कोलार - भारतातील सर्वात मोठी सोन्याची खाण

भारतात सोन्याच्या ज्या खाणी आहेत त्यापैकी सर्वात मोठी खाण ही कर्नाटक राज्यातील कोलार ही खाण आहे. इसवी सनाच्या चौथ्या शतकात कोलार हे पश्चिम गंगा नामक राज्याचे राजधानीचे ठिकाण होते.

कोलार - भारतातील सर्वात मोठी सोन्याची खाण
कोलार

भारत देश प्राचीन काळापासून संस्कृती व सुबत्तेचे प्रतीक असल्याने अनेक परकीय प्रवासी भारतास एकदा तरी भेट देता यावी यासाठी समुद्रमार्गे भारतभेटीस येत असत. दळण वळण व्यवस्था सुधारल्यावर भारताचा परकीय राज्यकर्त्यांशी व्यापाराच्या निमित्ताने संबंध येऊ लागला. 

भारत हा देश एवढा संपन्न आहे की तेथून सोन्याचा धूर निघतो असा समज प्राचीन काळी इतर देशांत होता आणि ते बहुतांशी खरे सुद्धा होते. सोन्याची आभूषणे घालण्याची परंपरा ही मूलतः भारतीयांनीच सुरु केली असून प्राचीन काळापासून अगदी आजही भारतीयांना सोन्याचे जे आकर्षण आहे ते कुणालाही नसावे.

सुवर्ण हा आभुषणांसाठी युक्त असा धातू आहेच मात्र तो मूल्यवानही आहे व त्याच्यायोगे आर्थिक सुबत्ता वाढवता येते हे कालांतराने जगाच्या लक्षात आले व त्यांची नजर भारतातील सोन्यावर पडली.

सुवर्ण खनिजाच्या आकर्षणापायी युरोपातील अनेक राष्ट्रे हळू हळू भारतीय भूमीवर स्थिरावण्याचा प्रयत्न करू लागली व सुरुवातीस व्यापाऱ्याच्या निमित्ताने व नंतर थेट राज्यकर्ते म्हणून या सुवर्णभूमीवर शासन करण्यापर्यंत या देशांची मजल गेली.

भारतावर दीर्घ काळ शासन करण्यात यशस्वी झालेल्या परकीय सत्तांपैकी ब्रिटिश सत्ता ही अतिशय हुशार अशी व्यापारी जमात. ब्रिटिशांनी भारतीय संस्कृतीचा खोलवर जाऊन अभ्यास केला होता. भारताचा इतिहास, भूगोल, भाषा, संस्कृती यावर त्यांनी प्रचंड संशोधन केले व इतर आक्रमकांसारखे नाश न करता ती कशा प्रकारे जतन राहील व त्याचा आपल्याला व्यापारासाठी कसा फायदा करून घेता येईल याकडे त्यांनी लक्ष दिले. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर सोन्याची कोंबडी नष्ट करण्यापेक्षा तिला जपून तिच्यापासून जेवढी सोन्याची अंडी प्राप्त करता येतील तेच त्यांनी केले.

१८५८ साली ईस्ट इंडिया कंपनीची मक्तेदारी संपुष्ठात येऊन थेट इंग्लंडच्या राणीचे शासन आपल्यावर लागू झाले व ते १९४७ सालापर्यंत म्हणजे ८९ वर्षे टिकले. यापूर्वी १८१८ ते १८५७ पर्यंत ईस्ट इंडिया कंपनी ब्रिटिशांची भारतातील शाखा म्हणून काम करीत होती. म्हणजे ब्रिटिशांनी १२८ वर्षे भारताच्या सुवर्णभूमीवर राज्य केले.

भारतात सोन्याच्या ज्या खाणी आहेत त्यापैकी सर्वात मोठी खाण ही कर्नाटक राज्यातील कोलार ही खाण आहे. इसवी सनाच्या चौथ्या शतकात कोलार हे पश्चिम गंगा नामक राज्याचे राजधानीचे ठिकाण होते. या परिसरावर अनेक भारतीय राज्ये वेगवेगळ्या कालावधीत नांदली यामध्ये विजयनगर साम्राज्याचे नाव अग्रक्रमाने घेता येईल.

याकाळात कोलार येथील डोंगराच्या कड्यातून व खाणींत खोदकाम करून सोने काढले जात असे ज्याच्या खाणाखुणा आजही कोलार येथे पाहावयास मिळतात. या खाणाखुणा पाहून ब्रिटिशांना या ठिकाणी सोन्याच्या खाणी असाव्यात असा अंदाज आला व त्यांनी प्रचंड भांडवल जमा करून बंद पडलेल्या या खाणी पुन्हा सुरु केल्या.

कोलार येथे सोने शोधण्याच्या कार्यात सुरुवातीस खाणकाम करणाऱ्या कंपन्यांना यश मिळाले नाही कारण खडकास भोक कसे पडावे याची यंत्रणा तेव्हा तयार नव्हती. पुढे हिऱ्याचा वापर करून खडकास भोक पडणे शक्य आहे हे समजल्यावर व इतर काही यंत्रे तत्कालीन संस्थानांच्या मदतीतून प्राप्त केल्यावर सोन्याच्या उत्पादनाचे कार्य जोरात सुरु झाले.

असे म्हणतात की विसाव्या शतकाच्या सुरुवातीस या खाणीतून तब्बल सहा लाख औंस म्हणजे त्याकाळातील साडेतीन कोटी रुपयांचे सोने प्राप्त झाले. खाणीतून सोने काढताना प्रथम यंत्रांचा वापर करून दगड काढला जात असे व नंतर दगडाचा चुरा करून आतील सोने धुवून काढले जात असे. प्राचीन काळी लोकांनी ज्या दगडांतून सोने काढले त्यातील वाचलेले सोनेही आधुनिक यंत्रांचा वापर करून काढण्यात आले.

कालांतराने सोने काढण्याची ही यंत्रे चालवण्याकरिता विजेचा वापर करण्यात येऊ लागला. कोलारपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या कावेरी या नदीला बांध घालून तिच्या प्रवाहापासून वीज निर्माण करण्यात आली व नंतर त्या विजेचा वापर कोलारच्या खाणींतील सोने काढण्यासाठी करण्यात आला. या कामी त्या भागातील संस्थानिकांची मदत ब्रिटिशांना होत असे व यासाठी संस्थानिकांना त्याकाळी १५ लाख रुपये दर वर्षी मिळत असत.

पुढे कोलारच्या खाणीचे काम एवढ्या प्रमाणात वाढले की तेथे काम करण्यासाठी अनेक मजुरांची गरज भासू लागली व वेगवेगळ्या ठिकाणाहून मजूर तेथे आयात करण्यात आले. हे मजूर ज्या ठिकाणी राहत त्या ठिकाणी एक नवीन गावंच तयार झाले ज्याचे नाव बौरिंगपेठ असे होते, तूर्तास हे गाव बंगारपेठ या नावाने ओळखले जाते.

आज पाश्चिमात्य राष्ट्रांकडे जी आर्थिक सुबत्ता आहे तिच्यामागे आपल्याकडील सोन्याच्या खाणी व तेथे दिवसरात्र मेहनत करणाऱ्या कामगारांचे कष्ट होते मात्र ब्रिटिश आर्थिकदृष्ट्या प्रबळ होत असताना भारतातील खाणींतून सोन्याचा फक्त धूर निघत होता व त्यातील सोने मात्र ब्रिटिशांकडे जात होते.