सुडी - कल्याणी चालुक्यांच्या पाऊलखुणा

कर्नाटकातल्या गदग परिसरात कल्याणी चालुक्य राजवटीत बांधलेली अनेक मंदिरे दिसून येतात. खास वेसर शैलीत असलेली शिखरे, लेथवर फिरवून केल्यासारखे गुळगुळीत खांब आणि अतिशय सुंदर अशी शिल्पे हे यांचे अगदी खास वैशिष्ट्य.

सुडी - कल्याणी चालुक्यांच्या पाऊलखुणा

इ.स. च्या अंदाजे १० ते १२ व्या शतकात यांची राजवट इथे नांदली. यांनी राष्ट्रकूट राजांचा पराभव करून आपली सत्ता स्थापिल्याचे समजते. गदग परिसरात असलेली इटगी, डंबल, लकुंडी, अण्णिगेरी, लक्ष्मेश्वर इथली एकापेक्षा एक देखणी देवालये ही यांची ओळख. जरी आडमार्गाला वसलेली असली तरीसुद्धा फार सुंदर अशा स्थापत्यामुळे आणि शिल्पांमुळे ही मंदिरे अवश्य बघावीत अशी आहेत.

यांच्याच पंगतीत अजून एक ठिकाण आहे ते म्हणजे गदग जिल्ह्यातल्या रोण तालुक्यात वसलेले ‘सुडी’ हे गाव. ग्रामपंचायत असलेलं एक खेडेगाव. पण मोठा शिल्पसमृद्ध ठेवा या गावी वसलेला आहे. इथे असलेले दोन गाभारे असलेले ‘जोडुकलश गुडी’, मल्लिकार्जुन मंदिर, गणपतीचे भव्य शिल्प आणि फारच सुंदर अशी नागबावी किंवा रसदबावी नाव धारण केलेली स्टेपवेल.

या विहिरीत उतरताना बाजूला असलेल्या भिंती या कुठल्याशा देवळाच्या बाह्यभिंती भासाव्यात इतक्या सुंदर सजवलेल्या आहेत. विहिरीत चारही बाजूंनी एक ओटा असून त्यावर उभे राहून विहिरीचे सौंदर्य न्याहाळता येते. गावात शिरतानाच एक साधेसे मंदिर असून आतमध्ये १० फूट उंचीच्या गणपतीची मूर्ती विराजमान आहे. हंपी इथल्या कडलेकालु गणपतीची आठवण करून देणारी अशी ही मूर्ती.

दोन गाभारे असलेले द्विकूट मंदिरसुद्धा खूप आकर्षक आहे. मंदिराच्या बाह्यभिंतीवर शिल्पकला केलेली आणि मंदिराची दोन्ही शिखरे अत्यंत डौलदार. इ.स.१०६१ साली बांधलेले हे मंदिर आणि त्याचा औरस-चौरस आवार फारच सुंदर. मंदिर एका ६ फूट उंचीच्या चौथऱ्यावर उभे असून दोन्ही गाभाऱ्यावर ललाटबिंब म्हणून गजलक्ष्मीची मूर्ती विराजमान आहे. शिलालेखानुसार हे मंदिर ईश्वराचे म्हणजेच शिवाचे आहे.

गावातले अजून एक मंदिर म्हणजे मल्लिकार्जुन मंदिर. हे मंदिर तीन गाभाऱ्यांचे म्हणजे त्रिकुट मंदिर असून मुख्य गाभाऱ्यात शिवपिंडी आहे. तर इतर दोन गाभाऱ्यांत शिल्पवैभव विराजमान आहे. उजवीकडच्या गाभाऱ्यात शिव-पार्वतीची अत्यंत देखणी अंदाजे ३ फूट उंचीची आलिंगन मूर्ती. मूर्तीवर अनेक दागिन्यांचे शिल्पांकन केलेले. मूर्ती पाठीमागच्या बाजूनेसुद्धा पूर्णपणे घडवलेली.

त्यात पार्वतीची केशरचना, शिवाच्या शरीराचा बाक फारच डौलदार दाखवलेला. मूर्तीच्या मागे प्रभावळीत चक्क ‘अष्टदिक्पाल’ कोरलेले आहेत. शिवाच्या हातात विविध आयुधे आणि एक हात पार्वतीच्या खांद्यावर तर पार्वतीचा हात शिवाच्या कमरेवर विसावलेला. हे शिल्प डोळेभरून बघून आपण पाठीमागे वळतो तर मागच्या गाभाऱ्यात शेषशायी विष्णूची तितकीच देखणी मूर्ती आपल्याला खिळवून ठेवते.

सामान्यतः विष्णू त्याच्या उजव्या कुशीवर निजलेला दिसतो तर इथे चक्क देव डाव्या कुशीवर विसावलेले आहेत. बाजूला गदा आणि शंख ही आयुधे ठेवलेली. लक्ष्मी देवाचे पाय चेपते आहे. देवाच्या नाभीतून कमळ आलेले आणि त्यात ब्रह्मदेव विराजमान. इथेपण देवाच्या प्रभावालीला दोन थर. एका थरात दशावतार तर दुसऱ्या ठरत पुन्हा एकदा अष्टदिक्पाल कोरलेले. प्रभावळीत दिक्पालांचे शिल्पांकन पहिल्यांदाच दिसले. देवाची मूर्ती विविध अलंकारांनी मढवलेली आहे. इतक्या छोट्याशा गावात हे एवढे सगळे शिल्पवैभव बघून डोळे दिपतात.

सुडी या गावातून राष्ट्रकूट, कल्याणी चालुक्य, कलचुरी आणि यादवांचे मिळून जवळजवळ १६ शिलालेख प्राप्त झालेले आहेत. यात काही ठिकाणी सुडीचा उल्लेख ‘राजधानीपट्टण’ असाही आलेला दिसतो.

- आशुतोष बापट