गनर कांबळे - मृत्यूनंतरही शत्रुंना संपवणारे शूरवीर

युद्ध सुरु असताना एके दिवशी अचानक चीनच्या सैन्याने मोठ्या संख्येने महार मशिनगन रेजिमेंटवर हल्ला केला. चीनच्या सैन्याच्या संख्याबळाच्या तुलनेत महार मशिनगन रेजिमेंटचे सैन्य कमी होते मात्र तरीसुद्धा सैन्य चीन सैन्याविरोधात प्राणपणाने लढत होते.

गनर कांबळे - मृत्यूनंतरही शत्रुंना संपवणारे शूरवीर

Marathi Buzz Shop

Marathi Buzz Shop

भारतातील जे पारंपरिक लढवय्ये समाज आहेत त्यापैकी एक म्हणजे महार समाज. शिवकालापासून आधुनिक काळापर्यंत या समाजातील अनेक वीरांनी आपल्या शौर्याने इतिहासात योगदान दिले आहे मात्र दुर्दैवाने समाजातील अनेक वीररत्ने आजही उपेक्षित आहेत.

महार समाजातील असेच एक उपेक्षित वीर म्हणजे गनर कांबळे. चीनविरोधातील युद्धात गनर कांबळे यांनी जो अतुलनीय पराक्रम गाजवला त्याची या लेखातून माहिती घेण्याचा प्रयत्न करू.

भारतातील लढाऊ बाण्याच्या समाजाचे गुण हेरून या समाजांच्या खास पलटणी भारतीय सैन्यात निर्माण करण्यात आल्या व त्या प्रामुख्याने मराठा, राजपूत, महार, शीख, गोरखा या नावाने प्रसिद्ध आहेत. आजही या पलटणी भारतीय सैन्यदलात असल्या तरी सध्या या पलटणीतील सैनिक हे विविध समाजाचे असतात. 

भारतीय सैन्यातील अशीच एक तत्कालीन प्रसिद्ध पलटण म्हणजे महार मशिनगन रेजिमेंट. या रेजिमेंटने विविध युद्धप्रसंगी काश्मीर, लडाख, नेफासारख्या स्थळी पराक्रम गाजवून मोठे नाव मिळवले होते व या रेजिमेंट मधील जवान, सरदार आणि हुद्देदारांना अनेक वीरचक्रे मिळाली आहेत. १९६२ साली चीनने भारतावर आक्रमण केले होते व यावेळी महार मशिनगन रेजिमेंट सुद्धा चीनला चोख प्रत्युत्तर देत होती. 

युद्ध सुरु असताना एके दिवशी अचानक चीनच्या सैन्याने मोठ्या संख्येने महार मशिनगन रेजिमेंटवर हल्ला केला. चीनच्या सैन्याच्या संख्याबळाच्या तुलनेत महार मशिनगन रेजिमेंटचे सैन्य कमी होते मात्र तरीसुद्धा सैन्य चीन सैन्याविरोधात प्राणपणाने लढत होते. मात्र चिनी सैन्याच्या संख्येपुढे व शस्त्रांच्या साठ्यापुढे भारतीय सैन्यबळ कमी पडू लागले आणि हळूहळू भारतीय सैन्यातील सैनिक जखमी व मृत्युमुखी पडू लागले.

भारतीय सैनिकांची संख्या कमी होऊ लागल्याने चिनी सैन्यास जोर चढला व ते अजून आक्रमक होऊन वेगाने पुढे येऊ लागले. अपुरे सैन्य व कमी शस्त्रसाठा यांच्या बळावर शत्रूस रोखणे कठीण होऊन बसल्याने शेवटी तुकडीतील उर्वरित सैन्यास तात्पुरती माघार घेऊन अलीकडील कॅम्पवर परतण्याचा आदेश देण्यात आला मात्र सर्व सैनिक एकत्र मागे हटले तर शत्रूस मोकळे रान मिळून त्याने भारतीय सैन्याचे जास्त नुकसान केले असते म्हणून शत्रूला थोपवून धरण्याची जबाबदारी महार मशिनगन रेजिमेंट मधील एक शूर गनर कांबळे व त्यांचे रेजिमेंटमधील तीन साथीदार यांच्याकडे देण्यात आली. 

भारतीय सैन्याकडील शस्त्रसाठाही संपत आल्याने सैन्य मागील कॅम्पमध्ये जाऊन पुन्हा लढण्याची तयारी करेपर्यंत कांबळे व त्यांचे तीन साथीदार अशा चौघांनी फक्त एका मशीनगनच्या साहाय्याने समोरील असंख्य चिनी सैनिकांचा प्रतिकार करायचा होता. ही जबाबदारी अत्यंत कठीण व धोक्याची होती तरीही कांबळे व त्यांच्या तीन शूर साथीदारांनी ही जोखीम देशासाठी आनंदाने पत्करली.

व्युव्हरचना झाल्यावर कांबळे आणि त्यांचे तीन साथीदार युद्धस्थळी उभे राहिले व इतर सैन्य जखमी व मृत सैनिकांना घेऊन मागील कॅम्पकडे जाऊ लागले. कांबळे व त्यांच्या साथीदारांकडे फक्त एक शस्त्र होते व ते म्हणजे मशिनगन. कांबळे यांनी मशिनगन हाती घेतली आणि समोरील शत्रूवर गोळ्यांची बरसात सुरु केली.

कांबळे यांच्या वेगाने अर्धवर्तुळकार फिरणाऱ्या मशीनगनच्या टप्प्यात समोरच्या उतारावरून खाली येणारे अनेक चिनी सैन्य आले व मारले गेले मात्र भारताकडून एकाच ठिकाणाहून मशीनगनचा मारा होत आहे हे चिनी सैन्याच्या लवकरच लक्षात आले व याचा अर्थ एक तर मशिनगन चालवणारे सोडून इतर सर्व भारतीय सैन्य धारातीर्थी पडले असले पाहिजे अथवा त्यांनी माघार घेतली असावी आणि माघार यशस्वी व्हावी म्हणून आपल्याला रोखण्यास ही मशिनगन मागे ठेवण्यात आली असावी असा निष्कर्ष चीनच्या सैन्याने लावला.

असे असूनही बलाढ्य चिनी सैन्याचा सामना फक्त एका मशीनगनच्या आधारे केला जात आहे हे पाहून चिनी सैन्याचा संताप झाला आणि या मशीनगनचा निकाल लावल्यावरच आपल्याला माघारी परतणाऱ्या भारतीय सैन्याचा समाचार घेता येईल हे जाणून चिनी सैन्याने आपली सर्व शस्त्रे कांबळे यांच्यावर रोखली आणि त्यांच्यावर मारा सुरु केला. 

अशाप्रकारे चिनी सैन्याकडून हल्ला झाला तरी कांबळे आणि त्यांचे तीन साथीदार अजिबात पर्वा न करता मशीनगनचा मारा चिनी सैन्यावर करीत राहिले. या युद्धात आपले मरण निश्चित आहे हे कांबळे व त्यांचे तीन साथीदार यांना कळून चुकले होते मात्र आपण जर शस्त्र खाली टाकले तर आपल्यासोबत आपले सैन्यही मारले जाईल हा विचार करून त्यांनी मरेपर्यंत चिनी सैन्याचा जोरदार प्रतिकार करण्याचा निश्चय केला. 

कांबळे मशीनगनने शत्रूवर मारा करीत असताना त्यांच्या तीन साथीदारांपैकी एक दुर्बिणीतून शत्रूवर नजर ठेवून कांबळे यांना सूचना देत होता जेणेकरून कुठल्या दिशेला मारा करायचे आहे हे कांबळे यांना समजेल. इतर दोघे जण मशिनगन मधील गोळ्या संपल्या की नवीन गोळ्यांचे पट्टे मशीनगनला जोडण्याचे काम करीत होते.

अशाप्रकारे हे चार वीर चीनचा प्रतिकार करत असताना शत्रुसैन्याकडून आलेली एक गोळी दुर्बिणीने शत्रूवर नजर ठेवणाऱ्या निरीक्षकास लागून त्यास वीरमरण आले. यानंतर काही काळ गेला आणि एक बॉम्ब कांबळे व इतर सैन्य ज्या खंदकात होते त्या खंदकात येऊन पडला आणि इतर दोन सैनिक सुद्धा वीरगतीस प्राप्त झाले. या बॉम्बच्या हल्ल्याने कांबळे यांचे पाय जखमी झाले मात्र प्रचंड वेदना होत असूनही कांबळे यांनी मशिनगन सुरूच ठेवली. शत्रू हळूहळू पुढे येत होते, पाहता पाहता कांबळे यांच्या बाजूलाच बॉम्ब फुटू लागले मात्र वीर कांबळे जखमी अवस्थेत व शत्रूने चोहोबाजूने घेरले गेले असूनही आपल्या कर्तव्यापासून मागे हटले नाहीत. 

पाहता पाहता एक हातबॉम्ब अगदी कांबळे यांच्या जवळ फुटला व त्याचा एक मोठा तुकडा कांबळे यांच्या छातीत घुसला आणि कांबळे मशिनगनवर कोसळले. आपला मृत्यू आता जवळ आला आहे हे आता कांबळे यांना कळून चुकले होते मात्र मृत्यू येण्यापूर्वी त्यांनी मशिनगनचा ट्रिगर जोराने दाबून धरला आणि प्राण सोडले त्यामुळे प्राण जाऊनही कांबळे यांची मशिनगन शत्रूवर गोळ्यांचा वर्षाव करत राहिली आणि असंख्य चिनी सैन्य मारले गेले. 

शिवकाळात मुरारबाजींचे शीर कापले गेले तरी त्यांच्या हातातील दांडपट्ट्याने जसे मोगल सैन्याचे बळी घेतले तशाच प्रकारे देहातून प्राण जाऊनही कांबळे यांनी आपल्या हातातील मशीनगनने अनेक चिनी सैनिकांचा फडशा उडवला व त्यांचे हे बलिदान भारतीय सैन्यदलाच्या इतिहासातील एक अजरामर बलिदान म्हणून कायम स्मरणात राहील.