कोकणातील गावात आंध्रप्रदेशचा शिलालेख

भारताचा इतिहास जितका रोमांचकारी तितकाच रहस्यमय आहे. इतिहासाच्या या खोल समुद्रात जेवढे आत जावे तेवढे अद्भुत सापडत असते.

कोकणातील गावात आंध्रप्रदेशचा शिलालेख
कोकणातील गावात आंध्रप्रदेशचा शिलालेख

अरबी समुद्राच्या समीप असलेल्या कोकणातल्या एका मराठमोळ्या गावात पूर्व समुद्राच्या समीप असलेल्या गावाशी संबंध असलेला तेलगू भाषेतील एक जुना शिलालेख आहे हे ऐकून कानावर विश्वास बसू  शकेल का? 

मात्र हे खरे आहे कोकणामधील रायगड जिल्ह्यात असलेल्या व तालुक्याचे ठिकाण असलेल्या तळे गावात हे अदभूत पहावयास मिळते. तळे हे गाव तसे अतिशय ऐतिहासिक. अरबी समुद्रातून कोकणमार्गे देशावर जाणाऱ्या भालगावची खाडी या प्रमुख सागरी मार्गावरील हे महत्वाचे केंद्र. भालगावच्या खादीची नाकेबंदी येथील तळगडावरून केली जात असे. ज्याच्या ताब्यात तळे व तळगड त्याच्या ताब्यात व्यापारी मार्ग असे समीकरण होते.

पूर्वी हा परिसर निजामशाहीमध्ये होता व कालांतराने सिद्दीकडून शिवाजी महाराजांनी तो स्वराज्यात घेतला. पुरंदरच्या तहात जे अवघे १२ किल्ले महाराजांकडे होते त्यापैकी तळगड हा एक किल्ला. यावरून या परिसराचे ऐतिहासिक महत्व लक्षात येऊ शकेल. तळा या गावात ऐतिहासिक वस्तू अनेक आहेत. येथे असलेली मंदिरे व तलाव हे स्थापत्य शास्त्राचा उत्तम नमुना आहेत. यापैकी अनेक मंदिरांचा आधुनिक काळात जीर्णोद्धार झाला असला तरी मंदिराच्या अंतर्भागात असलेले ठेवे मंदिराचा प्राचीन इतिहास उजागर करण्यात महत्वाचं भूमिका निभावतात. 

तळे या गावातील असेच एक जुने मंदिर म्हणजे भुवनेश्वर हे शिवमंदिर. या तळगड किल्ल्यावर जाणारा रस्ता तळे गावाच्या पश्चिमेकडून जातो याच मार्गाने खाली पूर्वेकडे उतरून उत्तरेकडे वळल्यास भुवनेश्वर मंदिर दिसून येते. मंदिराबाहेर एक विहीर आहे. या विहिरीवर एक मराठी भाषेतला अलीकडचा शिलालेख आहे ज्यामध्ये रामचंद्र बाळुंगे यांचे नाव दिसून येते. विहिरीच्या उजव्या बाजूस भुवनेश्वर मंदिर आहे. मंदिराचा आता जीर्णोद्धार झाला असून गाभारा हा पूर्वीचाच आहे फक्त रंगकाम केल्यामुळे गाभाऱ्याचे मूळ स्वरूप समजून येत नाही. 

मंदिराच्या सभामंडपात नंदी असून गर्भगृहात शिवलिंग आहे. गर्भगृहात शिरताना आपली नजर वेगळ्याच भाषेतील एका शिलालेखाकडे जाते. हा शिलालेख एकूण सहा ओळींचा असून डाव्या बाजूस एक ओळ आडवी काढली आहे. या लेखाचे संपादन पूर्वी झाले असून तामिळ भाषेतील हा लेख अदमासे १६व्या शतकातील असावा. 

राजमहेंद्रवर्म कोंडू रामय्या अमलापूरम जिल्हा असा उल्लेख शिलालेखात असून राजमहेंद्रवर्म म्हणजे आंध्र प्रदेशातील राजामुंद्री आणि अमलापूरम हे सुद्धा आंध्र प्रदेशातीलच एक जिल्ह्याचे ठिकाण आहे. ही दोनही  गावे बंगालच्या उपसागरापासून अतिशय जवळ असून गोदावरी नदीच्या तीरावर वसली आहेत. याशिवाय दोन्ही गावामंधील अंतर फक्त ६२ किलोमीटर आहे. यावरून हे स्पष्ट होते कि कोंडू रामय्या हा या परिसरातीलच राहणारा असून त्यानेच तळे गावातील हे मंदिर ५०० हुन अधिक वर्षांपूर्वी उभारले. 

पण हा रामय्या आंध्रप्रदेशातून कोकणात येण्याचे आणि त्यातही तेथे मंदिर बांधावयाचे प्रयोजन काय हा प्रश्न निरुत्तरितच राहतो त्यामुळे त्याची शहनिशा करणे गरजेचे होऊन बसते. इतिहासात डोकावून पहिले असता या शिलालेखाचा संबंध दक्षिणेतील विजयनगर साम्राज्याशी जोडला जातो. विजयनगर साम्राज्यावर एकूण चार राजवंशानी राज्य केले संगम, सुलुवा, तुळुवा आणि अरविंदु असे हे राजवंश. तुळू राजवंशाच्या कृष्णदेवरायाने आपल्या राज्याचा विस्तार प्रचंड प्रमाणात वाढवला होता. या काळात त्याच्या राज्याची हद्द कोकणातील काही भागांपर्यंत असावी आणि तळे हे गाव सुद्धा त्याच्या हद्दीत येत असावे. रामय्या हा कृष्णदेवरायाचा कोकणातील अधिकारी असावा आणि त्याच्या त्याच्याच कारकिर्दीत त्याने हे भूवनेश्वर शिवमंदिर उभारले असावे या तथ्यास पुष्टी मिळते. 

इ. स. 1543 च्या सुमारास बुऱ्हाण निजामशहाने विजयनगरचा सम्राट अलिया रामराया याच्याशी मैत्रीपूर्ण संबंध बनवले तसेच आपल्या मुलाचे लग्न दर्या इमादशाहच्या मुलीसोबत लावून दिले. अशा रितीने विजयनगर, कुतुबशाह व इमादशाह इत्यादी सत्तांचा पाठिंबा मिळवून त्याने आदिलशाहीवर अनेक हल्ले केले. विजयनगर व निजामशाही युतीच्या काळात अलिया रामराया याच्या सहकार्यातून अनेक महत्त्वाची बांधकामे निजामशाहीतील कोकणात झाली. त्यापैकी सर्वात महत्त्वाचे बांधकाम म्हणजे नागोठणे येथील मध्ययुगीन पूल, सातवाहन काळापासून प्रसिद्ध असलेल्या मार्गावर युद्ध सामुग्रीची तसेच दळणवळणाची सोय सुकर व्हावी यासाठी अंबा नदीवर या पुलाची निर्मिती करण्यात आली. हा पूल विजयनगरचा राजा अलिया रामराय याने बांधल्याची नोंद एका प्राकृत शिलालेखात होती. उत्तर कोकणातल्या विजयनगरच्या हालचाली दाखवणारा दुसरा पुरावा म्हणजेच हा तेलगू भाषेतील शिलालेख. या शिलालेखाचा आणि नागोठण्याच्या पुलाच्या बांधणीचा कालावधी एकच असण्याची शक्यता आहे. कारण याच कालावधीत बुऱ्हाण निजामशाह आणि विजयनगर सम्राट यांच्यात युती झाली होती.

तर कोकणातील एकमेव असा हा तेलगू भाषेतील शिलालेख पहावयास पर्यटकांस नक्कीच आनंद मिळेल व आपल्या इतिहासातील रहस्यांची कवाडे आपोआप उघडली जातील असा विश्वास आहे.