छत्रपती शिवाजी महाराजांची बिरुदावली अर्थात गारद

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व बिरुदांचे एकत्रीकरण करून जी बिरुदावली केली गेली तिला गारद असेही म्हणतात. बिरुदावलीस अलकाब या नावाने सुद्धा ओळखले जाते. अलकाब हा मूळचा फारशी भाषेतील शब्द आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची बिरुदावली अर्थात गारद

६ जून १६७४ साली छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनाधिष्टित झाले. वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी स्वराज्याचे स्वप्न पाहून त्यांनी प्रचंड मेहनतीने रयतेचे स्वराज्य स्थापिले व रायगड किल्ल्यास आपली राजधानी करून मस्तकी छत्र धारण केले.

राजा जेव्हा सिंहासहाधिष्टित होतो त्यावेळी त्यास बिरुदावलींनी गौरविले जाते व ही परंपरा प्राचीन काळापासून आहे. बिरुदावली ही कुणीही लावू शकत नाही. एखादे बिरुद मिळवण्यासाठी ते खऱ्या अर्थाने प्राप्त करून घ्यावे लागते. आधुनिक काळात देण्यात येणारी पदे, पुरस्कार आणि पदके ही पूर्वीच्या बिरुदांचेच प्रतीक आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांचे वडील शहाजी महाराजांकडून वारसा हक्काने एक जहागीर प्राप्त झाली मात्र तेवढ्यावरच समाधान न मानता त्यांनी स्वकर्तुत्वाने स्वराज्य निर्माणकेले.  आपल्या पराक्रमाने शत्रुंना नामोहरम करून मोगल, आदिलशाही, कुतुबशाही सारख्या सत्तांना आपले वर्चस्व मानावयास भाग पाडले, ब्रिटिश, सिद्दी, पोर्तुगीज, फ्रेंच इत्यादी समुद्रावरील सत्तांना धाकात ठेवले त्यामुळे महाराजांना असंख्य अशी बिरुदे प्राप्त झाली. 

या सर्व बिरुदांचे एकत्रीकरण करून जी बिरुदावली केली गेली तिला गारद असेही म्हणतात. बिरुदावलीस अलकाब या नावाने सुद्धा ओळखले जाते. अलकाब हा मूळचा फारशी भाषेतील शब्द आहे. अलकाब देणाऱ्यास गुर्झबदार असे म्हणत. गुर्झबदारास भालदार या नावानेही ओळखले जात असे. गुर्झबदाराच्या हाती सोन्याची गुझर्ब असे व गारद देताना तो हातातील गुर्झब उचलून ठणठणीत आवाजात गारद देत असे. छत्रपती शिवाजी महाराजांची गारद काय होती हे जाणून घेण्याचा या लेखातून प्रयत्न करू.

आस्ते कदम
आस्ते कदम
आस्ते कदम
महाराsssssज
गडपती
गजअश्वपती
भूपती
प्रजापती
सुवर्णरत्नश्रीपती
अष्टवधानजागृत
अष्टप्रधानवेष्टित
न्यायालंकारमंडित
शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत
राजनितिधुरंधर
प्रौढप्रतापपुरंदर
क्षत्रियकुलावतंस
सिंहासनाधिश्वर
महाराजाधिराज
राजाशिवछत्रपती महाराजांचा विजय असो.

ही होती स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची बिरुदावली अर्थात गारद, या बिरुदावलीत समाविष्ट बिरुदांचा अर्थ काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

गडपती - गडकोटांचे स्वामी, संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग असे आज्ञापत्रांत म्हटले आहे त्यामुळे राज्यातील सर्व दुर्गांचे अधिपती असलेले महाराज!

गजअश्वपती - हत्तीदळ आणि घोडदळ ही राज्याच्या वैभवाची प्रतीके ज्यांच्याकडे आहेत ते महाराज!

भूपती - राज्य हे सर्वार्थाने भूमीवर केले जाते व या भूमीचे पालन करणे राजाचे मुख्य कर्तव्य, राज्याभिषेक हा राजाचा त्याने प्राप्त केलेल्या भूमीशी झालेला विवाहच असतो त्यामुळे स्वराज्याच्या भूमीचे स्वामी असलेले महाराज!

प्रजापती - भूमीसोबत भूमीवर राहत असलेल्या प्रजेचे पालन करणे हे सुद्धा राजाचे कर्तव्य असते व त्यामुळेच स्वराज्यातील प्रजेचे पालनकर्ते महाराज!

सुवर्णरत्नश्रीपती - राज्याची संपन्नता राज्यातील खजिन्यावर अवलंबून असते. राज्यातील अठरा कारखान्यांमध्ये खजिना, जवाहिरखाना हे महत्वाचे कारखाने होते व या कारखान्यांत सुवर्ण व रत्नांचा प्रचंड साठा होता जो स्वराज्याच्या कामी येत असे म्हणून सुवर्ण व रत्नांचे अधिपती महाराज!

अष्टवधानजागृत - अष्टावधानी म्हणजे दिवसाचे आठही प्रहार जागृत राहून राज्याच्या आठही दिशांवर अवधान अर्थात लक्ष ठेवणारे महाराज!

अष्टप्रधानवेष्टित - मुख्य प्रधान, मुजुमदार, दानाध्यक्ष, सेनापती, वाकनीस, सुमंत, सचिव, न्यायाधीश अशा विविध शास्त्रांत निपुण असलेल्या अष्टप्रधानांची ज्यांस साथ आहे असे महाराज!

न्यायालंकारमंडित - न्यायप्रिय व न्यायाचे राज्य चालवून जनतेस न्याय देणारे महाराज!

शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत - शस्त्रविद्या आणि शास्त्रविद्या या महत्वाच्या विद्यांमध्ये निपुण असलेले महाराज!

राजनितिधुरंधर - राजनीती शास्त्रात निपुण असे महाराज!

प्रौढप्रतापपुरंदर - ज्याचा प्रताप मोठा (प्रौढ) आहे असे पुरंदरसमान (इंद्र) महाराज!

क्षत्रियकुलावतंस - क्षत्रिय कुळात जन्म घेऊन ज्यांनी आपल्या पराक्रमाने कुळाचा मान वाढविला असे महाराज!

सिंहासनाधिश्वर - सुवर्णसिंहासनाचे जे अधिपती आहेत व सिंहासनावर जे शोभून दिसतात असे महाराज!

महाराजाधिराज - सर्व राजांमध्ये श्रेष्ठ असा राजा ज्याचे मांडलिकत्व अनेक राजांनी स्वीकारले आहे असे महाराज!

राजाशिवछत्रपती महाराजांचा विजय असो! - स्वराज्य संस्थापक व प्रजापालक छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो!

त्या युगी सर्व पृथ्वीवर म्लेच्छ बादशाह असताना मऱ्हाटा पातशाह छत्रपती झाले. ही गोष्ट काही सामान्य झाली नाही..