भरलेला चुना आज शेकडो वर्षांनंतर देखील तसाच आहे. मात्र बांधकामात वापरलेला पाषाण झिजून या दर्जा वर आलेल्या आहेत.

गडेकरी/पाषाणवाहक: - बांधकामासाठी लागणार पाषाण अथवा दगड वाहून नेणारा सेवक. दुर्गावर बांदकाम चालू असताना  प्रचंड आकाराच्या पाषाण शिळा वाहण्यासाठी मोठ्या संख्येने असा सेवकवर्ग लागे.

गला/धान्यम - किल्ल्यावर साठवून ठेवलेले धान्य. गडावरील शिबंदीसाठी सर्वात अवश्य घटक म्हणजे हा गला. प्रसंगी याच्या अभावी फाके पडून भूक व उपासमारीमुळे दुर्ग शत्रूच्या हवाली करावं लागण्याच्या दुर्धर प्रसंग ओढवे. त्यामुळे शासक प्रत्येक दुर्गावर पुरेसा धान्यसाठा असेल याची खबरदारी घेई. हा साठा काळजीपूर्वक वापरला जाईल याची खबदारी घेणे हे कारखानीसाचे महत्वाचे काम असे. या संदर्भात दळवटने येथे राजांची छावणी पडली असता गला काळजीपूर्व कसा वापरावा याबद्दल राजांनी एक रोखा तेथील व प्रांतातील सर्वच हवालदारांना लिहिला होता जो त्यांचे दूरदर्शित्व दर्शवितो.

गस्ती/यामिक: - रात्रीच्या वेळी दुर्गाच्या रक्षणासाठी ठेवलेला जागृत पहारा. हा पहारा दुर्गाच्या संपूर्ण तटाला घालण्यात येत असे. दुर्गाच्या आकारमानानुसार कधी कधी यासाठी स्वतंत्र तटसरनौबत (प्राकारपाल:) नियुक्त केला जाई. पुढे स्वराज्याचे सरनौबत बनलेले कडतोजी उपाख्य प्रतापराव गुजर हे काही काळ राजगडाचे तटसरनौबत होते. यावरून हे पद किती कळीचे होते याची कल्पना यावी.

गस्ती/यामाटनम - रात्रीच्या वेळी दुर्गाच्या रक्षणासाठी सैनिकांचे आतबाहेर फिरने. स्वराज्यात मात्र हा प्रकार असावा असे वाटत नाही. एकदा दरवाजा लावल्यानंतर कोणासही आत घेण्यास सक्त माई होती. मात्र ताटाच्या आत व बाहेर सदैव जागता पहारा असे. क्रमशः

- संतोष विष्णू जाधव (पुणे)