नागांव - अष्टागरांचा 'नागमणी'

रायगड जिल्ह्याचा सागरी इतिहास जर कोणी लिहावयास घेतला तर तो अष्टागरांशिवाय पुर्ण होऊ शकत नाही. प्राचीन काळी दमणगंगेपासून मुंबईपर्यंतच्या प्रदेशास शुर्पारक आणि मुंबईपासून रेवदंड्याच्या खाडीपर्यंतच्या प्रदेशास अष्टागर म्हणुन ओळखले जात असे.

नागांव - अष्टागरांचा 'नागमणी'
नागांव येथील एक शिलालेख

रायगड जिल्ह्याचा सागरी इतिहास जर कोणी लिहावयास घेतला तर तो अष्टागरांशिवाय पुर्ण होऊ शकत नाही. प्राचीन काळी दमणगंगेपासून मुंबईपर्यंतच्या प्रदेशास शुर्पारक आणि मुंबईपासून रेवदंड्याच्या खाडीपर्यंतच्या प्रदेशास अष्टागर म्हणुन ओळखले जात असे. अष्टागर म्हणजे अष्ट आगरे अर्थात आठ मुख्य स्थानके. ही अष्टाग्रे नक्की कोणती होती याबाबत अनेक मतभेद असले तरी सर्वाधिक प्रचलीत मतानूसार अलिबाग, नागाव, थळ, सासवणे, अक्षी, किहीम, साखर व आवास ही गावे अष्टागरे म्हणुन प्रसिद्ध आहेत. ही सर्व अष्टागरे रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग तालुक्यातच आहेत. अशा या अष्टागरातले एक प्राचिन गाव म्हणुन नागाव प्रसिद्ध आहे, सध्या नागाव हे पर्यटकांचे नंदनवन म्हणुन प्रसिद्ध असले तरी या गावास अतिशय प्राचिन असा ऐतिहासिक वारसा आहे. नागावचे प्राचिन संस्कृत नाव नागग्राम, महाभारतातल्या नागसत्र यज्ञानंतर जी नागकुळे दक्षीणेत स्थित्यंतरीत झाली व जी गावे वसवली त्यापैकी नागाव हे एक गाव. नागाव मध्ये आजही नागवंशाच्या प्राचीन खुणा अस्तित्वात आहेत. यातील अत्यंत महत्त्वाची खुण म्हणजे दश नागांचे मंदीर, या मंदीरात नागाव गावाच्या मुळ दैवत असलेल्या दश नागांच्या मुर्त्या पहावयास मिळतात ज्या अत्यंत प्राचिन आहेत.

अनेक प्राचिन साधनांमध्ये नागावचा उल्लेख नागुम असा सुद्धा करण्यात आला आहे. नागाव मध्ये इतिहासाच्या पाऊलखुणा जागोजागी सापडतात, यापैकी महत्त्वाच्या खुणा म्हणजे नागावच्या वैभवशाली इतिहासाची साक्षी असलेली पुरातन मंदीरे भिमेश्वर मंदीर, सिद्धीविनायक मंदीर, वंखनाथ मंदीर, नागेश्वर मंदीर, दक्षीणमुखी देवस्थान अशी यादी संपता संपणार नाही. ही सर्व मंदीरे वास्तुशास्त्राच्या दृष्टीने अतिशय अप्रतिम अशीच आहेत. यापैकी भिमेश्वर हे मंदीर या मंदिरात असलेल्या १२ व्या शतकातल्या शिलालेखामुळे इतिहासप्रेमींमध्ये जास्त प्रसिद्ध आहे. हा शिलालेख भिमेश्वर मंदीराच्या उत्तरेकडील दरवाज्याच्या पायरीवर कोरला असून आजही सुस्थितीत आहे, यावरिल मजकुर पाहता हा ठाणे-कोकण या भागावर राज्य करणार्‍या कुणा हंबीरराव नामक राजाच्या नावे असून शिलालेखावरील प्रौढी प्रताप चक्रवर्ती ही अक्षरे हा शिलालेख यादवकालीन असल्याची साक्ष देतात. याशिवाय याच मंदीर परिसरात शिल्पशास्त्राचा अजब नमुना असलेल्या काही मुर्त्या सुद्धा पहावयास मिळतात.

येथील सिद्धीविनायकाचे देवस्थान तसे मुख्य मार्गावर असूनही अपरिचितच आहे. या मंदीराचे लाकडी सभागृह आता पुरते मोडकळीस आले असून फक्त गाभाराच सुस्थितीत आहे. या मंदीराच्या गाभार्‍याच्या प्रवेशद्वारावर एक शिलालेख कोरला असून भग्नावस्थेत असल्याने पुर्णपणे वाचता येत नाह मात्र यावर सुस्थितीत असलेली 'प्लवंग संवस्तरात कुणा बाळभट्टाच्या नावे असलेले हे दानपत्र असल्याचे लिहीले असल्याने' ह्या शिलालेखावरील बाळभट्ट म्हणजे छ्त्रपती शिवाजी महाराजांचे पुरोहीत चौलचे वेदसंपन्न पुरोहित प्रभाकरभट्ट यांचे चिरंजीव बाळभट्ट असल्याची शक्यता नाकारता येत नाही. हे बाळभट्ट सुद्धा वेद्संपन्न असून शिवराज्याभिषेकात अनेक कार्ये त्यांनी गागाभट्टांसोबत पार पाडली होती.

नागाव मधील एक अतिशय देखणे मंदीर म्हणुन वंखनाथाच्या मंदीराचे नाव घेता येईल. हे शिवमंदीर पुरातन असले तरी आहिल्याबाई होळकरांच्या काळात म्हणजे सन १७९० मध्ये या मंदीराचा जिर्णोद्धार झाल्याचे दाखले आढळतात. या मंदीरासमोरील पुष्करणी सुद्धा अतिशय प्रेक्षणीय असून या पुष्करणीमधील कासवे ही पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय आहे. या मंदीरातील नंदीची मुर्ती हि अतिशय रेखीव असून अशा प्रकारची दुसरी मुर्ती कुठल्याही शिवमंदीरात सापडणे केवळ अशक्यप्राय गोष्ट आहे. येथील नागेश्वर हे शिवमंदीर सुद्धा बरेच जुने असून जानकोजी आंग्रे यांनी या मंदीराचा जिर्णोद्धार केल्याची माहिती सापडते.

प्राचिन काळापासून प्रसिद्ध असलेल्या नागावं ने शिवकाळात सुद्धा राजकिय दृष्ट्या महत्त्वाच्या स्थानाची भुमिका बजावली होती. त्याकाळी शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात नागावचा समावेश होत असे व शेजारच्या चौल वर पोर्तुगिजांची सत्ता होती तसेच पलिकडे मुरुड येथे मराठ्यांचा कट्टर शत्रू जंजिर्‍याचा सिद्दी याची सत्ता असल्याने शिवाजी महाराजांनी सिद्दीच्या ताब्यातल्या अनुक्रमे जंजिरा व उंदेरी या ठिकाणांवर काढलेल्या मोहिमांचे आरंभस्थान नागाव हेच होते. १६७० च्या नोव्हेंबर महिन्यात शिवाजी महाराजांनी नागाव येथे १६० लहान जहाजे, १०००० घोडदळ व २०००० पायदळाचे सैनिक तयार ठेवून जंजिर्‍याला वेढा घालण्याच्या तयारीने जमावले होते. या सैनिकांसोबत इतर शस्त्रास्त्रांसोबत कुदळी, फावळी, पहारी इत्यादी बांधकामाची आयुधे सुद्धा होती. २४ नोव्हेंबरला या तुकडीने नागाव सोडले मात्र २६ तारखेला महाराज अचानक माघारी वळले व आरमारास परत बोलावून काही काळातच त्यांनी खानदेश व वर्‍हाडवर स्वारी केली व प्रचंड प्रमाणात लुट मिळवली. अर्थात नागाव मधून निघालेली ही मोहिम ही महाराजांच्या राजकिय डावपेचांचाच एक भाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही ज्यास गनिमीकावा असे प्रसिद्ध नाव आहे.

नागावचा समुद्रकिनारा सुद्धा अतिशय स्वच्छ, सुंदर व डोळ्यांचे पारणं फेडणारा असून सभोवताली दाट सुरुबनाने वेढल्याने किनार्‍याच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे. पुरेशी काळजी घेतल्यास या सुरक्षित अशा समुद्रकिनार्‍यावर जलक्रिडेचा मनसोक्त आनंद लुटता येतो.

गेली हजारो वर्षे नागावने आपली प्राचिन संस्कृती जपून ठेवल्याने आजही नागाव मध्ये येणार्‍या पर्यटकांना खर्‍या अर्थाने कोकणातल्या एका टुमदार गावात आल्याचा भास होतो. नागावचा स्वच्छ व सुंदर असा समुद्रकिनारा पोहोण्याच्या दृष्टीने सुद्धा सुरक्षित असल्याने जलक्रिडेसाठी पर्यटक हजारोंच्या संख्येने येथे भेट देत असतात मात्र समुद्र पर्यटनाबरोबरच नागाव मधील ऐतिहासिक वारश्याचे दर्शन जर या पर्यटकांना देता आले तर खर्‍या अर्थाने नागावचे सांस्कृतीक व ऐतिहासिक वैभव जगासमोर येईल . सर्वांनी एकत्र येऊन त्यादृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे.

प्राचिन काळी नागांव, चौल, रेवदंडा सारखी बंदरे युरोप, अरब तथा आफ्रिकन राष्ट्रांशी व्यापार करण्यामध्ये अग्रेसर होती मात्र मध्ययुगातली अस्थिरता या बंदरांच्या नाशासाठी कारणीभुत ठरली. इतक्या राजकिय स्थित्यंतरातही नागाव, चौल, रेवदंडासारखी गावे आपले अस्तित्व टिकवून आहेत ही खरे तर दैवी कृपाच म्हणायला हवी. अष्टागरांचे वैभव असलेले नागाव म्हणजे जणू ऐतिहासिक, सांस्कृतीक, भाषिक, वांशिक व राजकिय ठेव्यांचे एक संग्रहालयच आहे.